Friday, May 7, 2021

चेर्नोबिल अणुभट्टी अपघाताची 35 वर्षे

एखाद्या अपघातामुळे जगामध्ये उलथापालथ होते का ? मानवी चुकीचे सर्वोच्च - टोकाचे उदाहरण कोणते असू शकते ? एखाद्या अपघातामुळे मुळ सिद्धांतावर आधारीत उद्योग हा ढवळून निघतो का ? एखादा अपघात हा विविध देशांमधील परस्पर सहकार्याची भावना जागृत करतो का ? 

याचे उत्तर चेर्नोबिल अणुभट्टीचा अपघात हे आहे. 

26 एप्रिल 1986 ला पहाटे 1 वाजून 23 मिनिटाच्या सुमारास वीज निर्मिती करणाऱ्या चेर्नोबिल अणुभटटी क्रमांक 4 मध्ये अपघात झाला. चेर्नोबिल हे ( तेव्हा ) सोव्हिएत रशियामध्ये होते आणि ( आता ) युक्रेन देशामध्ये उत्तर टोकाला बेलारुस देशाच्या सीमेजवळ प्रिपयाट ( Pripyat ) नदीच्या बाजूला आहे. या नदीच्या बाजुला 1977 ते 1983 या काळांत 3,200 मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या एकुण चार अणुभट्ट्या उभारण्यात आल्या - चेर्नोबिल अणु ऊर्जा प्रकल्प. 

या सर्व अणुभट्ट्या या ग्राफाईट नियंत्रित अणुभट्टी तंत्रज्ञानावर आधारीत होत्या. यापैकी अणुभट्टी क्रमांक 4 ही 1983 ला कार्यान्वित झाली होती. यामध्ये काही चाचण्या सुरु असतांना हा अपघात झाला. चाचण्या करतांना नियमांकडे झालेले अक्षम्य असं दुर्लक्ष आणि सदोष अणुभट्टीची रचना यामुळे या अणुभट्टीमध्ये स्फोट झाला. यामुळे अणुभट्टीचा गाभा हा पुर्णपणे नष्ट झाला. या अणुभट्टीत असलेले किरणोत्सारी मुलदव्य हे खुले झाले,बाहेर पडले. अर्थात बहुतांश हे अपघाताच्या ठिकाणी जरी राहीले तरी मोठ्या प्रमाणात हे बाहेर फेकले गेले, हवेमुळे इतरत्र पसरले. 

हिरोशीमा अणु बॉम्ब हल्ल्याशी चेर्नोबिलची तुलना केली तर हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बमध्ये सुमारे 64 किलो समृद्ध युरेनियम वापरले गेले तर चेर्नोबिलमध्ये 180 टन विविध किरणोत्सारी मुलद्रव्य होते. हिरोशीमा अणु बॉम्ब हल्ल्यापेक्षा 400 पट किरणोत्सार हा चेर्नोबिल अपघातामध्ये बाहेर पडला. 

या अपघाताची तीव्रता लक्षात यायला तेव्हाच्या सोव्हिएत रशियाला काही तास गेले. मात्र त्यानंतर प्रशासनाने वेगाने पावले उचलली. त्यानंतर अवघ्या 24 तासांत चेर्नोबिलच्या परिघाताील सुमारे दिड लाखापेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यानंतर टप्प्याटप्पाने 30 किमीचा परिसर मानव विरहित केला गेला. किरणोत्सार आणखी पसरु नये यासाठी या भागांत पिकलेले धान्य, फळे नष्ट करण्यात आली. पाळीव प्राणी, वन्य प्राणी यांना मारण्यात आले. 

सोव्हिएत रशियाच्या पोलादी पडद्यामुळे या अपघाताची माहिती देशाबाहेर जाऊ दिली गेली नाही हे खरे. मात्र तेव्हा हवेतून पसरलेल्या किरणोत्साराचे अंश हे जेव्हा इतर देशांमध्ये आढळले तेव्हा कुठे असा अणुभट्टीचा अपघात झाल्याचं सोेव्हिएत रशियाने मान्य केलं. 

