Friday, June 24, 2011

" चीन " च्या घोडेदौडीचे रहस्य


1978 ला चीनने  आर्थिक परिवर्तनाला सुरुवात झाली आणि त्यानिमित्ताने आपला पोलादी पडदा काहीसा उघडला.  कम्युनिस्ट धोरणाच्या जोडीला भांडवलशाही अर्थव्यवस्था मोठ्या खुबीने राबवायला सुरुवात केली. विशेषतः गेल्या 20 वर्षात विशेष आर्थिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात राबवत  स्वप्नवत अशी प्रगती चीनने केली आहे.  अर्थव्यवस्था, उद्योग, व्यापार, वाहतूक, विविध उत्पादने, वीज निर्मिती, संरक्षण दल,  अवकाश संशोधन, खेळ, दळणवळणाची साधने  या सर्वच क्षेत्रात चीनची झेप थक्क करणारी आहे.  2030 पर्यंत  अमेरिका मिरवत असलेल्या " महासत्ता " या बिरुदाला चीन धक्का लावेल असं जगातील अर्थतज्ञ सांगत आहेत.  चीनच्या या घोडेदौडीचा थोडक्यात अभ्यास करण्यासाठी काही क्षेत्रातील प्रमुख मुद्दांचा थोडक्यात जरी आढावा घेतला तर चीनच्या प्रगतीचं मूळ लक्षात येतं.

जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था ( जीडीपीच्या आधारे ) म्हणून जपानला मागे टाकत चीनने स्थान मिळवले आहे.
2010 वर्ष संपतांना चीनच्या आर्थिक प्रगतीचा वेग, अर्थव्यवस्थेचा वेग हा 10.3 एवढा होता.

अमेरिकेत  होणा-या एकुण आयातीपैकी सर्वात जास्त वाटा म्हणजे 20 टक्के आयात एकट्या चीनमधून होते.

2010 साली जगात सर्वात जास्त निर्यात म्हणजे 1500 अब्ज डॉलर्स किमंतीच्या विविध वस्तुंची निर्यात चीनने केली.

जगात दुस-या क्रमांकाची आयात म्हणजे 13,00,00,00,00,000 डॉलर्स म्हणजेच 1300 अब्ज डॉलर्स एवढी आयात चीनने 2010 वर्ष संपतांना केली होती.

ताज्या आकडवाडीनुसार चीनकडे परकीय जंजाजळ किंवा परकीय चलन साठा डॉलर्समध्ये 2.85 ट्रिलियन म्हणजे 28,50,00,00,00,000 डॉलर्स एवढा म्हणजेच 2850 अब्ज डॉलर्स आहे.

विकसनशील देशांना मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जागतिक बॅकेने 2009 आणि 2010 या दोन वर्षात विविध देशांना 103 अब्ज डॉलर्सची कर्जे दिले. तर भक्कम अर्थव्यवस्था असलेल्या चीन देशाने याच काळात जागतिक बॅकेपेक्षा जास्त म्हणजे 110 अब्ज डॉलर्सचे कर्ज देशांतर्गत आणि विविध देशांना दिले.

1980 ते 1990 च्या काळात चीनने समुद्र किना-यालगत 16 शहर आणि परिसरांत विविध उद्योगांना चालना देणारे रेकॉर्डब्रेक SEZ - Secial Economic Zone उभारले.  सेझ हा चीनच्या घोडेदौडीचा कणा समजला जातो.

स्टील उत्पादनात जगात चीनचा पहिला क्रमांक असून  62,60,00,000 टन उत्पादन करतो.  
तर जगात एकुण स्टीलच्या निर्यातीपैकी 56 टक्के निर्यात चीन करतो.

1,80,00,00,000  म्हणजे 180 कोटी टन सीमेंटचे उत्पादन दरवर्षी चीन करतो. हा आकडा जगातील एकुण सीमेंट निर्मितीपैकी 45 टक्के एवढा जास्त आहे.

