आयएनएस ताबर ( फ्रिगेट )
यापुढे भारतीय नौदलाच्या बहुतेक सर्व युद्धनौका या स्टेल्थ तंत्रज्ञानाच्या असणार आहेत. एवढंच नाही तर जगात बलाढ्य नौदल असलेले अमेरिका, रशिया, फ्रान्स,इंग्लंड, चीन, जपान सारखे अनेक देश स्टेल्थ तंत्रज्ञानावरच भर देत आहेत. फक्त नौदलापुरते नाही तर लढाऊ किंवा बॉम्बफेकी विमानेसुद्धा स्टेल्थ तंत्रज्ञानाची कशी असतील याकडे बलाढ्य वायु सेना असलेले देश लक्ष देत आहेत.
या तंत्रज्ञानामुळे लढाऊ विमान किंवा युद्धनौका रडारवर अदृश्य होते असा सर्वसान्यांचा सर्वसाधारण समज आहे. खरं तर या तंत्रज्ञानामुळे विशिष्ट अंतरापर्यंत विमान किंवा युद्धनौकेचं अस्तित्व रडारवर लक्षात येत नाही. जेव्हा अस्तित्व लक्षात येते तोपर्यंत ते विमान, युद्धनौका शत्रूवर निर्णायक प्रहार घालण्यासाठी सज्ज झालेले असते किंवा हल्ला केलेला असतो.
एवढंच नाही एखादे क्षेपणास्त्र, पाणबुडीसुद्धा स्टेल्थ तंत्रज्ञानाने कशी अवगत असेल याकडे लक्ष देण्यात येत आहे. तेव्हा स्टेल्थ तंत्रज्ञान म्हणजे काय, हे तंत्रज्ञान तयार करण्यासाठी कुठल्या घटना, गोष्टी कारणीभूत ठरल्या ते आधी बघुया.
रडारचा शोध
दुसरे महायुद्ध अनेक शोध, तंत्रज्ञानाला जन्म देऊन गेले. अणु भट्टी, अणु बॉम्ब, जेट विमान, क्षेपणास्त्र असे अनेक युद्धपयोगी शोध, तंत्रज्ञान त्या काळात जन्माला आली. त्यापैकी एक महत्त्वाचा शोध म्हणजे रडारचा शोध. या तंत्रज्ञानाने युद्धाचे पारडे फिरवले असे म्हणता येणार नाही, पण अनेक निर्णायक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भुमिका बजावली.
खरं तर ध्वनी तरंग किंवा विद्युत चुंबकीय लहरी हे एखाद्या गोष्टीवर आदळून परत येतात , किंवा उत्सर्ग करणा-या स्त्रोतापासून या लहरी पकडता येणे शक्य होते आणि या सर्वांमुळे त्या गोष्टीचे अस्तित्व समजते हे साधारण 1920 च्या लक्षात आले होते. त्यातच या तंत्राचा वापर करत अवकाशाचा वेध घेण्यासाठी करायला सुरुवात झाली , रेडिओ टेलिस्कोप उभारण्याचे काम काही शास्त्रज्ञांनी हाती घेतले. दुसरे महायुद्ध सुरु होण्याच्या काही काळ आधी म्हणजे साधारण 1934-35 मध्ये अमेरिका, फ्रान्स ह्यांनी रडार विकसित केले. मात्र त्यांची क्षमता ही फक्त काही किलोमीटरपर्यंतची वस्तू ती सुद्धा ही फक्त काही उंचीवरची, एवढी माहित करुन घेण्यापूरती होती. म्हणजे जमिनीवर काही मीटर उंचीचा टॉवर उभारून काही कि.मी.पर्यंतची वस्तूचे अस्तित्व समजण्यापर्यंत रडारची क्षमता होती.
