Wednesday, July 20, 2011

चेचन्या- रशियाचे धुमसते काश्मिर


नागालॅडच्या क्षेत्रपळापेक्षा थोडे कमी क्षेत्रफळ असलेले  रशियातील चेचन्या राज्य ( 15,300 चौरस किमी )  रशियाची डोकेदुखी बनले आहे. रशियाच्या विविध भागात, किंवा सरकारी स्थळांच्या इथे अधुनमधुन अपहरण , बॉम्बस्फोट असा तडाखा दे चेचन्याच्या बंडखोरांनी ( की स्वातंत्र्यवीर!नी ) ( स्वातंत्र्य ? ) लढा सुरु ठेवला आहे. रशियाला दणका देण्यासाठी अल कादाची मदत घेण्यापर्यंत ही लढाई पोहचली होती.

जगात गाजललेल्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या विविध ओलिस नाट्याला या काळात रशियाला सामोरे जावे लागले ते चेचन्यातील बंडखोरांमुळे. यामध्ये एकदा तर चेचन्या बंडखोरांनी एकाच वेळी 2000 पेक्षा जास्त नागरिकांना तब्बल 9 दिवस ओलिस ठेवले होते.

रशियाच्या एकदम दक्षिणेला कॅस्पियन समुद्राजवळ असलेल्या चेचन्यात गेले काही महिने वातावरण जरी शांत दिसत असले तरी बंडखोर संधीची वाट पाहत आहेत. यामुळे रशियाला चेचन्यामधील हालचालींकडे बारीक लक्ष ठेवावे लागत आहे.


धर्मयुद्ध

चेचन्यातील वाद किंवा लढाई म्हणा ही थेट एका धर्माविरुद्ध दुसरा धर्म अशी आहे. चेचन्यातील एकुण लोकसंख्येपैकी ( सुमारे १२ लाख ) ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही सुन्नी मुस्लिम आहे. स्वतंत्र राष्ट्राची मागणी ही काही सोव्हिएत महासत्ता कोसळल्यानंतर करण्यात आली नसून ती २०० वर्षे जुनी आहे. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात रशियाने जेव्हा साम्राज्यविस्ताराला सुरुवात केली तेव्हा कॉकस्यस पर्वत रांगेच्या परिसरातील चेचन्या आणि आजुबाजुचा भाग टाचेखाली आणला. तेव्हापासून तिथल्या इस्लाम नेत्यांनी रशियाविरुद्ध मैदानात उडी घेतली आहे.

१९१७ला जेव्हा रशियन लाल क्रांती झाली तेव्हा चेचन्या आणि आजुबाजुच्या भागातील लोकांना एक आशेचा किरण निर्माण झाला. मात्र १९२२ ला सोव्हिएत रशियाचा हुकुमशहा स्टॅलिनने अल्पावधीतच रशियाच्या संपूर्ण भागात आपली जरब बसवली आणि चेचन्या आणि भागातील बंडखोरांना डोके वर काढण्याची संधीच दिली नाही.  

नागरिकांमध्ये असंतोष

१९४१ ला हिटलरच्या नाझी जर्मनीने रशियाचा घास घेण्यासाठी आक्रमण केले. सोव्हिएत रशियाच्या आतमध्ये घुसत जर्मन फौजांनी स्टॅलिनग्राडला धडका द्यायला सुरुवात केली, तेव्हा चेचन्याच्या बंडखोरांनी संधी साधली. गुप्तपणे नाझी जर्मनीला मदत करायला सुरुवात केली. मात्र हा आनंद बंडखोरांसाठी अल्पवधीचा ठरला. महाकाय रशियन सैन्याने पलटवार करत निर्णायकरित्या नाझी जर्मनीला मागे रेटले आणि जर्मनीला रशियाच्या सीमेबाहेर हुसकावत थेट बर्लिनपर्यंत मजल मारली. या धामधुमीत स्टलिनला चेचन्या परिसराकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. मात्र महायुद्ध संपताच स्टॅलिनने बंडखोरांच्या साफसफाईची मोहिम हाती घेत चेचन्या आणि परिसरावर पूर्ण ताबा मिळवला. मात्र याचा फटका मोठ्या प्रमाणात नागरिकांना बसला. हजारो नागरिकांचे शिरकाण केले गेले आणि देशोधडीला लावले गेले. ५० वर्षे सोव्हिएत रशियावर अंकुष ठेवणा-या हुकुमशहा जोसेफ स्टॅलिनचा १९५३ ला मृत्यु झाला तेव्हा नागरिक आणि  चेचन्याच्या नेत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

