Sunday, June 12, 2011

भारतीय संरक्षण दलाचे नवे ब्रम्हास्त्र " आयएनएस अरिहंत "


                               भारताची पहिली अणु पाणबूडी

संरक्षण दलाचे सक्षमीकरण

गेल्या काही वर्षातील भारताचा एक नंबरचा शत्रू " चीन " देशाचे वाढते सामर्थ्य, मुंबईवरील हल्ल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता संरक्षण दलाच्या तीनही विभागाने नुतनीकरण तसंच सक्षमीकरणासाठी सध्या जोरात सुरु आहे.  त्याचाच एक भाग म्हणून 1974 पासून कागदावर असलेल्या पहिली अणु पाणबूडी बनवण्याच्या प्रकल्पावर भारताने जोरदार काम सुरु केले आहे.  चीन किंवा पाकिस्तानाच्या अणु बॉम्बच्या हल्ल्याला प्रत्युतर देण्यासाठी, शेवटचा तडाखा देण्यासाठी किंवा दोन्ही देशांवर जरब बसवण्यासाठी, जगात एक प्रबळ नौदल म्हणून स्थान मिळवण्यासाठी " आयएनएस अरिहंत   "  या अणु ऊर्जेवर चालणा-या पाणबुडीवर जोरदार काम सुरु आहे. 


अणु पाणबुडीचा इतिहास 

पण भारताची खटपट कशासाठी सुरु आहे हे जाणुन घेण्याआधी अणु पाणबुडीचा इतिहास लक्षात घेणं आवश्यक ठरले.

जगप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन ह्यांनी E=mc2 चे सुत्र जाहिर केले आणि एकच खळबळ उडाली. अणुचे विखंडन करणं शक्य असल्याचं लक्षात येताच निर्माण होणारी अणु ऊर्जा, त्यावर नियंत्रण कऱण्याची पद्धत यावर खलबते सुरु झाली. 1939 ला अमेरिकेतील रॉस गन ह्या शास्त्रज्ञाने अणु ऊर्जेवर चालणा-या  पाणबुडीची संकल्पना मांडली.  खरं तर तेव्हापर्यंत अणु भट्टीचाही जन्म व्हायचा होता.  तेवढ्यात दुसरे महायुद्ध सुरु झाले आणि अणु पाणबुडीची संकल्पना अमेरिकने कागदात गुंडाळून ठेवून दिली.

हिटलर अणु बॉम्ब आधी बनवेल या भितीने झोप उडालेल्या अमेरिकेने जगभरातील शास्त्रज्ञांना एकत्र आणत पहिली अणु भट्टी 2 डिसेंबर 1942 कार्यान्वित केली. त्यानंतर अणु बॉम्ब तयार करत दुस-या महायुद्धात निर्णायक विजय मिळवला.  महायुद्ध संपल्यावर सोव्हिएत युनियनबरोबर शीत युद्धाला सुरुवात झाली.  तेव्हा अणु ऊर्जेवर चालणा-या पाणबुडीची कपाटात ठेवलेली संकल्पना पुन्हा अमेरिकेने बाहेर काढत त्यावर अभ्यास करायला सुरुवात केली.

सुरुवातीच्या ( 1952 पर्यतच्या ) अणु भट्ट्या म्हणजे एक अगडबंब प्रकार होता. तेव्हा अणु भट्टीचा आकार कसा लहान करायचा आणि अणु भट्टी पाणबुडीत कशी सामावून घ्यायची यावर बराच खल करत अखेर 1952 च्या जूनमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.  आणि अखेर अनेक अडचणींवर मात करत जगातील पहिली अणु ऊर्जेवर चालणारी पाणबुडी युएसएस नॉटिलस अमेरिकेने नौदल ताफ्यात सप्टेंबर 1954 ला, म्हणजेच अवघ्या दोन वर्षात दाखल करुन घेतली.


