Tuesday, February 7, 2017

दखल न घेतली गेलेली एक exit....


हेरॉल्ड रोसेन या अवकाश क्षेत्राशी संबंधित electrical engineer चे नुकतेच म्हणजे 30 जानेवारी 2017 ला निधन झाले. खरं तर हे नाव किंवा या घटनेची माहिती सेकंदाच्या काट्यावर धावणा-या सध्याच्या जगांत माहिती होण्याचे काहीही कारण नाही. मात्र या व्यक्तिने केलेल्या कामामुळे सध्या जग धावत आहे, गतिमान झाले आहे, माहितीपूर्ण झालेले आहे असे ठामपणे म्हणावे लागेल. कारण या व्यक्तिला भुस्थिर उपग्रह ( geostationary satellite ) आणि संदेशवहन उपग्रह ( communication satellite ) यांचे जनक म्हणुन ओळखले जाते. 

सध्या पृथ्वीभोवती 600 पेक्षा जास्त भुस्थिर उपग्रह भ्रमण करत आहेत. या उपग्रहांमुळे टीव्ही बघता येतो, रेडियो संदेश पाठवता येतात , हवामानाची माहिती मिळते, इंटरनेट प्रभावीपणे वापरता येते, जगात कोठेही कधीही satellite फोन कॉलने बोलता येते, संरक्षण -  सामरिक क्षेत्राकरता प्रभावी वापर करता येतो. हे उपग्रह नसतील तर सध्याच्या भाषेत जग हे अश्मियुगीन काळात किंवा 1950 च्या काळांत थेट पोहचेल.

असे उपग्रह प्रत्यक्षात आणण्याचे काम  हेरॉल्ड रोसेन या महान व्यक्तिने केले आहे. तेव्हा त्यांच्या exit ची फारशी दखल घेतली गेली नाही हे दुर्देव.  

4 एप्रिल 1957 ला सोव्हिएत रशियाने स्फुटनिक हा पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात धाडत जगाला हादरा दिला. या पहिल्या कृत्रिम उपग्रहावर विशिष्ट तंरगलांबीचे संदेश पाठवण्याचे उपकरण बसवले होते. यामुळे उपग्रह डोक्यावरुन जात असतांना संदेश ग्रहण करणा-या साध्या प्राथिमक उपकरणांद्वारे कोणलाही संदेश ऐकता येईल ( आणि रशियाच्या सामर्थ्याची - क्षमतेची कल्पना येईल ) अशी तजवीज रशियाने करुन ठेवली होती.

मात्र यामुळे जगांत पुढच्या काळांत कशी संपर्क यंत्रणा कार्यान्वित करता येईल याचे चित्रच हेरॉल्ड रोसेन यांच्यापुढे उभे राहिले आणि त्या्नी तात्काळ त्यावर काम करायला सुरुवात केली.

त्य़ाकाळी म्हणजे 1960 च्या सुमारास दोन खंडांदरम्यान फोन कऱणे हे काहीसे त्रासदायक प्रकरण होते. विशेषतः दोन खंडांमध्ये समुद्राखालून जरी टेलिफोन वायर टाकण्यात आल्या असल्या तरी अनेकदा तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यावेळी ऐन भरांत असलेले शीत युद्ध लक्षात घेता रेडियो सिग्नल यंत्रणा हा काही सुरक्षीत मार्ग नव्हता.  त्यामध्येही तांत्रिक अडचणी अनेक होत्याच.

तेव्हा पृथ्वीच्या दोन टोकांमध्ये उपग्रहांच्या माध्यमातून संदेशवहन करणे हे कोणत्याही अडणींशिवाय करणे शक्य होणार असल्याचं हेरॉल्ड रोसेन यांच्या लक्षात आले.

20 मार्च 1926 ला जन्मलेले हेरॉल्ड रोसेन यांनी electrical engineer ची पदवी घेतली, तत्कालिन परिस्थितीमुळे दुस-या महायुद्धात कामही केले. त्यानंतर 1951 च्या सुमारास Hughes Aircraft कंपनीत नोकरीला लागले. विमानविरोधी क्षेपणास्त्र आणि रडारची क्षमता वाढवणे यांवर काम करायला सुरुवात केली.