मिखाईल गोबर्चेव्ह हे तेव्हाचे सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष होते. जगात सुरु असलेले, अमेरिकेशी भिडणारे रशियाचे शीत युद्ध उतरणीला लागले ते याच अध्यक्षांमुळे. खुला दृष्टीकोन ( glasnost ) आणि पुर्नरचना (  perestroika ) या दोन गोष्टी गोबर्चेव्ह यांनी सोव्हिएत रशियाला दिल्या आणि तेव्हाच्या दबलेल्या सोव्हिएतमध्ये क्रांतीचे वारे वाहू लागले आणि 1991 ला सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. 

या सर्व घटनेला कारणीभूत ठरला चेर्नोबिल अणुभट्टीचा अपघात. या अपघातामुळेच तत्कालिन प्रशासन आणि राजकीय व्यवस्थेवर बोट ठेवायला अणु शास्त्रज्ञांनी सुरुवात केली. सदोष अणुभट्टीची रचना, अपघाताची माहिती पसरु नये यासाठी सुरु असलेली दमनशाही, नियमांचा बागुलबुवा अशा अनेक गोष्टींवर शास्त्रज्ञांनी आवाज उठवला आणि अणुभट्टीबद्दल पुर्नविचार करण्यास सरकारला भाग पाडले. याचा परिणाम - प्रभाव अर्थात रशियाच्या सर्व घटकांमध्ये झिरपला, सोव्हिएत रशियात ठिकठिकाणी उठाव झाले आणि अखेर 1991 ला सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. 

चेर्नोबिल अपघातामुळे किती लोक ठार झाले ?
अपघाताच्या ठिकाणी लगेच पोहचलेले अग्निशमन दलातील कर्मचारी, अणुभट्टीत काम करणारे कर्मचारी यापैकी 50 पेक्षा जास्त जणांचा एका महिन्यात किरणोत्सारामुळे मृत्यु झाला. तर अणुभट्टीपासून किरणोत्सार पसरु नये यासाठी जवळपास 6 लाख लोकांना टप्प्याटप्प्याने या चेर्नोबिल आणि परिसरांत कामाला अहोरात्र जुंपण्यात आले. या सर्व लोकांना किरणोत्साराचा कमी अधिक प्रमाणात डोस मिळाला. अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी यापैकी सुमारे एक लाखापर्यंत लोकांचा आत्तापर्यंत किरणोत्सारामुळे उद्भवलेल्या विविध आजारामुळे ( विविध कर्करोग ) मृत्यु झाला असावा असा अंदाज आहे. ( याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही ). 

तर किरणोत्सार हा आजुबाजुच्या देशांत काही प्रमाणात पसरला. यामुळे कमी अधिक प्रमाणात कर्करोगाने मृत्यु झाल्याचा अभ्यास सांगतो. हा आकडा किती तर तो 4 हजार ते 40 हजार इतका असावा असा अंदाज आहे. 

अपघातानंतर चेर्नोबिलच्या उर्वरित 3 अणु भट्टया या टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आल्या आहेत. 2 इतर दोन अणुभट्ट्यांचे काम हे अणुभट्टी क्रमांक 4 च्या अपघातानंतर थांबवण्यात आले. 

अपघातग्रस्त अणुभट्टी 4 मधून किरणोत्सार हा पुढील कित्येक वर्षे ( 20 हजार वर्षे ?? ) सुरुच रहाणार आहे. म्हणजे या अपघाताच्या जागेतून किरणोत्सार हा बाहेर पडतच रहाणार. तो इतरत्र पसरु नये यासाठी अपघातग्रस्त अणुभट्टीच्या भोवती सुरुवातीला क्रांक्रीटची भरभक्कम इमारत उभारण्यात आली. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय सहकार्य घेत अर्धवर्तुळाकार मिश्र धातूंचा भरभक्कम डोम उभारण्यात आला आहे. हा डोम पुढील काही वर्षे टिकेल. मग त्यानंतर आणखी सुरक्षात्मक उपाययोजना कराव्या लागतील. या डोमसाठीच निव्वळ 60 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च झाला आहे. 