 तोपर्यंत सोव्हिएत रशिया काही स्वस्त बसला नव्हता. अमेरिका असा प्रकल्प राबवत असल्याची माहिती रशियाला गुप्तहेरांकडून आधीच माहिती झाली होती.  तेव्हा अमेरिकेच्या शोडं उशीरा का होईना पण रखडत, अनेक अडथळ्यांवर मात करत सोव्हिएत रशियाने पहिली पाणबुडी 1958 ला दाखल करुन घेतली.  त्यानंतर उत्कृष्ठ दर्जाच्या अणु ऊर्जेवर चालणा-या पाणबुड्या बनवण्याची एकच स्पर्धा दोन्ही देशांमध्ये लागली.  या स्पर्धेत मग इंग्लड, फ्रान्स आणि त्यानंतर चीनही सामिल झाला. शीत युद्ध संपेपर्यंत म्हणजे 1990 साली रशियाने विक्रमी 240 पेक्षा जास्त अणु ऊर्जेवर चालणा-या पाणबुड्या बांधल्या.  तर बाकीच्या चार देशांच्या पाणबुड्यांची संख्या फक्त 150 एवढी होती. यावरुन सोव्हिएत रशियाचा संरक्षणाबाबत अणु पाणबुड्यांवर किती विश्वास होता हे लक्षात येतं.

( अणु पाणबुडी व्यतिरिक्त ) इतर पाणबुड्यांच्या मर्यादा 

पाणबुडी बनवायला  1620 मध्ये जरी सुरुवात झाली असली तरी 1863 ला आधुनिक पाणबुडी प्रत्यक्षात बनवण्यात आली.  हाताने चालवण्यापासूनचे अनेक पाणबुडीचे प्रकार अस्तित्वात होते. 1920 च्या दशकापासून डिझेलवर चालणा-या पाणबुड्यांची निर्मिती व्हायला लागली आणि या अस्त्रामध्ये क्रांती झाली.  पाणबुडीचे महत्व कोणी लक्षात आणले ते जपान आणि जर्मनीने. असंख्य पाणबुड्यांच्या सहाय्याने या दोन देशांच्या पाणबुड्यांनी धुमाकूळ घालत  दुस-या महायुद्धात युद्ध संपेपर्यंत मित्र राष्ट्रांच्या अनेक व्यापारी जहाजे, युद्धनौका, पाणबुड्यांना जलसमाधी दिली.

मात्र डिझेलवर चालणा-या अशा प्रकराच्या पाणबुड्यांमध्ये काही मुख्य त्रुटी होत्या.  पाणबुड्यातील खलाशांना शुद्ध ऑक्सिजन मिळावा, पाणबुड्यातील यंत्रणा चालण्यासाठी मुख्य बॅट-या चार्ज व्हाव्यात यासाठी पाणबुड्यांना समुद्राच्या पृष्ठभागावर यावे लागायचे आणि हे काम पुर्ण करण्यासाठी किमान एक तास तरी लागायचा. नेमकी हीच वेळ घातक ठरायची आणि शत्रुपक्षाला पाणबुडीचा सुगावा लागायचा.

मुख्य म्हणजे फार दिर्घकाळ या पाणबुड्या समुद्रात राहू शकत नव्हत्या. इंधन भरण्यायासाठी एकतर तळावर परत यावे लागायचे  किंवा दुस-या युद्धनौकातून इंधन भरावे लागायचे. " सैन्य पोटावर चालतं " या वाक्याप्रमाणे  नव्या, ताज्या शुद्ध ( पिण्याच्या ) पाण्यासाठी, अन्न-धान्यासाठी मदत घ्यावी लागायची. त्यामुळे पाण्याखालच्या या अमोघ अस्त्राच्या काही नव्हे तर अनेक मर्यादा होत्या.

रामबाण उपाय....अणु ऊर्जेवर चालणारी पाणबुडी

वर उल्लेख केलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे अणु ऊर्जेवर चाणा-या पाणबुडीने चटकन सोडवली.
1....एकदा अणु पाणबुडीच्या अणु भट्टीत इंधन भरले की कित्येक दिवस नव्हे, महिने नव्हे तर अनेक वर्षे पुन्हा इंधन भरायची गरज भासत नाही.
2....अणु ऊर्जेपासून सतत ( 24 तास , 365 दिवस ) वीज निर्मिती करता येते. तेव्हा पाणबुडीतील उपकरणांना 24 तास वीजपुरवठा उपलब्ध होतो.
3... समुद्राचे पाणी शुद्ध करत ते पिण्यासाठी बनवण्याची प्रक्रिया या पाणबुडीत करणे शक्य झाले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढला गेला.
4.....पाणबुडीत शुद्ध ऑक्सिजन तयार करण्याची प्रक्रिया करता येते.
5.... अणु पाणबुड्यांच्या मोठ्या आकारामुळे अन्न-धान्य जास्त साठवता येतात.