ख-या अर्थाने रडार विकसित करत युद्धासाठी वापरण्याचा मान इंग्लंडकडे जातो. प्रसिद्ध Battle Of Britan या युद्धात 1940 च्या जुलै ते ऑक्टोबर या काळात नाझी जर्मनीच्या वायूदलाने लंडन आणि परिसरावर अविरत बॉम्बहल्ले केले होते. नुकसान होऊनही इंग्लडने हार मानली नाही आणि नाझी जर्मन वायु दलाचेही नुकसान केले. या यशाचे गुपित हे रडारच्या तंत्रज्ञानामध्ये लपले आहे. हवाई हल्ला रोखण्यासाठी जगात इंग्लंडने सर्वप्रथम रडारचा वापर केला. त्यामुळे इंग्लडच्या पुढे असलेल्या 35 किलोमीटर रुंदीच्या इंग्लिश खाडीवरुन येणा-या नाझी जर्मनीच्या विमानाचे अस्तित्व ताबडतोब समजायचे. तेव्हा इंग्लडंचे वायु दल ताबडतोब सज्ज होत बॉम्ब हल्ला होण्याआधी अनेकदा नाझी जर्मनीच्या लढाऊ आणि बॉम्बफेकी विमानांना गाठायचे. यामुळे 1800 पेक्षा जास्त नाझी जर्मनीची विमाने इंग्लडच्या वायु दलाने जमिनीवर आणली. इंग्लंडच्या वैमानिकांच्या शौर्याबरोबर रडार तंत्रज्ञानालासुद्धा या यशाचे श्रेय द्यायला पाहिजे.
सोनारचा शोध
जगभर प्रवास करणा-या मोठ्या बोटींच्या सुरक्षेसाठी " सोनार " चे तंत्रज्ञान 1910 च्या दशकांत विकसित व्हायला सुरुवात झाली. ध्वनी लहरी फेकणा-या या तंत्रज्ञानामुळे समुद्राची खोली समजण्यास मदत झाली. जसे हे तंत्रज्ञान विकसित झाले त्याचा युद्धपयोगी वापरावर अभ्यास सुरु झाला. पाणबुड्यांना शोधण्यासाठी युद्धनौकांनी या तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली. त्यामुळे पाणबुड्यांसाठी हे तंत्रज्ञान धोक्याचे ठरु लागले होते. तेव्हा पाणबुड्यांच्या बचावासाठी 1943 ला स्टेल्थ तंत्रज्ञानाने युक्त तब्बल 4 पाणबुड्या नाझी जर्मनीने विकसित केल्या. यासाठी पाणबुडीच्या काही विशिष्ट भागावर चक्क काही मिलीमीटर जाडीचे रबर बसवले होते. यामुळे या प्रकारच्या पाणबुड्यांना शोधणं काहीसे अवघड झाले होते.
थो़डक्यात काय तर कित्येक किलोमीटर अंतरावरुन हवेतील विमानाचे अस्तित्व " रडार" मुळे आणि पाण्यातील पाणबुडीचे अस्तित्व रडारसारखेच तंत्रज्ञान असलेल्या " सोनार " मुळे समजण्यास मदत झाली होती. तेव्हा आता रडार, सोनारपासून बचाव करण्यासाठी नवीन कल्पनांच्या डोकेफोडीला सुरुवात झाली आणि स्टेल्थ तंत्रज्ञान अस्तित्वात आले.
स्टेल्थ तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये
विद्युत लहरींचे परावर्तन
रडार हे विद्युत चुंबकीय तरंग प्रसारित करते, ज्या वस्तुवर हे तरंग आदळतात त्यापैकी काही तरंग हे परत तरंगाच्या स्त्रोताकडे येतात. याचे संगणक विश्लेषण करतो आणि त्यामुळे वस्तुची जमिनीपासुनची उंची, वस्तुचा वेग तसंच आकारही समजतो. यामुळे ती वस्तु नक्की काय आहे ते समजण्यास मदत होते.
मात्र स्टेल्थ तंत्रज्ञान वापरतांना वस्तुच्या पृष्ठभागाची विशिष्ट रचना केली जाते. यामुळे तरंग हे त्या वस्तुवर आदळल्या तर ते इतरत्र फेकल्या जातात, तसंच फार कमी तरंग परत त्या स्त्रोताच्या दिशेने जातात. यामुळे रडारच्या संगणकाला त्या वस्तुचे अस्तित्व समजण्यास कठीण होते.
याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे जगातील पहिले स्टेल्थ तंत्रज्ञानाने युक्त, 1981 ला सेवेत दाखल करुन घेतलेले अमेरिकेचे बॉम्बफेकी विमान F-117 . या विमानाकडे बघितल्यावर त्याचा विचित्र आकार पाहून आश्चर्य वाटेल. मात्र तरंग किंवा लहरी वेगवेगळ्या दिशेने फेकल्या जातील अशी विशेष रचना या विमानाची होती. यामुळे रडारवर या विमानाला चटकन बघणे शक्य नव्हते.
