पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

Friday, April 3, 2015

कडोंमपा, आहे तिथेच...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आले आहे. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष आपला मोर्चा नवी मुंबई, औरंगाबाद, अंबरनाथ , बदलापुर वगैरे अशा ठिकाणी प्रचारासाठी वळवतील. 23 एप्रिलला निकाल लागतील. मग त्यांनतर चार महिन्यांत राज्यात त्यातल्या त्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची म्हणजेच कडोंमपाची निवडणूक असल्याने या महानगरपालिकेच्या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झालेले असेल.

त्यामुळे एप्रिलनंतर कडोंमपातील विविध भागांची पायधुळ विविध पक्षांचे नेते, राज्याचे मंत्री झाड़तांना दिसायला लागतील. याची झलक मात्र दिसायला सुरुवात झालेली आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कारणांनी का होईना तीन वेळा कडोंमपात येऊन गेले आहेत. राज्यात 27 महापालिकांपैकी काही प्रमुख पालिका वगळता मुख्यमंत्र्यांच्या कडोंमपाच्या फे-या सर्वात जास्त झाल्या आहेत. तसंच गेल्या काही दिवसांपासून कडोंमपाचे प्रश्नही जोराने पुढे येऊ लागले आहेत.

पण मुळात असे प्रश्न उद्भवण्याची वेळ का येते ?. त्यात उद्भवलेले प्रश्न पुन्हा तेच ते आहेत. कारण गेल्या 5 वर्षात कडोंमपा केवढी बदलली आहे असा प्रश्न विचारला तर आहे ती आहे तिथेच आहे, समस्या काही सुटल्या नाहीत असं म्हंटल तर ते चुकीचे होणार नाही.

त्यामुळे सत्ताधारी नगरसेवक आणि सत्ताधारींना धाकात ठेवण्याची क्षमता असणारे विरोधक नगरसेवक ( अशी किमान अपेक्षा विरोधकांकडून असते ) यांनी काय केले असा प्रश्न पडतो.

काही सन्माननीय नगरसेवक - लोकप्रतिनिधींनी त्यांच्या वॉर्डमध्ये खुप चांगली कामगिरी केली आहे. पण जेव्हा संपुर्ण कड़ोंमपाकड़े बघतांना काही प्रश्न जरूर पडतात ज्याची उत्तरे राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींनी द्यावीत.

1..श्रीनगर ते कन्याकुमारी असा मोठा चारपदरी रस्ता बांधायचा झाल्यास जसा वेळ लागेल तसा कडोंमपातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला का वेळ लागला आणि लागत आहे ? एवढा वेळ लागूनही काँक्रीटीकरणाबद्दलच्या दर्जाबद्दल का तक्रारी आहेत ? इतर काही ठिकाणी रस्त्यांची अवस्थाही वाईटच आहे.

2..आजही सर्वसामन्यांना आरोग्य सेवेसाठी खाजगी सेवेवर किंवा मुंबई - ठाणेवर अवलंबून रहावे लागते. कड़ोंमपाची आरोग्य सेवा का सक्षम झाली नाही ?

3..आजही कडोंमपामध्ये रस्त्यावरील गर्दी टाळता यावी यासाठी चालण्याजोगे फुटपाथ का नाहीत ?

4.. कडोंमपातील वाहतुक कोंडीवर उपाय शोधण्यात लोकप्रतिनिधींना का अपयश आले ?

5..ठाकुर्लिजवळ पूर्व - पश्चिम भागाला जोड़णा-या उड्डाणपुलाचे काय झाले ?

6..रिक्शा चालकांच्या दादागिरीशी नगरसेवकांचे ( आणि प्रशासनाचेही ) काहीच देणंघेणं नाही का ? रिक्षाचालकांकडून होणारा त्रास कधी कमी होणार ?

7..भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता जादाचे 140 mld पाणी कधी कडोंमपाला मिळणार ?

8..घरी पाहुणे आल्यावर किंवा संध्याकाळी फॅमिलीला फिरवण्यासाठी - निवांत वेळ घालवण्यासाठी कडोंमपात मनोरंजनाचे ठिकाण मग ते मोठी बाग - उद्यान, vidyaan केंद्र, एखादे माहिती केंद्र, ( एखाद्या शहराच्या तोडीस तोड़ असा ) सुशोभित घाट, ( राजकीय पक्षांना निवडणुकीत घोषणा करण्यासाठी आवडणारे) एखादे मोठे स्मारक का विकसित झाले नाही ?

9..कड़ोंमपाला लागून सर्वात प्रदूर्षण करणारी डोंबिवली MIDC यामधल्या प्रदूर्षणावर का अजूनही नियंत्रण ठेवता आलेले नाही ?

10..डंपिंग ग्राउंडचा प्रश्न आजही का सुटलेला नाही ?

11.. अनेकदा निवडणुकीवर बहिष्कार टाकणा-या वेशीवरच्या गावांत सोयीसुविधा पाच वर्षांनंतरही का झाल्या नाहीत ?

12.. आधीच कड़ोंमपात सोयीसुविधांचा अभाव असतांना 27 गावांना सामावून घेत त्यांचे असे कोणते भले पालिका करणार आहे ?

या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राजकीय पक्षांनी द्यावीत. दर तीन महिन्यांनी येतो असे म्हणणारे राजकीय नेते खरेच किती वेळा आले हा संशोधनाचा विषय आहे.

राज्यातील सर्व अवैध बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेणा-या फडणवीस साहेबांनी आपण इतर पक्षांपेक्षा कमी नसल्याचे स्पष्टपणे दाखवत या पालिकेतील अवैध बांधकामांचा प्रश्न एका फटक्यात निकाली काढला आहे.

डोंबिवलीत नववर्षानिमित्त नववर्षाचे स्वागत करणारी शोभायात्रा पहिल्या वर्षापासून प्रसिद्ध आहे. असं असलं तरी गेल्या 5 वर्षात कड़ोंमपाची किती शोभा वाढवली असा प्रश्न सर्वसामान्यांनी आत्तापासूनच लोकप्रतिनिधींना आणि त्यांच्या राजकीय पक्षांना जरूर विचारला पाहिजे. कारण तेच पक्ष, तेच चेहरे घेत, पुन्हा तेच प्रश्न मांडत, त्याच प्रश्ननांवर, तीच आश्वासन देत मतांसाठी पुन्हा एकदा तुमच्या पुढे उभे रहाणार आहेत.

#KDMC

#kalyan

#dombivali

No comments:

Post a Comment