3,05,00,00,000 म्हणजे 305 कोटी टन एवढा कोळसा निर्मिती चीन दरवर्षी करतो , हा आकडा जगाच्या एकुण आकडेवारीच्या 45.6 टक्के एवढा जास्त आहे.

3,20,000 टन सोनं चीन त्याच्या खाणीतून काढतो. सोन्याच्या उत्पादनात 1905 वर्षापासून पहिल्या नंबरावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला 2009 ला प्रथमच चीनने मागे टाकले.

पवन ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यात चीन आघाडीवर असून  चीनमध्ये 41,800 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते.  तर गनसू प्रदेशात तब्बल 20,000 मेगावॅटचा वीज निर्मितीचा महत्वकांक्षी प्रकल्प उभारला जात असून तो 2020 ला पूर्ण होणार आहे.

पृथ्वीचं तापमान वाढण्यास कारणीभूत ठरलेला ग्रीनहाऊस गॅस सर्वात जास्त हवेत टाकणारा देश म्हणजे चीन. जगाच्या एकुण आकडेवारीत 16 टक्के वाटा चीनने उचलला आहे.

Tianhe-I  नावाचा जगातील सर्वात वेगवान महासंगणक चीनकडेच आहे. त्याचा वेग आहे
2.566 PETA FLOPS , म्हणजे 10 वर 15 शून्य एवढ्या प्रक्रिया तो एका सेकंदात करतो.

मोबाईल वापरात चीन नंबर वन आहे.  88,63,00,000 एवढी चीनी जनता मोबाईल फोन वापरते.

इंटरनेट वापरामध्ये चीन जगात आघाडीवर, चीनमधील 45,00,00,000  एवढी जनता इंटरनेटचा वापर करते.

Qingdao Haiwan सेतू  ( हे नाव काही मराठीत लिहीता आले नाही ) हा  Qingdao आणि  Huangdao
या चीनमधील दोन शहरांना जोडणारा 42.5 कि.मी. लांबीचा सेतू जगातील पाण्यावरचा ( समुद्र आणि नदी) सर्वात जास्त लांबीचा  सेतू आहे.

बिजिंग आणि शांघाय ह्यां दोन शहरांना जोडणारा 1, 318 किमी लांबीचा हायस्पीड रेल्वे मार्ग बांधला जात आहे.  यामध्ये तब्बल 164 किमी लांबीचा Danyang आणि Kunshan या दोन शहरांना जोडणारा जगातील सर्वात मोठा जमिनीवरील उड्डाण पुल असणार आहे.  या रेल्वेमुळे या दोन शहरांमधील प्रवास 300 किमी. प्रति तास या वेगाने अवघ्या तीन तास 58 मिनीटांत पार करणं शक्य  होणार आहे.

जगातील सर्वात जास्त लांबीच्या पहिल्या दहा  उड्डाणपुल /  सेतु पैकी सात हे एकट्या चीनमध्ये आहेत.

गोलमुड ते ल्हासा हा रेल्वेमार्ग जगातील सर्वात जास्त उंचीवरील रेल्वेमार्ग म्हणुन ओळखला जातो. यामधील 80 टक्के मार्ग हा 4,000 मीटर ( 13,120 फुट ) पेक्षा उंचीवरुन जातो.  टंगुल्ला पास हे या मार्गातील सर्वात उंचीचं ठिकाण असून ते रेल्वे स्टेशन 5,072 मीटर एवढ्या उंचीवर आहे.

चीनमध्ये सहा किंवा त्यापेक्षा जास्त लेन असलेल्या एक्सप्रेस लेनची लांबी तब्बल 74,000 किमी एवढी आहे.  विशेष म्हणजे 1988 पासून एक्सप्रेस हाय-वे बांधायला घेतले. म्हणजे फक्त 21 वर्षात एवढी जबर कामगिरी चीनने केली.  पुढील 7-8 वर्षात एक्सप्रेस हाय वेच्या बाबतीत दुस-या नंबरवर असलेला चीन अमेरिकेला मागे टाकणार असा अंदाज आहे.