तर युद्धनौकांपैकी एक उदाहरण म्हणजे HMS Helsingborg ही स्वीडन देशाची क्षेपणास्त्रवाहु युद्धनौका. ही सुद्धा विद्युत लहरी , तरंग पृष्ठभागावर पडल्यावर जास्तीत जास्त इतरत्र लहरी परावर्तीत करणा-या तंत्रज्ञानाचे उत्तम उदाहण आहे. या विशिष्टय आकारामुळे विद्युत चुंबकीय लहरींचे विविध दिशांना परिवर्तीत होतात आणि युद्धनौकेचे रडारवर अस्तित्व समजून येत नाही.
आकारातील चपटेपणा
विमान किंवा युद्धनौकेचा आकार नुसता वैशिष्ट्यपुर्ण असून चालत नाही तर त्याचा आकारही कमीत कमी किंवा चपटा असावा लागतो. याचं सुंदर उदाहरण म्हणजे अमेरिकेचे अवाढव्य, लांब पल्ल्याचे अण्वस्त्रवाहू बॉम्बफेकी विमान B-2 विमान. या आकारामुळे या विमानाला विमान म्हणावे की ग्लायडर असा प्रश्न पडतो. याचा आकारच चपटा असल्याने हे बॉम्बफेकी विमान रडार चटकन दिसणे खुप कठीण असते. कोसोवो वॉर, २००३ चे इराक युद्ध, सध्या सुरु असलेला लिबियाचा संघर्ष यांमध्ये या विमानाने रडारला चुकवत यशस्वी बॉम्बफेक केली आहे.
विमानाचा धातू
विमान किंवा युद्धनौका बनवतांना विशेषतः त्याच्या बाहेरच्या दर्शनी भागासाठी विविध धातूंचा वापर केला जातो. मात्र रडारच्या विद्युत चुंबकीय लहरी किंवा तरंग या धातूवर आदळून जास्तीत जास्त परावर्तीत होतात. तेव्हा त्यावर उपाय म्हणून हल्ली दर्शनी भाग हा कार्बन फायबर पासून बनलेला असतो किंवा दर्शनी भागावर विशिष्ट धातूच्या रंगाचा काही सेंटीमीटर जाडीचा थर लावलेला असतो. त्यामुळे काही प्रमाणात लहरींमधील ऊर्जा शोषली जाते. तर कार्बन फायबरमुळे विमान, युद्धनौकेचं वजनही कमी होण्यास मदत होते. असं असलं तरी रडारवर दिसतील एवढ्या प्रमाणात थोड्या का होईना लहरी परावर्तीत होत असल्याने हा उपाय स्टेल्थ तंत्रनाकरता खात्रीशीर ठरलेला नाही.
इंजिनातून बाहेर पडणारी उष्णता
विमान किंवा युद्धनौकेच्या इंजिनातून इंधनाच्या ज्वलनामुळे उष्णता मोठ्या प्रमाणात सतत बाहेर पडत असते. यामुळे उष्णतेचा मागोवा, शोध घेणा-या रडार किंवा क्षेपणास्त्राला वेध घेण्याची एक आयती संधी मिळते. तेव्हा इंजिनामधील उष्णता बाहेर फेकतांना ती विस्तारित प्रमाणात बाहेर न पडता तिचा आकार कसा मर्यादीत असेल याकडेही सध्या विशेष लक्ष दिले जात आहे.
पाणबुडीमध्ये स्टेल्थ तंत्रज्ञान
ज्या प्रमाणे विमान किंवा युद्धनौकेचा आकार बदलणे सहज शक्य आहे ते पाणबुडीच्याबाबतीत अतिशय अवघड आहे. तेव्हा पाणबुडीत अत्याधुनिक सोनार यंत्रणा, पॅसिव्ह-अक्टिव्ह सोनारचा खुबीने वापर, पाणबुडीतील इंजिनाचा आवाज कमी करण्याकडे कल अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन पाणबुडी ही जास्ती जास्त स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त करण्यात आली आहे.
