Wednesday, August 8, 2012

आईच्या गाव्वात....झोझिला पास

जम्मू- श्रीनगर-लेह-मनाली असा बाईकवरुन प्रवास करण्याचा घाट गेली पाच वर्षे मी मनात घालत होतो पण प्रत्यक्षात काही येत नव्हते. सुट्टी मिळत नव्हती , पैशांचे नियोजन काही होत नव्हते, काही ना काही निमित्त दरवर्षी व्हायचे. अखेर पाच वर्षांची भक्ती पणाला लागली आणि चक्क जेवढी प्रवासाला आवश्यक होती तेवढी सुट्टी मिळाली. मात्र बाईकवर काट मारावी लागली कारण पैशांचे नियोजन हाताबाहेर जात होते.

श्रीनगरवरुन द्रास, कारगील स्मारक, कारगील, लेह, पेंगाँग लेक, नुब्रा व्हॅली, लेह-मनाली असा प्रवासाचा बेत नक्की झाला. म्हणजे माझा मित्र मनिष मेहेंदळेने वर आखलेल्या टूरवर माझे नाव मी दोन महिने आधीच नोंदवले. बाईक नाही तर निदान फोर व्हिलरने का होईना प्रवास करायचा, या भागातील निसर्ग सौंदर्य याची देही याची डोळा बघायचे, प्रवासातील अनिश्चितेचा थरार अनुभवायचा यासाठी मी मनातून कधीच तयार झालो होतो.

जम्मूला स्वराज एक्सप्रेसने पोहचलो. अंगात जरा जास्ती कंड होता म्हणून सरकारने कंत्राट दिलेल्या सरकारी कम खाजगी बसने ( एसी बसने नाही ) श्रीनगरला निघालो. जम्मू-श्रीनगर प्रवासात शक्य असलेल्या सर्व अनिश्चितता मी अनुभवल्या. दरड कोसळल्याने एक तास बस थांबली, ठीक ठीकाणी जम्मु काश्मिर वाहतूक पोलिस घेत असलेली लाच, अरुंद रस्ते, एकीकडे उजवीकडून छातडावर येणारा डोंगर आणि खोली बघण्याची हिंमत न होणारी डावीकडची चिनाब नदीची दरी, जवाहर टनेल नंतर जम्मूतून काश्मिरमध्ये प्रवेश केल्याने वाढलेला गारवा, त्यानंतर  श्रीनगरपर्यंत मार्गावर लष्कराचा खडा पहारा  असा अनुभव घेत श्रीनगरला पोहचलो.

 श्रीनगर फिरणे वगैरे झोकात झाले आणि 22 जुलैला ख-या अर्थाने प्रवासाला सुरुवात झाली. बर्षाच्छादित हिमालयाचे अजस्त्र डोंगर, बाजूने जोराने वहाणा-या नद्या बघत,प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण सोनमर्ग आणि त्यानंतर अमरनाथ यात्रेकडे नेणारा बालतागचा तळ पार करत कधी घाट चढायला सुरुवात केली हे कळलेच नाही. घाटाच्या वरतून बालतागचे फोटो काढत असतांना हाच तो झोझीला पास म्हणजे झोझीला घाट असल्याचं मित्राने सांगितले. काहीसा जोरदार वारा, थंड हवा अनुभवत गाडी घाट वरती चढत होती आणि बालतागच्या तळावरील माणसे,  तंबू मुंगीपेक्षा लहान किंवा दिसेनाशी होतांना दिसत होती. मात्र घाट चढतांना तळाला गेलेला बालतागचा तळ बघून धडकी भरायला लागली.

एव्हाना उजवीकडे खाली खोलवर असलेला बालतागचा तळ मागे पडला, गाडी आणखी डोंगराच्या कुशीत आत वळली आणि पुढे काय पान वाढून ठेवले आहे याची कल्पना आली. जेमतेम एक ट्रक जाईल एवढा रस्ता, डावीकडे छाती पुढे काढणारा डोंगर तर आ वासून गिळू पहाणारी-- कदाचीत फुटांमध्ये मोजली तरी समजणार नाही एवढी उजवीकडची खोल दरी अंगावर काटा आणत होती.



