Friday, February 18, 2011

आयएनएस विध्यगिरीचा अपघात आणि नौदलाचा कारवार तळ

कारवार - आयएनएस कदंब
भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस विंध्यगिरीची 30 जानेवारीला एका मालवाहू जहाजाला धडक बसली आणि दुस-या दिवशी ही युद्धनौका नौदलाच्या गोदीत बुडाली. दिवसा-ढवळ्या एवढ्या मोठ्या जहाजांचा अपघात कसा होऊ शकतो, अशा अपघातांमुळे नौदलाचा तळ सुरक्षित आहे असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहीले. मात्र मुंबई बंदरात होणा-या मालवाहू जहाजांच्या गर्दीचा धोका 30 वर्षांपूर्वी नौदलाने लक्षात घेतला होता.  कर्नाटकात कारवार इथे मुंबईला पर्यायी  आणि आशियातील मोठा नौदल तळ  उभारण्याचं काम गेली 15 वर्षे सुरु आहे. 


अत्यंत गर्दीचे मुंबई बंदर

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये असलेल्या विविध गोंदींद्वारे हजारो टन वजनाची जलवाहतूक होत असते. गेल्या वर्षभरात 5 कोटी 45 लाख टन वजनाची मालवाहतूक या बंदरातून झाली. साधारण 5 हजार 800 मालवाहू जहाजांची ये-जा झाली.

मुंबई  पोर्ट ट्रस्टचा वाढता भार लक्षात घेता 1990 च्या दशकांत नाव्हा-शेवा इथे मोठ्या बंदराची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी जवाहरलाल नेहरु टर्मिनलसह आणखी दोन टर्मिनल उभारण्यात आले.  या बंदरातून गेल्या आर्थिक वर्षात चार लाखांपेक्षा जास्त कंटेनर किंवा 6,500 पेक्षा जास्त मोठ्या मालवाहू जहजांची ये-जा झाली.  दुस-या शब्दात सहा कोटीपेक्षा जास्त टन मालाची वाहतूक या बंदरातून झाली.

तसंच हजारो खाजगी आणि शेकडो मच्छिमारी नौकांची ये-जा मुंबईच्या दिशेने दररोज सुरु असते. त्यातच आता खाजगी नौकांचीसुद्धा भर पडत चालली आहे.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सगळी वाहतूक होते ते मुंबई शहर आणि अलिबागजवळच्या रेवस-मांडवाच्या मध्ये असलेल्या समुद्राच्या चिंचोळ्या पट्ट्यातून. त्यातच मुंबई आणि परिसरात समुद्राची खोली कमी असल्याने फार छोट्या रुंदीचा चॅनेलमधून  मोठ्या जहाजांना ये-जा करावी लागते.  त्यामुळे मुंबई बंदर हे अत्यंत गर्दीचे बंदर म्हणून ओळखले जाते.

भारतीय नौदलाच्या पश्चिमेचे मुख्यालय मुंबई

अशा वदर्ळीच्या ठिकाणी नौदलाचा सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा तळ मुंबई इथे आहे.  नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय या ठिकाणी आहे. त्याची कारणे अनेक आहेत. ब्रिटीशांचं सुरुवातीपासून मुंबई हे एक सत्ताकेंद्र होतं. तसंच मध्य आशियातून युरोपकडे जायला हे बंदर महत्त्वाचे होते.  स्वातंत्र्यानंतर आपला शत्रू पाकिस्तान मुंबईपासून जवळच असल्याने नौदलाच्या युद्धनौकांसाठी मुंबई एक सोयीचं ठिकाण होतं. तसंच जगातील तेलवाहतूकीचा महत्त्वाचा मार्ग असलेले होमुर्झचे आखातही मुंबईपासून जवळच असल्याने मुंबईमधील नौदलाच्या तळाला अनन्य साधारण महत्व आहे.