रिक्त झालेल्या अध्यक्षपदाची जागा घेतली निकिता क्रुश्चेव्ह ह्यांन. नागरिकांचा विश्वास मिळवावा यासाठी क्रुश्चेव्हने De-Stalinization प्रक्रियेला सुरुवात केली. याच अर्थ जो तणाव, भय स्टॅलिनच्या काळात होते ते जरा निवळण्यासाठी प्रयत्न केले. विखुरलेल्या चेचन्या परिसरातील लोकांना परत त्या भागात जाण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र चेचन्याच्या जनतेचा आनंद हा फार काळ टिकला नाही. १९५६ पासन क्रुश्चेव्हने संपुर्ण चेचन्या आणि परिसराचे पद्धशीरपणे रशियाकरण करायला सुरुवात केली. धर्म वगळता भाषेपासून ते प्रशासकीय कामकाजापर्यंत रशियाची तत्वे या मुस्लिम भागात राबवायला सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा एकदा असंतोष चेचन्याच्या जनतेमध्ये पसरला. मात्र कम्युनिस्ट सोव्हिएत रशियाच्या पोलादी पडद्यापुढे कोणाचे काही चालले नाही.


नवी आशा

अखेर १९९०-९१ ला सोव्हिएत रशिया कोसळला आणि त्याची १५ शकले झाली. आता संधी गमवायची नाही असा निर्धार करत चेचन्या भागातील बंडखोरांनी रशियाविरुद्ध सशस्त्र लढा द्यायला सुरुवात केली. सुरुवातीची दोन वर्षे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी रशियाची धडपड सुरु होती, त्यामुळे चेचन्यामध्ये रशियाला फार लक्ष देता आले नाही. मात्र त्यानंतर अध्यक्ष बोरिस येल्तसिन ह्यांनी १९९४ ला रशियन फौजेला पूर्ण ताकदनीशी उतरवले आणि पहिले चेचन्या-रशिया युद्ध सुरु झाले.



पहिले चेचन्या-रशिया युद्ध

१९९४ ते १९९६ काळात झालेल्या पहिल्या युद्धात सुमारे ३०,००० पेक्षा जास्त सशस्त्र चेचन्या बंडखोरांशी सामना करण्यासाठी रशियाने ७० हजार पेक्षा जास्त सैन्य चेचन्या परिसरात उतरवले. या रक्तरंजित लढाईत एक लाखापेक्षा जास्त नागरिक मारले गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो.  या लढाईत १५,००० पेक्षा जास्त बंडखोर मारले गेले, तर रशियाला ५,००० पेक्षा जास्त सैनिक गमावावे लागले. मोठे नुकसान झाल्याने चेचन्या बंडखोरांनी एक पाऊल मागे येत १९९६ ला रशिया सरकारशी समझोता केला. चेचन्याला पूर्ण स्वातंत्र्य देण्यास स्पष्ट नकार देत रशियाने बंडखोरांच्या नेत्यांना नमते घ्यायला लावले.