साधारण 9 किलोमीटर लांबीचा, 11,649 फुट उंचीवरचा आणि मुख्य म्हणजे काश्मिर - लडाख भागाला जोडणारा हा झोझीला पास ह्रदयाचे ढोके वाढवणार हे घाट चढतांना सुरुवातीलाच लक्षात आले.

डोक्याच्यावर असलेल्या डोंगराच्या भागावर आपण वेडेवाकडी, दिर्घ वळणे घेत कसे पोहचू शकतो हीच गोष्ट  उलगडत नव्हती. थो़ड्या वेळापूर्वी ज्या चढ्या रस्त्यावरुन आपली गाडी धापा टाकत वर चढत होती तो रस्ता आता चक्क पायाखाली खोलवर दिसतो ही गोष्ट धडकी भरवणारी होती.


बहुतेक प्रत्येक वळणावर, मोक्याच्या ठिकाणी लष्कराचे जवान या अवघड रस्त्याचे वाहतूक नियंत्रण करतांना दिसत होते. शक्य होईल तिथे एका बाजूच्या गाड्यांना थांबवून दुस-या बाजूच्या गाड्यांना वाट मोकळी करुन देत होते. खरं तर या मोक्याच्या ठिकाणी अतिरेक्यांचा शिरकाव होऊ नये यासाठी जाडजूड लष्करी ड्रेस अंगावर बाळगत, हातात रायफली सज्ज ठेवत आपले जवान या झोझीला पासचे संरक्षण करत  होते. आम्ही हात हलवत त्यांना अच्छा किंवा टाटा म्हणा अभिवादन करत होतो तेव्हा त्यांना किती आनंद होत होता हे त्यांच्या चेह-यावरुन स्पष्ट समजत होते. सतत चौकस नजरेने पहाणी करणा-या, कडाक्याच्या थंडीत दिवसभर सतत उभे रहाणा-या, जराशी चूक होऊ नये याचा ताण मनावर झेलणा-या या जवानांची काय अवस्था होत असेल याची आपल्याला कधीच कल्पना करता येणार नाही. त्यामुळे आपल्यासारखे  नागरीक जेव्हा हात हलवतात तेव्हा त्यांना किती आनंद होतो हे तिथे जाऊनच अऩुभावावे लागेल.

डोळ्यात न मावणारा उंच डोंगरांचा आणि खोल द-यांचा पॅनारॉमिक व्ह्यू  मी कॅमे-यात 18-55 च्या लेन्सने  किती तरी वेळा टिपत होतो. पण त्या फोटोला वास्तवाची सर कधीच येणार नाही. दूरवर झोझीला पासचे टोक दिसत होते आणि तिथून येणारी लष्करी वाहने, खाजगी ट्रक टिचभरपण वाटत नव्हती. घाटाचे ते पॅनारॉमिक व्ह्यु डोळ्याने बघतांना अक्षरशः शक्क झालो होतो.

गाडी अर्थात हळुहळु घाट वर चढत होती. गाडीच्या मधल्या रो च्या सीटवर डावीकडे बसलो होतो. डावीकडे-उजवीकडे वळणे घेत प्रवास सुरु होता. घाट चढत असतांना काही मिनिटे गाडी थांबवावी लागली. कारण डोळ्यासमोर काही फुट अंतरांवर डावीकडच्या डोंगर उतारावरुन दगड धोंडे आणि माती म्हणजेच दरड खाली पडतांना बघितली आणि छातीत धस्स होणे म्हणजे काय असते ते अऩुभवले. दगडांचा आकार छोटा असला तरी शेवटी दरड ती दरड. अवघी  
काही मिनीटे गाडी थांबली खरी , पुढे असलेल्या ट्रकने जोरात एक्सेलेटर मारत ट्रक पुढे काढला आणि त्याच वेगाने आमच्या गाड्या पण निघाल्या. मी तर डावीकडे बसलो होतो, त्यामुळे दगडाने मलाच पहिले गाठले असते, भितीने डावीकडच्या उतारावरील प्रत्येत दगडाकडे बघत कोण खाली येत नाही ना याकडे माझे संपूर्ण लक्ष होते. माझा डावा हात गाडीच्या खिडकीवर होता, तेव्हा मनिषने सांगितले की हात आतमध्ये घे आणि काच बंद कर, ताबडतोब काच बंद झाली. आमची गाडी पुढे गेली आणि जीव भांड्यात पडला.