स्टेल्थ तंत्रज्ञानाचे शत्रू
स्टेल्थ तंत्रज्ञानावर मात करण्यासाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. स्टेल्थ तंत्रज्ञानानेयुक्त विमान किंवा युद्धनौका या रडारवर चटकन दिसाव्यात यासाठी जास्तीत जास्त आणि विविध क्षमतेच्या रडारची एक श्रुंखला उभारली जाते. यामुळे वस्तुचे ठिकाण अचूक आणि लवकर समजण्यास मदत होते. तसंच समुद्राच्या पृष्ठभागावरचे रडार इथपासून विमानवर आरुढ केलेले रडारचे तंत्रज्ञान यामुळे सर्व स्तरातील वस्तु ओळखणे शक्य झाले आहे. अत्याधुनिक कृत्रिम उपग्रहामुळे स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त विमान ओळखणेसुद्धा अवघड नाही .
स्टेल्थ तंत्रज्ञानानेयुक्त काही विमाने, युद्धनौका यांची ओळख
F-22 - अमेरिकेचे सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान, ह्याला रॅप्टर ( डायनासोरची एक लहान आकाराची जात जी सर्वात बुध्दिमान होती ) असेही म्हणतात. स्टेल्थ तंत्रज्ञानाच्या सर्व खुबी यामध्ये आहेत.
Sukhoi PAK FA - रशियाचे लढाऊ विमान. सध्या याच्या चाचण्या सुरु असून ते अमेरिकेच्या F-22 ला स्पर्धा करत आहे. २०१५ पर्यंत ते रशियाच्या वायु दलात दाखल होईल.
Chengdu J-20 - बराक ओबाम ज्या वेळी भारत दौ-यावर आले तो मुहर्त साधत चीनच्या या स्टेल्थ तंत्रज्ञान असलेल्या विमानाने पहिले उड्डाण केले. 2015 पर्यंत या विमानाचा वायु दलात समावेश करण्याच्या दिशेने चीन पाऊल टाकत आहे.
भारताच्या Advance Medium Combat Aircraft या स्टेल्थ तंत्रज्ञानायुक्त विमानाचा आराखडा अजुन कागदावर आहे. 2020 पर्यंत हे विमान वायु दलात दाखल होईल असा अंदाज आहे.
Black Hawk - अमेरिकेचे हे बहुउपयोगी हेलिकॉप्टर. ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी या हेलिकॉप्टरची स्टेल्थ आवृत्ती वापरण्यात आली होती. त्यामुळेच रडारला चुकवून पाकिस्तानात आत घुसणे शक्य झाले होते.
La Fayette class - फ्रान्स नौदलाची 3600 टन वजनाची युद्ननौका. अशा एकुण 5 युद्धनौका फ्रान्सने बांधल्या आणि 3 देशांसाठी बांधत निर्यात केल्या. वैशिष्ट्यपू्रर्ण रचना ज्यामध्ये युद्धनौकेच्या बाजू विशिष्टय प्रकारे बांधण्यात आली आहे. यामुळे रडारवर या युद्धनौकेचा चटकन ठावठिकाणा लागत नाही.
अशी विविध विमाने, युद्धनौका विकसित केल्या जात आहेत. क्रुझ क्षेपणास्त्र जे जमिनीपासून किंवा समुद्र पातळीपासून फक्त काही मीटर उंचीवरुन जात लक्ष्य गाठते ते सुद्धा एक प्रकारचे स्टेल्थ तंत्रज्ञानाचा उपयोग करते. एवढंच नाही तर युद्धात सैनिक त्या भागातील रंगाला अनुसरुन तयारी करतो म्हणजेच Camouflage
करतो हा सुद्धा स्टेल्थ तंत्रज्ञानाचा प्रकार झालाच की. उदा. वाळवटात लढतांना साधारण खाकी,राखाडी रंगाचे गणवेश घातले जातात. जंगलाच लढतांना गडद हिरवा रंगाचा गणवेश, गणवेशावरील चकाकणारे भाग काळे करणे, चेह-याला काळा रंग लावणे हे सुद्धा एक प्रकारचे स्टेल्थ तंत्रज्ञानासारखेच झाले की.
तर असे हे स्टेल्थ तंत्रज्ञान आता संरक्षण क्षेत्रात आपली जागा पक्की करत आहे, पुढील काळात ते निर्णायक भुमिका बजावणार आहे. म्हणुनच आता यापुढील लढाई ही स्टेल्थ तंत्रज्ञानाची असणार आहे.
अतिशय उपयुक्त माहिती ..
ReplyDeleteधन्यवाद