नौदलाच्या दृष्टीने मुंबई बंदराच्या मर्यादा 
नैसर्गिक वरदान लाभलेल्या मुंबई बंदराला नौदलाच्या दृष्टीने अनेक मर्यादा आहेत. नौदलाच्या दृष्टीने हे बंदर काहीसे अडचणीचे आहे. सर्वप्रथम नौदलाच्या प्रमुख युद्धनौका मग आयएनएस विराट असो, मुंबई, दिल्ली सारख्या विनाशिका असो किंवा पाणबूड्या या मुंबईत तळ ठोकून असतात. पाकिस्तान इथून फक्त  500 किलोमीटरवर आहे. एवढे अंतर पाकिस्तानच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात यायला पुरेसे आहे. त्यामुळे सर्व मुख्य युद्धनौका इथे ठेवणे धोक्याचे आहे. दुसरी गोष्ट मुंबई बंदराची खोली ही मोठ्या युद्दनौकांसाठी पुरेशी नाही. त्यामुळे आयएनएस विराटसारखी 27,000 टन वजनाची युद्धनौका नौदलाच्या तळामध्ये आणता येत नाही. नौदल तळाच्या काहीशी बाहेर ती उभी करावी लागते. तेव्हा विराटची दुरुस्तीवगैरे करणे ही तर अशक्य कोटीतील गोष्ट आहे.

नौदलाच्या तळामध्येही तटरक्षक दलाच्या युद्धनौका तैनात असतात. त्यामुळे जागेची आधीच बोंब असते, युद्धनौका पार्क करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे लागते.  नौदल तळाच्या बाजूला लागूनच मुंबई पोर्ट ट्रस्ट येत असल्याने अनेक मोठी जहाजे उभी असतात.  तर दुस-या बाजूला गेट वे ऑफ इंडिया हा अत्यंत गर्दीचा परिसर येतो.  त्यामुळे या मुंबईच्या महत्त्वाच्या नौदल तळाचे विस्तारीकरण केवळ अशक्य आहे.

मच्छिमारांच्या बोटीबंरोबर अनेक प्रवासी बोटींची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरु असते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने नौदलाला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते.  मालवाहू जहाजांच्या मोठ्या संख्येमुळे नौदलाच्या युद्धनौकांना तळाकडे ये-जा करतांना मोठी काळजी घ्यावी लागते. त्यातच जहाजांची टक्कर, तेलगळती अशा समस्या सध्या निर्माण होत असल्याने नौदलाची डोकेदुखी वाढत आहे.

मुंबई एक आंतरराष्ट्रीय शहर असल्याने अनेक उंच इमारती उभ्या राहत आहे.  त्यामुळं नौदलाच्या तळावर लक्ष ठेवणे , तळावर कुठली युद्धनौका आहे, कुठली मुंबईबाहेर जात आहे याची प्रत्येक मिनिटाची माहिती देणे सहज शक्य आहे. थोडक्यात युद्धनौकांबाबत गोपनीयता ही केव्हाच संपली आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करुन दूरदृष्टी ठेवत नौदलाने मुंबईपेक्षा कितीतरी मोठा, सुरक्षित,  वदर्ळीपासून दूर असा तळ बांधायला सुरुवात केली असून त्याचा पहिला टप्पाही पूर्ण झाला आहे. कारवार इथे आयएनएस कदंब नौदलाचा सर्वात मोठा तळ भविष्यातील आव्हाने झेलण्यासाठी सज्ज होत आहे.

कारवार   -    आयएनएस कदंब
गोव्याच्या दक्षिणेला जवळच कर्नाटकच्या उत्तरा कन्नाडा जिल्ह्याचं मुख्यालय कारवार इथे आहे.   या शहरापासून थोडंसं दूर किनारपट्टीची जागा नौदलाने आपल्या मोठ्या तळासाठी निवडली. तब्बल  11, 200 एकर जमिनीवर 25,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प चार टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे.  पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुस-या टप्प्याचे काम जोरात सुरु आहे. 

नौदलाच्या विविध प्रकारच्या 50 युद्धनौका तैनात केल्या जातील एवढा मोठा हा तळ असणार आहे. भविष्यात भारतीय नौदलात दाखल होणा-या विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य ( 45,000 टन ) , स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत ( 40,000 टन ) या पार्क होऊ शकतील, त्याची जुजबी दुरुस्ती होऊ शकेल याची व्यवस्था इथे केली जाणार आहे. तसंच 8,000 टन वजनाच्या विनाशिका, 6,000 वजनाच्या फ्रिगेट या युद्धनौका,  20,000 टन वजनाच्या लँडिग शिप इथे पार्क होऊ शकतील, दुरुस्त केल्या जातील अशी सुविधा इथे केली जाणार आहे. तसंच पाणबुड्यांचा तळासाठी इथे सुविधा निर्माण केली जाणार आहे.  जवळच हेलिकॉप्टरसाठी तसंच छोट्या मालवाहू विमानांसाठी तळ उभा केला जाणार आहे.  एवढंच नाही तर 10,000 टन वजनाची युद्धनौका ही उचलून ड्राय डॉर्कमध्ये ठेवता येईल अशी सुविधा निर्माण करण्यात येत आहे. मोठ्या  युद्धनौकांना ये-जा करण्यासाठी विशेष मार्गाची आखणी ऑस्ट्रेलियन कंपनीच्या सहाय्याने नौदलाने तयार केली आहे.