वाहनांच्या उत्पादनात चीन प्रथम क्रमांकावर असुन 2010 मध्ये चीन ने 1,82,64,667 मोटारांची निर्मिती केली.

ताज्या आकडेवारीनुसार चीन सरकारच्या विविध शैक्षणिक धोरणांचा फायदा घेत सध्या 194 देशांतील
2,65,000 विद्यार्थी चीनच्या विविध विद्यापीठात शिकत आहेत.

थ्री जॉर्जेस जगातील मोठ्या धरणांपैकी एक, चीनचे अश्रू म्हणुन ओळखल्या जाणा-या यांगत्से नदीवर उभारण्यात आले आहे. ( या नदीला दरवर्षी मोठा पूर येतो आणि नुकसान होते. 1954 च्या पुरात 33,000 लोक मृत्युमुखी पडले. पुराचे पाणी नियंत्रीत करण्यासाठी धरण बांधण्यात आले.) धरणाचं बॅकवॉटर तब्बल 660 कि.मी. लांब पसरले आहे. तर पाण्याचा पसारा 632 चौरस किमी एवढा आहे.
धरण बांधतांना तब्बल 40,00,000 म्हणजेच 40 लाख कुटुंबांचं पुर्नवसन करावे लागले.
धरणाच्या पाण्याद्वारे आता 18,000 मेगावॅट वीज निर्मिती केली जात आहे.

चीनच्या उत्तर भागात पाण्याची तीव्र टंचाई असल्याने चीनने दक्षिणेकडील यांगत्से या चीनच्या दक्षिण भागात असलेल्या पश्चिम-पूर्व दिशेने वहाणा-या नदीचं 44,00,00,00,000 क्युबिक मीटर  म्हणजेच 44 अब्ज क्युबिक मीटर एवढं पाणी दरवर्षी उत्तर दिशेला वळवण्याचं ठरवलं आहे. यासाठी तीन विविध भूमिगत मार्गाने 62 अब्ज डॉलर्स खर्च करत हे पाणी " यल्लो आणि हाई " नद्यांमध्ये तसंच " बिजिंग " शहरासाठी वळवण्यात येणार आहे.
( या पाण्याच्या साठ्याची तुलना - मुंबईला पाणी पूरवठा करणा-या भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता आहे 2,34,190 घन मीटर.  या पाणी साठ्यातून दररोज सुमारे 2000 दशलक्ष लीटर पाणी दररोज पुरवलं जातं. म्हणजे या जलसाठ्याच्या दोन लाख पट जास्त पाणी वळवण्याची योजना आहे. ) हा प्रकल्प पुढील 10 वर्षात कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा निर्धार चीनच्या सत्ताधा-यांनी केलाय.

जगातील सर्वात मोठं सुसज्ज सैन्य ( निमलष्करी दल, राखीव सैन्य वगळून ) 22,85,000 एवढे चीनकडे आहे. दुस-या क्रमांकाचं नौदल आणि वायुदल म्हणून चीनची लष्करी ओळख.

बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि वेटलिफ्टिंग या खेळांमध्ये आणि त्यातील बहुतेक सर्व प्रकारात चीनचे खेळाडू प्रथम क्रमांकावर आहेत.  एवढंच नाही तर 2008 च्या बिजिंग ऑलंपिकमध्ये 51 सुवर्ण पदके पटकावत प्रथमच पहिला नंबर मिळवला, स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व दाखवून दिलं.

स्वबळावर अवकाशात मानवी मोहिम आखणारा चीन हा रशिया आणि अमेरिकानंतरचा देश तिसरा ठरला आहे. 2003 ला चीन ने 15 ऑक्टोबर 2003 ला यांग लेवी या अवकाशवीराला अंतराळात धाडले. बलाढ्य फ्रान्स, इंग्लंड, जपान, जर्मनीला अजुन हे शक्य झालेले नाही.

