Saturday, December 20, 2014

इस्त्रोची हनुमान उडी..

इस्त्रोने उपग्रह वाहुन नेणा-या त्याच्या प्रक्षेपक किंवा रॉकेटच्या भात्यात आणखी एकाची भर टाकली आहे. GSLV MK -||| असं त्या रॉकेटचे नाव आहे. 18 डिसेंबरला चाचणी यशस्वी करतांना इस्त्रोने मानवी अवकाश मोहिमेकरता आवश्यक असणा-या अंतराळ कुपीचीही यशस्वी चाचणी केली. GSLV MK -||| या मोहिमेत नक्की इस्त्रोने काय साध्य केलं, मोहिमेची नक्की वैशिष्ट्ये होती ते आपण पाहुया...

GSLV MK ||| हे पूर्णत: नवीन प्रक्षेपक सोप्या भाषेत राकेट आहे.

याआधि आपण PSLV रॉकेट वापरले किंवा आजही वापरत आहोत ज्याचे वजन 294 टन आहे. ज्याच्या सहाय्याने 1.5 टनापर्यन्त वजनाचे उपग्रह भूस्थिर कक्षेपर्यन्त पाठवले. ( 35 ते 36,000 किमी उंचीपर्यन्त )

GSLV MK-| मध्ये ज्याचे वजन हे 402 टन होते, ज्यामध्ये आपण रशियाचे क्रायोजेनिक इंजिन वापरत 2.5 टन वजनाचे उपग्रह भूस्थिर कक्षेपर्यन्त पाठवले.

GSLV MK-|| मध्ये ज्याचे वजनही 402 टन होते, ज्यामध्ये आपण स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन वापरत 2.5 टन वजनाचे उपग्रह भूस्थिर कक्षेपर्यन्त पाठवले.

आता ज्या GSLV MK-||| या प्रक्षेपकाचे वजन हे तब्बल 630 टन आहे. त्याचा आकारहि आधीच्या GSLV पेक्षा वेगळा आहे . या नव्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने आता आपण 4 टन वजनाचे उपग्रह आपण भूस्थिर कक्षेपर्यन्त पाठवण्याची क्षमता आपल्याला प्राप्त झाली आहे.

आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी म्हणजे 7 डिसेंबरला आपण GSAT -16 हा 3.1 टन वजनाचा उपग्रह फ्रान्स देशाच्या मदतीने फ्रेंच गयाना भागातून त्या देशाच्या Arian या प्रक्षेपकाच्या सहाय्याने अवकाशात पाठवला.

थोडक्यात 2.5 टन वजनापेक्षा जास्त वजनाचे उपग्रह अवकाशात भूस्थिर कक्षेपर्यन्त पाठवायचे असतील तर आपल्याला विदेशी मदत घ्यावी लागते.

GSLV MK-||| चाचणीने आपण 4 टन वजनापर्यन्तचे उपग्रह स्वबळावर पाठवण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. GSLV MK-||| या पूर्णत: नव्या प्रक्षेपक किंवा रॉकेटच्या कार्यक्षमतेची चाचणी आपण घेतली आणि ती यशस्वी ठरली. म्हणजे अगदी जसे ठरवले होते तशी चाचणी झाली.

अर्थात GSLV MK-||| च्या आणखी काही चाचण्या घेतल्यावर हे रॉकेट व्यावसायिक उद्दाणांसाठी सज्ज होणार आहे .

भविष्यात आपण मानवी मोहिमेकडे वळणार आहोत. अशा मोहिमा या पृथ्वीपासून साधारण 100 पासून 900 किमी उंचीवर होत असतात. तेव्हा आपण 126 किमी ऊँचीपर्यन्त अंतराळ कूपी या GSLV MK -||| च्या सहाय्याने अवकाशात पाठवली आणि परत म्हणजे सुखरूप पृथ्वीवर -  अंदमानजवळ उतरवली. त्या प्रयोगाला Crew Model Retry Atmospheric Experiment म्हणजेच CARE असे नाव देण्यात आले होते . ही अंतराळ कूपी रॉकेटने अवकाशात झेप घेतल्यावर साधारण 20 मिनिटांत बंगालच्या उपसागरात समुद्रात पैराशूटच्या सहाय्याने उतरली. या कुपिची ताकद, क्षमता आपण आजमावली. कारण याच प्रकारच्या कुपितुन पुढच्या काळात आपण अंतराळवीर अवक़ाशात पाठवणार आहोत.

म्हणूनच भविष्यातील इस्त्रोच्या वाटचालिसाठी , मोठी झेप घेण्यासाठी ही मोहीम एक मैलाचा दगड ठरली. ही मोहीम यशस्वी झाल्यामुळे आपण कुठलाही प्रकारचा उपग्रह म्हणजे 4 टन वजनापर्यन्तचा उपग्रह आपण स्वबळावर पाठवू शकु. चांद्रयान - 2 मोहीम अंतर्गत आपण चंद्रावर एक उपग्रह पाठवणार असून त्याबरोबर एक रोबोट किंवा चालती छोटी गाडी चंद्रावर उतरवणार आहोत. त्यासाठी या प्रकारच्या रॉकेट किंवा प्रक्षेपकाची गरज लागणार आहे.

थोडक्यात इस्त्रोच्या इतिहासात ही मोहीम अनेक भविष्यातील मोहिमांचे दालन उघडून देणारी ठरली आहे, इस्त्रोने हनुमान उडी मारली आहे.

No comments:

Post a Comment

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...