Friday, November 7, 2014

किल्ले कशासाठी - कोणासाठी हवे आहेत....



किल्ल्याचं महत्व काय आहे हे आता काही पुन्हा वेगळं सांगायची गरज नाही. देशामध्ये सर्वाधिक #किल्ले महाराष्ट्रात आहेत. लढवय्या महाराष्ट्र, गुलामगिरी सहन न करणारा महाराष्ट्र, स्वराज्य स्थापन करणारा महाराष्ट्र.....अशा या महाराष्ट्राच्या इतिहासाचे, जडणघडणीचे किल्ले हे साक्षीदार आहेत. याच किल्ल्यावरील इतिहासावरून आणि किल्ल्यावर राजधानी स्थापन करणा-या #छत्रपतींंवरून राजकराण झाले आहे, राज्यात सत्तेची गणिते बदलली आहे.


महाऱाष्ट्रात किल्ल्याचे प्रकार, किल्ल्याशी संबंधित इतिहास, इतिहासाशी संबंधित किल्ले, किल्ल्याची रचना, त्यावरील विविध प्रकारच्या वास्तू , किल्ला किंवा त्या भागातील निसर्ग यावर आता असंख्य पुस्तके लिहीली गेली आहेत, माहिती लिहीली गेली आहे. अगदी #विजयदूर्गसारख्या किल्ल्यावरुन एका शास्त्रज्ञाने तर सूर्यावर #हेलियम वायू असतो याचा शोध लावला. एवढ्या घडामोडी घडल्या आहेत. थोडक्यात गेल्या 400-500 वर्षात महाऱाष्ट्रातील जडणघडणी या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या किल्ल्याशी संबंधित आहेत असे म्हंटले तर ते चुकीचे ठरणार नाही. मात्र सध्याची परिस्थीती लक्षात घेतली तर हे किल्ले कशासाठी असा प्रश्न मला पडतो.


नागरीकरण - सध्या राज्यात वेगाने होणारे #नागरीकरण लक्षात घेता मोकळ्या जमिनीवर डल्ला मारला जात आहे. नशीब कोणाची नजर अजुन तरी किल्ल्यांवर पडली नाहीये असंही म्हणणं आता चुकीचे होईल. कारण काही किल्ले हे गिळंकृत केेले गेले आहेत, काही किल्ल्याच्या आसपासच्या भागात जोरदार बांधकाम झाली आहेत. त्यामुळे काही दिवसांनी जमीन कमी पडू लागली तर उरलेली गरज काही प्रमाणात का होईना किल्ले भागवतील. म्हणूनच किल्ले कशासाठी हवे आहेत असा प्रश्न पडतो.


किल्ल्यावरची गर्दी - हल्ली बुडाखाली गाडी झाल्याने , बहुतेक सर्वच ठिकाणी रस्ते झाल्याने, पुस्तकातून , मोबाईलमधून, #गुगल मॅपमधून सहज माहिती उपलब्ध होत असल्याने किल्ले #सर करणे आता अवघड राहीलेले नाही. अर्थात निसर्गाच्या कृपेने काही किल्ले हे अजुनही #दुर्गमच राहीले आहेत. असं असलं तरी किल्ल्यावरील #गर्दी वाढत चालली आहे. मात्र या गर्दीमध्ये #इतिहासप्रेम, #निसर्गप्रेम, अभ्यास, एक #साहस वगैरे असं काहीही नसतं. तर निव्वळ एक  - दोन दिवसांची पिकनिक, गेटटुगेदर अशी या गर्दीची मानसिकता असते. अर्थात यातही काही गैर नाही. मात्र किल्ले किंवा अशा निसर्गाच्या ठिकाणी जात गोंधळ घालणे, त्या भागातील लोकांना त्रास देणे, शांतात भंग करणे, कचरा करणे, इंतिहास घडवणा-यांनी क्वचितच नाव लिहिले आहे त्या ठिकाणी आपल्या नावाचा , आपल्या प्रेमाचा, आपल्या संस्थेचा, ग्रुपचा उद्धार करणे असं या गर्दीचं खरं रुप आहे. त्यामुळे किल्ले कशाला हवे आहेत असं या विचित्र मानसिकता असलेल्या गर्दीला विचारावासे वाटते.