चेर्नोबिल अणु भट्टीचा परिसर कसा आहे ? 

2011 नंतर युक्रेन देशाने पर्यटनासाठी हा परिसर खुला केलेला आहे. अनेक निर्बंध यामध्ये आहेतच. अर्थात प्रत्यक्ष अपघात स्थळाजवळ जाण्याचा प्रश्नच येत नसला तरी दुरुन हा भाग बघता येतो. काही किलोमीटर परिसरात मानवी वस्ती अजुनही नाही. मात्र मानवाच्या अनुपस्थितीत या भागांत जीवसृष्टी मात्र चांगलीच बहरली आहे. झाडे -पशू पक्षी यांनी आपले पुर्ववत जीवन सुरु केले आहे.

अपघातामुळे काय फरक पडला ? 
 
आंतरराष्ट्रीय पातळीवर अणुऊर्जेच्या तंत्रज्ञानाबाबात देवाणघेवणा वाढली, विशेषतः अणुभट्ट्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबात खुली चर्चा व्हायला लागली. अणुभट्टी तंत्रज्ञान हे आणखी सुरक्षित केले गेले. अणुभट्टीचा अपघात झालाच तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याबद्द्लच्या माहितीची देवाणघेणाण होऊ लागली, मदत घेतली जाऊ लागली. उदा..जपानच्या फुकुशिमा अपघाताच्या वेळी हे सहजपणे दिसुन आले.  

वर उल्लेख केल्याप्रमाणे या अपघातानंतर सोव्हिएत रशियाच्या विघटनासाठी पहिले पाऊल पडले, मग उठाव -मोर्चे - आंदोलने होत रशियाचे विघटन झाले, जगातील शीत युद्द समाप्त झाले. 
 
अर्थात या अपघातानंतर अणुभट्ट्यांना विरोधही विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. किरणोत्सारी कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला. फुकुशीमा अपघातानंतर तर जर्मनीने त्यांच्याकडे असलेल्या सर्व अणुभट्ट्या कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला. 

अणु ऊर्जा अपघातामध्ये तीव्रतेसाठी विविध श्रेणी या निश्चित केल्या गेल्या आहेत. यामध्ये चेर्नोबिल अपघाताची गणना ही सर्वोच्च पातळीवर ( श्रेणी - 7 )  केली जाते. म्हणजेच हा आत्तापर्यंतचा सर्वात भीषण असा अणुभट्टीचा अपघात होता. फुकुशिमा अपघातही याच श्रेणीतला आहे. 

या चेर्नोबिल अणुभट्टी अपघातावर वर आत्तापर्यंत असंख्य गोष्टी लिहून आल्या आहेत, अभ्यास झाला आहे, प्रबंध सादर झाले आहेत, माहितीपट उपलब्ध आहेत. दोन वर्षापूर्वी हॉटस्टारवर आलेली चेर्नोबिल ही पाच भागांची सिरीज तर अप्रितमच आहे. 
 
चेर्नोबिल अणुभट्टीच्या अपघाताला 35 वर्ष झाल्याच्या निमित्ताने याबद्दल माहिती लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. 

चेर्नोबिल अणुभट्टी अपघाताबद्दल काही माहितीपटाची लिंक शेयर करत आहे. जरुर बघावी......  

https://www.youtube.com/watch?v=pOzJQJ1yAaM ( 12.5 मिनीटे ) 

https://www.youtube.com/watch?v=HIziLarTcss ( 46.41 मिनीटे ) 

https://www.youtube.com/watch?v=UrbTTrgLB5A ( 3.28 मिनीटे ) 

https://www.youtube.com/watch?v=JgQ8fjr1i5M ( 1 तास 30 मिनीटे )

No comments:

Post a Comment

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...