या सर्व गोष्टींमुळे अणु ऊर्जेवर चालणारी पाणबुडी  ही कित्येक  महिने पाण्याखाली राहू शकते.  उत्कृष्ठ तंत्रज्ञान विकसित झाले असल्याने पाण्यात पाणबुडीपासून निर्माण होणारा ध्वनी कमी करता येतो, ती जास्त Silent करता येते. (  ध्वनी  हवेपेक्षा पाण्यातून जास्त वेगाने प्रवास करतो. त्यामुळे पाण्यात ध्वनीच्या तंरगलांबीवरुन एखाद्या गोष्टीचा अंदाज लवकर येतो. ).  विविध प्रकारच्या अणु ऊर्जेवर चालणा-या पाणबुड्यांच्या अणु भट्टीची क्षमता विविध असते.  जास्त क्षमतेची अणु भट्टी असल्यास तिचा आकार मोठा होतो, त्यानुसार जास्त शस्त्रास्त्र बाळगता येतात. 


पाणबुड्यांचं अस्त्र

पाणबुड्य़ांमध्ये 1950 च्या दशकापर्यंत Torpedo  हेच पाणबुडीचे प्रमुख अस्त्र होते. मात्र 1960 पर्यंत जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र विकसित झाली होती. थोड्याच काळात हा पल्ला आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या ( 8,000 कि.मी. )  निर्मितीपर्यंत पोहचला.  तेव्हा अशा प्रकारची क्षेपणास्त्रे पाणबुडीतून तेही अणु पाणबुडीतून आणि ते सुद्धा पाण्याखालून का डागता येणार नाही यावर संशोधन सुरु झाले. अल्पावधितच सोव्हिएत रशिया आणि अमेरिका ह्यांनी पाण्याखालून जमिनीवर किंवा युद्धनौकेवर मारा करणारी क्रुझ क्षेपणास्त्रे, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित केली.  त्यामुळे अमेरिका, रशिया, फ्रान्स, इंग्लड आणि चीन यांसारख्या देशाकडील अणु पाणबुड्या जगाच्या कुठल्याही कोप-यातून स्वतःचे अस्तित्व उघड न करता जगातील कुठल्याही शहरावर क्षेपणास्त्र डागू शकतात, त्याद्वारे अणु बॉम्ब टाकू शकतात.

त्यामुळे दिर्घ काळ पाण्याखाली राहत स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव न होऊ देणा-या, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बाळगणा-या, अणु ऊर्जेवर चालणा-या पाणबडुया देशाच्या संरक्षणाचं सर्वात मोठं हत्यार बनल्या, ( शत्रु राष्ट्राच्या हल्ल्यात सर्व काही नष्ट झालं तर  )  शेवटचा पण निर्णायक हल्ला करण्याची जवाबदारी अणु पाणबडुयांकडे देण्यात आली. शीतयुद्धाच्या काळात तर अमेरिका आणि सोव्हिएत रशियाच्या अणु पाणबुड्या परस्पर देशांच्या जवळ समुद्रात 24 तास गस्त घालत असायच्या.  सोव्हिएत रशियाकडे तर 1990 पर्यंत आंतरखंडीय क्षेपणास्त्र बाळगणा-या 70 पेक्षा जास्त अणु पाणबुड्यांचा ताफा होता.


भारताच्या अणु पाणबुडी प्रकरणाचा इतिहास
1964 ला चीनने पहिली अणु चाचणी केली आणि लगेचच अणु पाणबुडीवर काम करायला सुरुवात केली. भारताने 1974 ला पहिली अणु चाचणी घेतल्यावर भारतानेही गुप्तपणे काम हाती घेतले. मात्र त्यानंतर पुढचा काळ हा राजकीय अस्थैर्याचा होता. त्यामुळं या प्रकल्पाकडे  सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाने दुर्लक्ष केलं.  अखेर 1984 ला टेक्नोसॅव्ही असलेल्या राजीव गांधी ह्यांनी पंतप्रधान होताच अणु पाणबुडी हा विषय पुन्हा अजेंड्यावर घेतला.  एवढंच नाही तर अणु पाणबुडी चालवण्याचा अनुभव मिळावा यासाठी 1988 ला रशियाची चार्ली वर्गातील अणु पाणबुडी तीन वर्षाकरता भाड्याने घेतली.  मात्र पुन्हा 1889 नंतर पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानं स्वदेशी  अणु पाणबुडीचा विषय मागे पडला. 1991 ला देश आर्थिक परिवर्तनातून जात असल्यानं या विषयाला कोणी हात लावला नाही. अखेर 1999ला स्वबळावर पुन्हा सत्तेत आलेल्या पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या काळात या विषयाला ख-या अर्थाने जोर पकडला. त्यानंतर मग टप्प्याटप्याने प्रगती होत अखेर 26 जुलै 2009 ला भारताची पहिली अणु ऊर्जेवर चालणारी पाणबुडी पूर्ण होत चाचण्यांकरता पाण्यात अवतरली.   