त्याचबरोबर अनेक अन्नधान्य, विविध उत्पादनांच्या निर्मितींमध्ये चीन प्रथम क्रमांकावर आहे. मग प्रश्न असा पडतो की भारताला हे का शक्य नाही.  साधा 5.5 किलोमीटरचा वांद्रे-वरळी सी लिंक बांधण्यासाठी आपण दहा वर्षे का घेतो. हा सी लिंक केबल ब्रीज, भारतातील पहिला ब्रीज म्हणुन मिरवला जात आहे.  मात्र असे कितीतरी आणि मोठे केबल ब्रीज चीनमध्ये आहेत. 

Dedicated Freight Corridor  प्रकल्प म्हणजे भारतातील मालवाहतूकीसाठीचा महत्वकांक्षी प्रकल्प. ज्यामध्ये देशातील सर्व मुख्य बंदरे, औद्योगिक ठिकाणे रेल्वेने जोडली जातील. या रेल्वेमार्गात एकावर एक कंटेनर ठेवुन वाहतूक होणार आहे. मात्र हा प्रकल्प गेली 10 वर्षे कागदावरच आहे. असे प्रकल्प कधी पूर्ण होणार असा प्रश्न पडतो.

देशातील सर्वात व्यस्त विमानतळ असलेल्या मुंबई विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न सभोवताली असलेल्या 80,000 झोपड्यांच्या पुर्नवसनामुळे अनेक वर्षे थांबुन राहिला आहे. राजकीय पक्षांना या ज्वलंत विषयाला हात लावायची हिंमत होत नाहीये.  मात्र आज चीनमध्ये अनेक प्रकल्प मार्गी लावले जात आहेत कारण पुर्वनसनाचे प्रश्न झटपट निकाली लावले जात आहेत म्हणुन.

चीन देशाला ही प्रगती शक्य झाली कारण आजही या कम्युनिस्ट देशात, एकच राजकीय पक्ष असलेल्या या देशात  हुकुमशाही आहे.  त्यामुळे विरोध मोडून काढत, वेळप्रसंगी साम-दाम-दंडाचा वापर करत प्रकल्प रेटले जात आहेत आणि ते पूर्णही केले जात आहेत.  असं असलं तरी प्रकल्प तोही वेळेत तडीस नेण्याची राजकीय इच्छाशक्ती  आहे.

भारतात असं शक्य नसलं तरी लोकशाही नावाची प्रबळ संस्था आहे. मात्र त्याच्या जोडीला प्रबळ राजकीय इच्छाशक्ती नाहीये. राजकीय पक्ष एकमेकांच्या साठेमारीत गुंतले आहेत. कोणाला देशाची काही पडली नाहीये. म्हणूनच हे चित्र असंच राहिलं तर चीन नावाचा ड्रँगन वाढत राहणार ,  पूढे जात रहाणार  आणि हत्तीची चाल असलेला भारत फक्त हात चोळत बघत रहाणार तिस-या,चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर समाधान मानत रहाणार.


3 comments:

  1. चीनला झोपेतच राहू द्या. तो उठला, तर सारे जग हादरवून सोडेल’ ह्या नेपोलियनच्या प्रसिद्ध वाक्याची या देशाने गेल्या काही वर्षात जगाला वारंवार आठवण करुन दिली आहे.
    ब्लॉग अर्थातच सुंदर आहे. नवीन माहितीचा आणखी एक खजिना यामधून उघडा झाला आहे. पण चीनला ही प्रगती कशी शक्य झाली हा पार्ट खूप थोडक्यात आटपता घेतलाय.राजकीय कार्यक्षमता आणि इच्छाशक्ती हे विकासाचे मुख्य कारण तर आहेच.पण आणखीही कारणं असावीत. त्याचाही उल्लेख करायला हवा होता.

    ReplyDelete
  2. Hi amit sir,
    Artical is superb.. But if you break this article in too part.. than it is easy too understand.. Right now it is also too good. But i am student so taking much time to understand...
    sir keep it up..
    Thank you...

    ReplyDelete
  3. Khare tar ya saglyatun aaplya faydyacha vichar karayla hava.. bhavishyat Chinese bhasha yenaryana khup bhav asel.. tyamule ya drushtine vichar karava asech he article vachun vatTe... what say?

    ReplyDelete

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...