Thursday, February 28, 2019

मिग-२१ का सरस ठरले ?



२७ फेब्रुवारीला एलओसी(लाईन ऑफ कंट्रोल) जवळच्या 'नौशेरा'च्या आकाशात भारत आणि पकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये जोरदार सामना झाला. १९७१ नंतर प्रथमच दोन्ही देशांची लढाऊ विमाने खऱ्या अर्थाने एकमेकांना भिडली. १९९९ च्या कारगिल लढाईत आपल्या लढाऊ विमानांमध्ये, विशेषतः 'मिग -२९'मध्ये असलेल्या लांब पल्ल्यांच्या हवेतल्या हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रामुळे, पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी सीमेजवळ येण्याचे धाडस केले नव्हते.

मात्र 'नौशेरा'त सकाळी १० च्या सुमारास पाकिस्तानच्या काही लढाऊ विमानांनी घुसखोरी करत लष्कराच्या ठिकाणांवर 'बॉम्ब'हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच भारतीय लढाऊ विमानांनी सुखोई -३ एमकेआय, मिग-२१ आणि मिराज -२००० या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना अटकाव केला. त्यामुळे पाकिस्तानी लढाऊ विमानांनी सीमजवळ कसेबसे बॉम्ब टाकले आणि पळ काढला. तोपर्यंत भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या लढा विमानांवर हल्ला चढवला. यामध्ये मिग -२१(बायसन) ने आर-७३ हे क्षेपणास्त्र डागत 'एफ -१६'('एफ सिक्सटीन' या नावाने उल्लेखले जाते) हे लढाऊ विमान पाडले. पाकिस्तानचे एफ-१६ हे भारताच्या हद्दीत घुसले होते याचा पुरावा नुकताच संरक्षण दलाने सादर केला. एफ-१६ जे क्षेपणास्त्र वाहुन नेऊ शकते त्या AMRAAM  या हवेतल्या हवेत लक्ष्यभेद करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राचे काही भाग पत्रकार परिषदमध्ये दाखवण्यात आले. या एका AMRAAM क्षेपणास्त्राने भारताचे मिग -२१ पाडले असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर दुस-या AMRAAM चा नेम चुकला आणि ते भारतीय हद्दीत पडले.

काय आहे AMRAAM?Advance Medium Range Air to Air Missile - AMRAAM हे अमेरिकेच्या कंपनीने बनलेले क्षेपणास्त्र आहे. हे Beyond Visual Range प्रकारातील   क्षेपणास्त्र आहे. म्हणजेच दृष्टीक्षेपात न येणारे लक्ष्य भेदण्याची क्षमता AMRAAM यामध्ये आहे. एखादे लक्ष्य लढाऊ विमानाच्या रडारवर दिसताच AMRAAM क्षेपणास्त्र त्यावर 'लॉक' केले जाते आणि डागले जाते. मग ते AMRAAM आपोआप त्यामध्ये असलेल्या छोट्या रडारच्या सहाय्याने लक्ष्याचा माग ते नष्ट करते. AMRAAM ची क्षमता ५० ते १६० किमीपर्यंत मारा करण्याची आहे. त्यातच AMRAAM हे ध्वनीच्या पाच पट वेगाने प्रवास करते म्हणजेच सर्वसाधारण लढाऊ विमानाच्या जास्तीत जास्त वेगापेक्षा दुप्पट वेगानं प्रवास करते. सर्व प्रकारच्या वातावरणात हवेतील लक्ष्य भेदण्याची क्षमता या AMRAAM मध्ये आहे हे विशेष. त्यामुळे AMRAAM क्षेपणास्त्र असलले लढाऊ विमान अत्यंत घातक – शक्तीशाली मानले जाते. याच AMRAAM ने मिग-२१ (बायसन) चा वेध घेतला असं सध्या सांगितले जात आहे.

काय आहे R-73? – हे रशियन बनावटीचे हवेतल्या हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. याच पल्ला ३० किमीपर्यंत असून ध्वनीच्या २.५ पट वेगाने आर -७३ प्रवास करु शकते. जेव्हा नौशेराच्या आकाशात भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचे युद्ध सुरू होते, तेव्हा मिग-२१ ने आर-७३ हे क्षेपणास्त्र डागले ज्याने पाकिस्तानच्या एफ-१६ चा वेध घेतला.

R-73 आणि AMRAAM मध्यो कोण सरस असा प्रश्न विचारला तर दोन्ही क्षेपणास्त्रे ही पल्ला आणि वेग यामध्ये वेगवेगळ्या पातळीवर आहेत. असे असले तरी AMRAAM हे निश्चितच R-73 पेक्षा सरस आहे.

आता तुलना F-16 आणि Mig -21 Bison ची. यामध्ये एफ-16 हे निश्चितच अत्याधुनिक आहे. याचा सुमारे २००० किमीचा पल्ला असून ध्वनीच्या दुप्पट वेगानं प्रवास कऱणारं, एक इंजिन असलेलं लढाऊ विमान आहे. या लढाऊ विमानात असणारा संगणक हा मिनी सुपर कॉम्प्युटर आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

तर मिग-२१ बायसन ही भारतीय वायू दलामध्ये असलेल्या राहिलेल्या मिग-२१ ची सर्वात अत्याधुनिक आवृत्ती असून ही लढाऊ विमाने २०२१-२२मध्ये वायु दलाच्या सेवेतून निवृत्त केली जाणार आहेत. एक इंजिन असलेल्या मिग-२१ चा पल्ला सुमारे १५०० किमी असून ध्वनीच्या दीडपट वेगानं जाण्याची क्षमता आहे.

तेव्हा पाकिस्तानचे लढाऊ विमान एफ-१६ हे निश्चितच भारतीय वायू दलाच्या मिग-२१ बायसन पेक्षा सरस  आहे.

आता मुद्दा राहिला तो एवढी आधुनिकता असतांना आपल्या मिग-२१ ने पाकिस्तानचे एफ-१६ कसं काय पाडले याचा. याचं उत्तर एकच....अत्याधुनिकता कितीही असो तुमच्याकडे असलेले शस्त्र कसे आणि किती कौशल्याने वापरले जाते त्यावर त्याची संहारकता ठरते. एफ-१६ हे आपल्या मिग-२१ पेक्षा वरचढ असुनही निव्वळ आपल्या वैमानिकाच्या कौशल्यामुळे आपल्या मिग-२१ ने पाकिस्तानच्या एफ-१६ वर मात केली. आपण एक मिग-२१ गमावले असले तरी त्यांचे एफ-१६ पाडणे हे आपल्यासाठी दुप्पट गुण मिळवण्यासारखे आहे. 

१९७१ च्या आमनेसामने लढाईनंतर पुन्हा एकदा भारतीय वायू दल हे पाकिस्तान वायू दलापेक्षा वरचढ ठरले आहे. 

 amitjoshi101@gmail.com



6 comments:

  1. अमित सर,अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती

    ReplyDelete
  2. खूपच चांगल्या शब्दात माहिती सादर केली आहे 👍👍

    ReplyDelete
  3. खूप छान माहिती.
    धन्यवाद

    ReplyDelete

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...