दरम्यान 1997 नंतर चेचन्या आणि परिसरातील बंडखोरांनी इस्लामिक इंटरनॅशनल ब्रिगेड स्थापन केली. यामध्ये परदेशी मुजाहिद्दीन (धर्मयोद्धे ) मोठ्या प्रमाणात होते. त्यांनी पद्धतशीरपणे चेचन्या आणि परिसरात आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली. तोपर्यंत रशियात अध्यक्ष येल्तसिनची जागा व्लादिमीर पुतिन या धडाडीच्या नेत्याने घेतली होती. रशियाची आर्थिक बाजू सावरण्याच्या कमिगरीचे ओझे असलेल्या पुतिन ह्यांनी बंडखोरांचा कायमचा नायनाट करण्यासाठी पाऊल उचलले.


दुसरे चेचन्या युद्ध

तब्बल 10 वर्षे म्हणजे 1999 ते 2009 चाललेले हे युद्ध म्हणजे रशियाने बंडखोरांना ठेचुन काढण्यासाठी उचललेले पाऊल होय. रशियाने त्याच्या लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टरचा पुरेपुर वापर केला. अचूक बॉम्बफेक करत बंडखोरांचे कंबरडे मोडले. अखेर पुतिन आणि त्यांच्यानंतर आलेल्या मेदवेदेव अध्यक्षांच्या आक्रमक धोरणामुळे बंडखोरांनी पुन्हा थेट लढाईचे नाव काढले नाही. या लढाईत 7,000 पेक्षा जास्त रशियाचे सैन्य, 16,000 पेक्षा जास्त बंडखोर आणि 45 हजारापेक्षा जास्त नागरिक मारले गेले. हा आकडा पहिल्या लढाईपेक्षा कमी असला तरी यामध्ये बहुतेक सर्व चेचन्याचा प्रदेश उद्ववस्त झाला.

तेव्हापासून चेचन्यामध्ये लोकशाही स्थापन करण्यात आली असून स्वतंत्र राज्याचा देण्यात आला आहे, नियमित निवडणुका होत आहेत. असं असलं तरी चेचन्यात रशियन सैन्याचा जागता पहारा असून रशियात अधेमधे बंडखोर बॉम्बस्फोट करत अस्तित्व दाखवत असतात.

ब्युड्योन्नोव्स्क ओलिस प्रकरण

पहिले चेचन्या युद्ध सुरु असतांना चेचन्याला लागून असलेल्या ब्युड्योन्नोव्स्क शहरात जून 1995 मध्ये चेचन्या बंडखोरांनी रशियाला पहिला हिसका दाखवला. सुमारे 300 पेक्षा जास्त बंडखोरांनी ब्युड्योन्नोव्स्क शहरांत विविध मार्गाने घुसत तब्बल 2000 पेक्षा जास्त नागरिकांना ओलिस ठेवले. चेचन्याला ताबडतोब स्वातंत्र्य मागणी बंडखोरांनी केली. चेचन्याच्या बाहेर तोही अशा ओलिस पद्धतीने बंडखोरांचा उपद्रव पोहचेल अशी कल्पनासुद्धा रशियाने केली नव्हती. युद्ध सुरु असल्याने रशियाने काही मागण्या मान्य करण्याची तयारी दाखवली. मात्र बंडखोरांनी एक-एक ओलिसांना मारायला सुरुवात केल्यावर रशियाने तीन दिवसांनंतर देशांतंर्गत सुरक्षा बघणा-या विशेष सुरक्षा दलाला आत घुसवले. त्यानंतर झालेल्या धुमश्चक्रीत 140 पेक्षा जास्त नागरिक ठार झाले तर 400 पेक्षा जास्त जखमी झाले.