100 पेक्षा जास्त खाटांचे नौदलाचे सुसज्ज हॉस्पिटल इथे असेल.   नौदलाचे अधिकारी, नौसैनिक, त्यांचे कुटुंबीय ह्यांना रहाण्यासाठी इथे बांधकामाचा पसारा वाढवला जात आहे.  इतर नौदल तळाप्रमाणे अत्याधुनिक क्षेपणास्त्र विरोधी , विमानविरोधी यंत्रणा बसवली जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठलंही मोठं बंदर कारवारपासून दोन्ही बाजूला किनारपट्टीच्या  200 किलोमीटरच्या परिसरात नसल्याने युद्धनौकांची ये-जा निर्धोक असणार आहे.  कारवार आणि परिसराचे शहरीकरण झालेलं नाहीये. नौदलाचा तळ उभारतांना 11 गावातील 4000 पेक्षा जास्त कुटुंबियांचे पुर्नवसन करावं लागलं.  तेव्हा नौदलाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल असं कुठलंही बांधकाम इथे होणार नाही, या भागात नौदलाचे पूर्णपणे नियंत्रण रहाणार आहे.  

उत्कृष्ठ हिरवाईने वेढलेला कारवारचा आयएनएस कदंब नौदलाचा तळ येत्या 10 ते 12  वर्षात पूर्ण सज्ज  झालेला असेल. त्यामुळे भविष्यात नौदलाचं पश्चिमकडील मुख्यालय मुंबईहून कारवार इथे आलं तर आश्चर्य वाटायला नको.  असं असलं तरी  भौगोलिक स्थानामुळे  मुंबईच्या नौदल तळाचे महत्व जराही कमी होणार नाही.    

3 comments:

  1. भारताला लाभलेला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा हे आपले सामरिक एडव्हान्टेज आहे पश्चिम सागरी किना-याला असलेला परकीय आक्रमणाचा असलेला धोका लक्षात घेता कारवार सारख्या ठिकाणी तयार होणारा तळ ही आवश्यक बाब आहे.

    छान झालाय ब्लॉग. नेहमीप्रमाणेच बरीच नवीन माहिती मिळाली.

    ReplyDelete
  2. खूप माहितीपूर्ण झाला आहे ब्लॉग... फक्त मुंबईचे महत्व कमी होणार नसल्याने... त्याच्या संरक्षणाचे काय ही बाब मांडण आवश्यक आहे. काही उपाय सुचवणे तसेच प्रतिक्रीया मागवणेही आवश्यक आहे.
    माझ्या मते..
    १. मुंबई माझगाव गोदी आणि नौदल तळाच्या नजीकच्या बांधल्या
    जाणा-या उंच इमारतींना परवानगी नाकारली पाहीजे.परळ येथील बांधल्या जाणा-या उंच इमारतीतूनही माझगाव सहज टप्प्यात येऊ शकते.
    २. आधीपासून असलेल्या इमारतींमधील कार्यालये, निवासी यांची माहिती तपशीलासहीत घेतली पाहीजे.
    ३. संरक्षणाच्या दृष्टीने समुद्रातील प्रवासी वाहतूक आणि मालवाहू वाहतूक यांच्या मार्गावर अपघात झाल्यास, मार्ग बदलल्यास कडक कारवाई झाली पाहीजे..
    अर्थात अनेकांनी अशा काही सूचना करणं.. आपल्याच दृष्टीने हितकारक ठरावे..

    ReplyDelete
  3. अमित, ब्लॉग मस्त आहे. माहितीपूर्ण आणि रंजकही. कारवारचे चारही टप्पे पूर्ण होईपर्यंत लागणारी १० ते १२ वर्षं हा काळ खूप मोठा आहे. या काळात मुंबईच्या किनाऱ्यावरचा भार अजून बराच वाढू शकतो. आणि नौदलाचं मुख्यालय मुंबईहून कारवारला गेलं, तर मुंबईच्या किनाऱ्याची सुरक्षा कमी होण्याची शक्यता आहे का, याविषयी जाणून घ्यायला आवडेल...

    ReplyDelete

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...