पुरातत्व खातं - निसर्ग कोणाला क्षमा करत नाही, मग तो निसर्गानेच तयार केलेला दगड का असेना. अशा या दगडांपासून बनलेले किल्ले, माणसाच्या अथक आणि विश्वास न ठेवता येणा-या कौशल्यातून बनलेले किल्ले झिजत चालले आहेत. किल्ले , त्यावरील #वास्तू जपून ठेवणे आवश्यक आहे. महाऱाष्ट्रातील बहुतेक प्रत्येक किल्ल्याला #लढाईचा इतिहास आहे, त्या लढाईच्या खाणाखूणा आजही किल्ल्याच्या अंगावर दिसतात. मात्र #पुरातत्व खातं हा असा एक विभाग आहे तो स्वतः हात लावत नाही आणि दुस-याला काही करुन देत नाही. त्यामुळे अनेक किल्ले शेवटचा घटका मोजत आहेत, काही किल्ल्यांवर तर 50 वर्षानंतर फक्त दगडांच्या राशी असतील. उलट राजस्थानसारख्या राज्याने प्राणपणाने जपले गेले आहेत. त्यामुळे आपल्या राज्यातील किल्ले का जपायचे असा प्रश्न पडतो.


पर्यंटन - महाऱाष्ट्रात बर्फ सोडला तर सगळं काही आहे.
म्हणजे सुंदर समुद्रकिनारा, वाळवंटासारखा जत - सोलापुरमधील भाग, थंड हवेची ठिकाणे, घनदाट जंगल, अभयारण्ये..... देशात जे जे पर्यंटनासाठी प्रसिद्ध आहे त्याचा प्रत्येक भाग हा आपल्या राज्यात सर्वात जमेची बाजू म्हणजे आपल्याकडे #वैभवशाली किल्ले आहेत. मात्र राज्यात येणारा परदेशी #पर्यटक, देशातील विविध भागातून येणारे पर्यंटक...ते सोडा अगदी राज्यातील नागरीक पटकन कुठला किल्ला बघायला गेला आहे अशी स्थिती, परिस्थिती नाही. #दौलताबाद,#जंजिरा,#सिंधूदुर्ग, #रायगड, #शिवनेरी असे अगदी 10 -12 किल्ले स़ोडले तर बाकीच्या किल्ल्यावर जाण्यासाठी , किल्ला बघण्यासाठी कसलीच सोयी सुविधा नाही. अगदी मुंबईत येणारा पर्यंटक मुंबईतल्या कुठल्या किल्ल्यावर जातो हा संशोधनाचा विषय आहे. फोर्ट, शीव, शिवडी, माहिम असे किल्ले मुंबईत आहेत याचा थांगपत्ता अजुन बहुसंख्य नागरिकांना नाही. थोडक्यात पर्यटनाच्या नकाशावर राज्यातील वैविध्यपूर्ण किल्ल्यांचे #मार्केटिंग झालेले नाही, त्यामुऴे किल्ले कशासाठी असा प्रश्न उभा रहातो.


अगदी एक प्रसंग सांगतो...काही वर्षांपूर्वी मी पालघरमार्गावर असलेल्या #सफाळे रेल्वे स्थानकाला जवळील
#तांदुळवाडी किल्ल्यावर मित्रांसह पावसाळ्यात गेलो होतो. पावसाळ्यात या भागातील किल्ले फिरणे म्हणजे एक वेगळीच पर्वणी. किल्ल्याला जाणारा अर्धा मार्ग पार केल्यावर किल्ल्याच्या पायथ्याशी काही छोट्या
स्फोटाचे आवाज यायला लागले. हळूहळू हे आवाज जवळ यात होते. नंतर लक्षात आलं एक मुंबईहून नक्की आठवत असेल तर माहिमभागातून आलेला , एक पिकनिक मानसिकता असलेला ग्रुप चक्क सुतळी बॉम्ब फोडत वर येत होता. आत्तापर्यंत किमान 20 एक आवाज ऐकले होते. जवळ आल्यावर त्यांनो खड़सावून विचारलं की फटाके कशाला फोडत आहात , तर उर्मटपणे त्या ग्रुपमधील एकाने उत्तर दिले की प्रतिध्वनी छान ऐकायला येतो. मग जरा दमात घेतल्यावर फटाके फोडणे बंद झाले. किल्ल्यावरुन खाली उतरायला सुरुवात केल्यावर पाठ फिरवताच पुन्हा फटाके फोडणे सुरु झाले. आता या मानसिकतेला काय म्हणायचे.....



किल्ले, त्यावरील वास्तू, त्या परिसरातील निसर्ग दिवसेंदिवस नष्ट होत चालला आहे, त्याची #पडझड होत आहे. अनेक संस्था, अनेक व्यक्ति हे टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र ही ताकद कमी पडत आहे. त्यामुळे किल्ल्यांची होणारी हानी पाहवत नाही, आपण कमी पडत आहोत ही बोच सतत मनाला टोचत रहाते. या व्यतिरिक्त अन्य कोणालाच या किल्ल्यांबद्दल आपुलकी वाटत नाही, काहीच करावासे वाटत नाही याचे दुःख होते. हजारो कोटींचे बजेट असलेली सरकारे किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काहीच ठोस करत नाहीत याचा राग येतो.


म्हणनूच हे किल्ले कशासाठी, कोणासाठी हवे आहेत असा प्रश्न पडतो.






No comments:

Post a Comment

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...