किझलेयर- पेर्वोमायस्कोये ओलिस प्रकरण

जानेवारी 1996 मध्ये 300 पेक्षा जास्त चेचन्या बंडखोरांनी चढाई करत किझलेयर आणि पेर्वोमायस्कोये या चेचन्याजवळील दोन गावातील 2200 पेक्षा जास्त नागरिकांना तब्बल 9 दिवस ओलिस ठेवले. नागरिकांच्या सुटकेसाठी रशिया 9 दिवस प्रयत्न करत होती. अखेर रशियाच्या सैनिकांनी हल्लाबोल करत नागरिकांची सुटका केली. यामध्ये फक्त 35 बंडोखोर मारले गेले , तर इतरांनी पळ काढला. 50 पेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले.

बेसलॅन शाळा ओलिस घटना

चेचन्याजवळील एका बेसलॅन शहरात सप्टेंबर 2004 मध्ये 30 ते 35 चेचन्या बंडखोरांनी तिथल्या एका शाळेत घुसत 1100 पेक्षा जास्त नागरिकांना ओलिस ठेवले. शाळेमध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही गर्दी केली होती. तीन दिवस चाललेल्या या ओलिस नाट्याचा बिमोड करण्यासाठी रशियाने संयम संपेपर्यंत वाट पाहिली. अखेर रशियन सैन्याने धडक कारवाई करत बंडखोरांचा बिमोड केला. पण या कारवाईत 300 पेक्षा जास्त विद्यार्थी-पालक मारले गेले, तर 700 पेक्षा जास्त जखमी झाले.

मास्को नाट्यगृह ओलिस घटना

ऑक्टोबर 2002 मध्ये मास्को नाट्यगृह इथे झालेले ओलिस प्रकरण सर्वात गाजले. वर उल्लेख केलेले सर्व ओलिस नाट्य हे चेचन्याच्या परिसरात घडली होती. मात्र यावेळी चेचन्याच्या बंडखोरांची मजल रशियाच्या मध्यवर्ती भागात तेही राजधानीत धुमाकुळ घालण्यापर्यंत गेली. राजधानीमुळे असलेली विविध परदेशी प्रसारमाध्यमे, यामुळे या ओलिस नाट्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यातच रशियाने सुटका करण्यासाठी वापरलेल्या अजब मार्गामुळे हे ओलिस नाट्य गाजले.

30 ते 35 सशस्त्र बंडखोरांनी मास्को मधल्या सरकारी नाट्यगृहात घुसत 800 पेक्षा जास्त नागरिकांना ओलिस ठेवले. राजधानीतच हा प्रकार घडल्याने रशियाची चांगलीच नाचक्की झाली. एकही मागण्या मान्य न करता नेहमीप्रमाणे बंडखोरांना चिरडायचे याची पक्की मनधारणा रशियाच्या प्रशासकांनी केली. कुठल्या प्रकारे कारवाई करता येईल याच्यावर तीन दिवस डोकेफोड केल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा वायू नाट्यगृहातील वातानुकुलित पसरवायचा अशी योजना नक्की करण्यात आली. या वायुद्वारे व्यक्ति 20-30 मिनिटात बेशुद्ध पडणार होती. रशियाच्या विशेष सैन्य दलाने हा वायू सोडला, त्याचा फारसा फायदा झाला नाही. बंडखोर आधीच सावध झाले होते. त्यांनी नाट्यगृहात मोठी स्फोटके लावत नाट्यगृहाच्या एका कोप-यात आश्रय घेतला. 30 मिनिटे वाट बघितल्यावर विशेष सैन्य दलाने नाट्यगृहात जोरदार मुसंडी मारत बंडखोरांना ठार केले. यामध्ये काही नागरिक मृत्युमुकी पडले मात्र विशिष्ट वायुमुळे श्वसनाला अडथला होत मरणा-या नागरिकांचे प्रमाण जास्त होते. यामुळे रशियाला जगभारातून मोठी टीका सहन करावी लागली. 130 पेक्षा जास्त नागरिक यामध्ये मरण पावले.

असे टीचभर चेचन्या महाकाय, बलाढ्य रशियाचे जणु धुमसतं काश्मिर झाले आहे.  


No comments:

Post a Comment

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...