पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

Sunday, July 10, 2011

साधना ताईंची आठवण
बाबा आमटेंना प्रत्येकक्षणी साथ देणा-या साधना ताईं आता त्यांच्याबरोबर कायम सहवास रहावा यासाठी आपल्या सर्वांना सोडून निघून गेल्या. या निमित्ताने 2002च्या डिसेंबर महिन्यात पूर्व महाराष्ट्रातील सायकल मोहिमेतील आनंदवनमधील त्यांच्या भेटीच्या आठवणी ताज्या झाल्या.

सायकल मोहिमेत नागपूर-भंडारा-गोंदिया-गडचिरोली-चंद्रपूर असा प्रवास करत आम्ही पाच सायकलस्वार आनंदवनमध्ये एका दुपारी आम्ही दाखल झालो. सायकल प्रवासाने बिघडलेला आमचा अवतार ठिकठाक करत विकास आमटे ह्यांची वाट बघत आम्ही आनंदवनच्या कार्यालयात थांबलो. थोड्याच वेळात विकास आमटे आले आणि आमच्याशी 40 मिनिटे गप्पा मारल्या. सायकल प्रवासाचा हेतू, प्रवासातील अनुभव, आनंदवनची उभारणी, आनंदवनातील सोयी, तेथील विविध उद्योग यावर भरपूर चर्चा त्यांनी केली, माहिती सांगितली. बाबा आणि ताई तुम्हाला थोड्याच वेळात भेटतील, तोपर्यंत तुम्ही आनंदवन बघा असं सांगत विकास आमटे ह्यांनी आमचा निरोप घेतला.

आनंदवनमध्ये फेरी मारतांना तिथला अद्भुत असा चमत्कार बघत आम्ही अक्षरशः भान हरवून गेलो होतो. तेथून पुन्हा कार्यालयाजवळ आलो, बाबा आमटे ह्यांना त्यांच्या गाडीतून बाहेर येतांना बघितलं आणि आम्हाला फक्त वेड लागायचं बाकी होतं. आत्तापर्यंत विविध व्यक्तिंकडून, पुस्तकांतून, वर्तमानपत्रांमध्ये येणा-या बातम्यांमधुन ऐकलेला देव माणुस चक्क आमच्या समोर उभा होता. हसत हसत त्यांनी आमच्याशी शेकहँड केलं. एकाच्या खांद्यावर हात ठेवत त्यांनी आमच्या सायकल प्रवासाबद्दल माहिती विचारली, अनुभव विचारले. मी मनाने अजुनही तरुण आहे, पण शरीर साथ देत नाही, नाहीतर तुमच्याबरोबर सायकलने आलो असतो असे ते म्हणाले.

तेवढ्यात मुलांनो तुम्ही कुठुन आलात  ? ” अशी प्रेमळ हाक आमच्या मागे ऐकु आली. बघतो
तर काय साधनाताई समोर उभ्या होत्या. आम्ही आमच्या सायकल मोहिमेची माहिती सांगितली. कल्याण-डोंबिवलीची तरुण मुलं तीही या भागात सायकलने फिरत आहेत याचं त्यांना भारी आश्चर्य वाटत होतं. तुम्हाला कुठे त्रास तर झाला नाही नाही, लागल नाही ना ? अशी आपुलकीने चौकशी केली.  असाच प्रवास करा, खुप अनुभव मिळेल, तुम्ही अनुभवाने श्रीमंत व्हाल अस बहुमुल्य सल्लाही ताईंनी दिला. ताईंनी त्यांचे “  समिधा  हे पुस्तकसुद्धा आम्हाला भेट दिले. सायकल प्रवासात आम्ही ज्या ठिकाणी जात होतो, तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया लिहुन घेत होतो. बाबा आमटे ह्यांनी स्वतः आणि साधानाताईंच्या वतीने पाच ओळींचा संदेश लिहीला. आजही तो कागद जपून ठेवला आहे. 

खरं तर तेव्हा आमच्याकडे दोन कॅमेरे होते. मात्र या देव माणसांच्या भेटीने आम्ही इतके भारावून गेलो होतो की फोटो काढण्याचे भानसुद्धा राहिले नाही. भेट फक्त 1 मिनीटांची झाली. मात्र मनाने तरुण असलेल्या बाबांचे शब्द आणि साधनाताईंचा सल्ला आजही मनात घर करुन आहे, भेट अगदी कालपारवा झाल्यासारखी मनात आजही एकदम ताजी आहे.

2 comments:

 1. चाणक्य मंडल प्रकाशनाच्या महाराष्ट्रातील समाजसुधारक पुस्तकामध्ये साधानाताईंवर मला लिहायचे होते. त्यावेळी त्यांचे 'समिधा' हे अत्यंत साधे प्रामाणिक कोणताही अभिनेवेश नसलेले पुस्तक वाचले. त्यानंतर एक पुण्यात प्रकाश आमटेंशी ते पुण्यात साधना ताईं बद्दल बोलण्याचा योग आला होता.
  बाबा आमटेंसारख्या 'हिमालयाची सावली' असणा-या, आनंदवनातल्या वेगवेगळ्या शिबिरांमध्ये जाऊन आलेल्या माझ्या मित्रांवर माया करणा-या 'निर्व्याज आजी'ला भेटण्याची माझी मनापासून इच्छा होती ती आता अपूर्णच राहिली आहे.

  ReplyDelete
 2. Seriously.... I have that copy with me....
  it reminded me too with similar passion, they both really had magnanimous personalities....

  Regards
  Prathamesh

  ReplyDelete