असे एकदा नव्हे दोनदा झाले.

या झोझीला पासवर काही ठराविक अंतरावर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने ( बीआरओ ) रस्ता मोकळा करण्यासाठी जेसीबी सारखी यंत्रे ठेवलेली दिसतील. मे-जून महिन्यात या यंत्राना हा रस्ता मोकळा करण्याचे काम सारखे करावे लागते. रस्ता वाहतूकीसाठी सुरळित ठेवण्यासाठी बीआरओ जेवढे कष्ट घेते त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. 

थक्क करणारा हा प्रवास शेवटी घाटाच्या टोकाला एका वळणावर येऊन पोहचला. तिथे एका लष्करी अधिका-याचे छोटे स्मारक होते. कॅप्टन एक. सी. वधेरा असे त्याचे नाव. त्या वळणालाच " कॅप्टन कर्व्ह " असे देण्यात आले आहे. 1954 च्या वर्षात हिवाळा संपतांना म्हणजे मे नंतर, म्हणजे बर्फ वितळत असतांना या अधिका-याने हा झोझीला पास चा रस्ता वाहतूकीसाठी खूला करतांना अपार मेहनत घेतली. मात्र त्या वळणावरुन जात असतांना त्याची जीप खाली दरीत कोसळली आणि त्यात त्याला मरण आले. म्हणनु त्याचे त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आले आहे.

मात्र अशीही माहिती मिळाली की हा रस्ता खूला केल्यावर या मार्गावरुन पहिली गाडी माझी जाईल अशी अपेक्षा त्यांने ठेवली होती. मात्र वरिष्ठांनी मात्र असे त्याला करु दिले नाही, त्यामुळे  म्हणे त्यांने गाडी खाली दरीत लोटली. काहीही असो असा अवघड रस्ता ते सुद्धा त्या काळी खुला करणे म्हणजे  किती दिव्य आहे हे घाट पार करतांना आम्हाला चांगलेच समजले होते.

यापेक्षा थराररक गोष्ट म्हणजे 1948 च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये "ऑपरेशन बायसन " या नावाने भारतीय सैन्याने झोझीला पास, द्रास, कारगील जिल्हा परत मिळवला. यामध्ये थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्या वेळी ऑक्टोबर महिन्यात याच रस्त्याने भारतीय सैन्याने अमेरिकन बनावटीचे हलक्या वजनाचे स्टुअर्ट टँक म्हणजे रणगाडा झोझीला पासने चढवत द्रासमध्ये आणले.  ऑक्टोबर म्हणजे बर्फ पडायला सुरुवात झाली असणार. आत्ताच्या तुलनेत त्या काळी रस्ता खुला करण्याच्या पद्धतीमध्ये जमीन अस्मानचा फरक असणार. म्हणजे रस्ता नुसता खुला करणे नाही तर 14 टन वजनाचे हे रणागाडे वरती चढवणे तेही हिवाळा सुरु झाला असतांना हे किती कर्म कठिण, संयमाची परिक्षा पहाणारे असेल याची आपण कल्पनासुद्धा करु शकणार नाही. अर्थात हे अशक्य ते शक्य भारतीय सैन्याने करुन दाखवले. एवढ्या उंचीवर टँक आलेले बघुन पाकिस्तानी सैन्याला तेव्हा चांगलाच धक्का बसला असणार. अर्थात हा भाग भारताने परत जिंकला हे काही वेगळे सांगायला नको.