आयएनएस अरिहंत
                             ( या फोटोवर क्लिक करा आण पहा )
अरिहंत याचा अर्थ शत्रुंचा विनाशक. शत्रुला जोरदार, निर्णायक दणका देण्यासाठी  अरिहंत सज्ज होत आहे. 6,000 टन वजनाच्या  या पाणबुडीची किंमत 10 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.  80 मेगावॅट एवढी वीज निर्मिती करणारी  Pressurized Water Reactor  प्रकारची अणु भट्टी यामध्ये बसवण्यात आली आहे.  K-15 नावाची पाण्याखालून डागता येऊ शकणारी, 700 किलोमीटर  पर्यंत मारा करु शकणारी 12 क्षेपणास्त्रे यामध्ये असणार आहेत.  अरिहंत वर्गातील एकुण चार अणु  पाणबुड्या बनवल्या जाणार आहेत. तर अरिहंतपेक्षा मोठी म्हणजे 8,000 टन वजनाची अणु पाणबुडी बनवण्याचा आराखडा  तयार झाला असून तशा एकुण 4 बनवणार असल्याची चर्चा आहे.  सध्या अरिहंतच्या चाचण्या सुरु असून 2012 मध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यात ती दाखल होणार आहे.


भारतासाठी अणु पाणबुडी महत्त्वाची

भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र असून व्यापारी जहाजे, तेलवाहू जहाजे यांची ने-आण करणा-या सौदी अरेबिया जवळचे पर्शियत आखात, एडनचे आखात आणि मलेशिया जवळचे मलाक्काचे आखात ह्यांच्यामध्ये भारत आहे.  आखाती देशांमधून भारत, चीन, जपान, मलेशियासह अमेरिकेलासुद्धा, अनेक देशांना तेलपूरवठा ह्याच आखातांमधून होतो.  दुस-या शब्दात जगातील 60 टक्के तेल वाहतूक आणि 70 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापारी वाहतूक ह्याच भागांतून होते.  चीनसुद्धा भारताच्या आजुबाजूला हातपाय पसरत आहे. तेव्हा विशाल समुद्राच्या भागात वर्चस्व ठेवु शकणारी, दीर्घकाळ पाण्याखाली रहाणारी, लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्राचा मारा करु शकणारी, नुसत्या अस्तित्वाने शत्रूवर वचक ठेवू शकणारी अणु पाणबुडी  भारतासाठी महत्त्वाची आहे.  भारत आत्ता कुठे अणु पाणबुडीवर काम करत असतांना चीनकडे विविध प्रकराच्या 11 अणु पाणबुड्या कार्यरत आहे. त्यामुळे अणु ऊर्जेवर चालणारी पाणबुडी भारतासाठी महत्त्वाची आहे. सर्व काही सुरळित सुरु राहिले तर 2020 पर्यंत भारताकडे किमान 6  ते 8   अणु पाणबुड्या असतील अशी आशा आहे.   

2 comments:

  1. पाणबुडी बद्दल A to Z माहिती सांगणारा हा ब्लॉग आहे. जबरदस्त..पुन्हा एका एका नव्या विषयाची अगदी सविस्तर माहिती तूझा ब्लॉग वाचून मिळाली.

    ReplyDelete
  2. अरे अमीत, ही तर जबरदस्त माहिती नव्हे तर अख्ख्या इतिहास ओघवत्या शैलीत इथं मांडला आहेस. इतिहासापासून ते आपल्या देशाला असलेली गरज, ही सर्व नवी माहिती तुझ्या ब्लॉगमुळे कळाली.

    ReplyDelete

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...