स्पुटऩिक उपग्रह प्रकरण नंतर हेरॉल्ड रोसेन यांनी संदेशवहन उपग्रहांची संकल्पना कंपनीसमोर मांडली. पृथ्वीच्या भोवती पृथ्वीच्या वेगाने फिरणारा उपग्रह असावा. तो उपग्रह पृथ्वीवरुन स्थिर भासेल एवढ्या उंचीवर असावा. ( geosynchronous कक्षा ). यामुळे त्या उपग्रहाने पाठवलेले संदेश हे पृथ्वीच्या अर्ध्या भागांवर सहज 
प्रक्षेपित करता येतील अशी संकल्पना हेरॉल्ड रोसेन मांडली. भुस्थिर उपग्रहाची संकल्पना मांडली. एवढंच नाही तर 24 किलो वजनाच्या सोलर पॅनेल असलेला, संदेशाची देवाण घेवाण करू शकेल अशा उपग्रहाची प्रतिकृतीही तयार केली. कंपनी प्रमुखांनी ही कल्पना तात्काळ उचलून धरली आणि नासापुढे याबाबात प्रस्ताव ठेवला. त्यावेळी नासाही याच संपकल्पनेवर काम करत होती. तेव्हा नासाने तात्काळ पाठिंबाही दिला, आर्थिक मदत देऊ केली.

मग हेरॉल्ड रोसेन यांनी आणखी दोन साथिदारांना
बरोबर घेत ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. रोसेन यांच्या टीमने पृथ्वीभोवती पृथ्वीच्या वेगाने फिरू शकेल, संदेश प्रक्षेपित करू शकेल, संदेशची देवाणघेवाण करू शकेल असा synchronous communication satellite म्हणजेच Syncom उपग्रह तयार केला.

नासाने Syncom -1 हा उपग्रह 14 फेब्रुवारी 1963 ला geosynchronous कक्षेत सोडला. मात्र हा उपग्रह तांत्रिक समस्येमुळे निकामी झाला. मात्र 62 जुलै 1963 ला Syncom 2 उपग्रह प्रक्षेपित केला. या उपग्रहाने जगातील पहिले satellite फोनचे संभाषण झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडी यांनी नायजेरियाच्या पंतप्रधानांशी उपग्रहाद्वारे संभाषण केले. नासाने Syncom 3 हा उपग्रह 19 ऑगस्ट 1964 ला प्रक्षेपित केला. या उपग्रहाद्वारे जगातील पहिले live उपग्रह टीव्ही प्रक्षेपण झाले. ऑक्टोबरमधील टोकियो ऑलंपिक खेळांचे थेट प्रक्षेपण या उपग्रहामुळे झाले.  दोन खंडांमध्ये कोणताही अडथळा ने येता टीव्ही प्रक्षेपण झाले. जगभरातील लोकांना हे खेळ घरबसल्या बघता आला. ही घटना जगातील तांत्रिक बदलांच्या घडामोडींच्या इतिहासात एक मैलाचा दगड मानली जाते.     

यानंतर अमेरिका आणि रशिया या दोन बलाढ्य देशांनीच
काय अनेक देशानी मग विविध क्षमतेचे भुस्थिर उपग्रह बनवत टीव्ही प्रक्षेपण हि सर्वसामान्य गोष्ट बनवली. जगात टीव्ही घरोघरी पोहचण्यास, नवे मनोरंजनाचे - माहितीचे दालन उघडण्यास मदत झाली आणि जगाचा चेहरामोहरा बदलला. 

भुस्थिर उपग्रहामुळे संबंधित देशाला हवामानाचे ताजे अपडेट्स मिळू लागले. लष्करी वापरामुळे सैन्यदलामध्ये अविरत संदेशवहन शक्य झाले. इंटरनेटचा अविरत वापर करणेही शक्य होत आहे. नागरी वापर करत नागरीकांना विविध सेवा देणे शक्य होत आहे. दुर्गम भागात टेली मिडीसीन सारख्या सुविधा देणे शक्य झाले आहे. भुस्थिर उपग्रहांशिवाय जगाची कल्पनाच करणेच सध्या अशक्य आहे. 

हेरॉल्ड रोसेन हे नाव म्हणूनच जगात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले होते - आहे. त्यांच्या जाण्याच्या निमित्ताने त्यांची ओळख, कार्याची महती सर्वांना  व्हावी म्हणून हा नसता ब्लॉगचा खटाटोप. 

2 comments:

  1. खूप छान लिहिलंय ... मला तर माहिती नव्हती, धन्यवाद तुमच्यामुळे माहितीत भर पडली .

    ReplyDelete

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...