डोळ्यात न मावणारा हा घाट-पास अखेर संपला. लगेचच पुढे सपाटी लागली, रस्ताही चांगला लागला. असं असलं तरी दोन्ही बाजूला उंच डोंगराची साथ काही संपत नव्हती. लगेचच झोझीला पास चा बोर्ड लागला, ' वेलकम टू लडाख रिजन 'असा  बोर्ड बघितल्यावर आम्ही फोटो काढण्यासाठी पुन्हा थांबलो.

त्याच्याच पुढे काही अंतरावर एक लष्करी ट्रक उभा होता. अतिरेक्यांनी या परिसरात तीन किमीच्या परिघात काही एलईडी पेरलेले असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी जॅम करण्याची यंत्रणा या ट्रकमध्ये होती. या यंत्रणेचे नियंत्रण करणारा जवान हा बीड जिल्ह्याचा होता. त्याच्याशी काही वेळ गप्पाही मारल्या. तेव्हा त्याने दिलेली माहिती पुढीलप्रमाणे......लष्कररीदृष्ट्या हा पास अत्यंत महत्त्वाचा आहे. अमरनाथ यात्रेमुळे आणि लडाखमध्ये येणा-या पर्यंटकांमुळे या मार्गावर मोठी ये-जा असते. त्यामुळे या झोझीला पासवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असते. अतिरेक्यांचा धोका पूर्वी या मार्गावर होता, मात्र गेल्या काही वर्षातील लष्करी कारवायांमुळे आता हा मार्ग सुरक्षित झाला आहे. तरीही या मार्गा वर लष्कराचा खडा पहारा ठेवावा लागतो......द्रासकडे जाणारा मार्ग खुला आणि सुरक्षित ठेवावा लागतो.

आमचा प्रवास झाला तो जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात , नक्की तारीख सांगायची तर 22 जुलै, म्हणजे बर्फ वितळल्यानंतर आम्ही प्रवास करत होतो. वातावरण स्वच्छ होते, म्हणजे अगदी दूरवरचे सहज  दिसत होते. हे मुद्दाम सांगायचे कारण की जर तुम्ही मे किंवा जून महिन्यात याच भागातून प्रवास केला तर परिस्थिती वर सांगितल्यापेक्षा आणखी भयानक नक्कीच असणार... नाही असेलच. कारण त्या महिन्यांत नुकतंच बर्फ वितळायला सुरुवात झालेली असते. रस्त्यावर बर्फ मिश्रीत चिखल असतो, त्यावरुन गाडी रेटायची म्हणजे एक दिव्यच असते. गाडी अनेकदा चिखलात फसते, घसरते. तेव्हा इथे चुकीला क्षमा नाही, अंदाज बरोबरच आला पाहिजे, चुकता कामा नाही. खरं तर तुम्हाला आजुबाजुचे अनेकदा दिसत नाही. कारण धुके आणि कधीकधी पाऊस यामुळे तुमच्या बाजूला किती खोल दरी आहे याचा अंदाज तुम्हाला लावता येता नाही. कधी कधी अज्ञानात सुख असते असं म्हणतात, ते खरं या ठिकाणी उपयोगी पडेल. तुमच्या आजुबाजुला काय आहे याची जाणीव न झाल्याने प्रवास फक्त रस्त्याकडे बघत होतो.

तेव्हा अशा या झोझीला पास चा टप्पा मग तो कुठल्याही महिन्यात पार कराल, त्याच्या दुस-या टोकाला पोहचाल तर तुम्हीही म्हणाल " आईच्च्या गावात...झोझीला पास ".......




   

4 comments:

  1. लेख खुपच छान लिहिला आहे. लेख वाचताना मीदेखील जम्मू-श्रीनगरची सफर केल्याचा अनुभव आला. खुपच सुंदर !!!! i miss it :(

    ReplyDelete
  2. लेख खुपच छान लिहिला आहे. लेख वाचताना मीदेखील जम्मू-काश्मिरची सफर करत आहे असा अनुभव आला. खुपच सुंदर...i miss it !!!

    ReplyDelete

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...