Friday, February 26, 2010

" ब्लू वॉटर नेव्ही " आणि भारत


युद्धनौकांचा ताफा
ब्लु वॉटर नेव्ही.....म्हणजे ...निळ्या समुद्रातील नौदल असा त्याचा अर्थ होत नाही, तर निळ्या अथांग समुद्रात वर्चस्व गाजवत मुक्त संचार करणारे नौदल. आपल्या नौदल प्रमुखांकडुन हल्ली एखादं वाक्य नेहमी कानावर येते Indian Navy will have Blue Water Capabilities in few Years. तेव्हा ही ब्लु वॉटर नेव्हीची काय भानगड आहे ते पाहू.......

देशाची समुद्रावरची सीमारेषा......

जगातील 71 टक्के भाग पाण्यानं तर 29 टक्के भाग जमिन-बर्फानं व्यापलेला आहे. जगातील निम्म्यापेक्षा जास्त देशांना समुद्रकिनारा लाभला आहे. साधारण किना-यापासून 12 नॉटीकल मैल किंवा सुमारे 22 कि.मी. चा प्रदेशाला प्रादेशिक सागर ( सीमा )-( Territorial Water ) म्हणतात.

या भागावर संबंधित देशाचा पूर्णपणे ह्क्क असतो. तिथं असलेली जैविक संपत्ती, तेल उत्खननाचा अधिकार, केबल वायर टाकण्याचे अधिकार त्या देशाकडे अबाधित असतात. किना-यापासून 200 नॉटीकल मैल म्हणजे 370 कि.मी. पर्यंतच्या समुद्राच्या भागाला विशेष आर्थिक विभाग( Exclusive Economic Zone ) म्हणतात.  या भागावर त्या देशाचा विशेष हक्क असतो. दुस-या देशाची सागरी सीमा या भागात येत नसेल तर या विभागात संबंधित देश काहीही करु शकतो. मात्र दोन देशांचे सागरी सीमा एकमेकांवर ओव्हरलॅप होत असतील तर मात्र संबंधित देशांना चर्चेअंती कुठल्या भागावर हक्क असेल याबाबत निर्णय घ्यावा लागतो.

EEZ च्या पुढे मात्र असलेला समुद्र मात्र सर्वांचाच असतो. या ठिकाणी कुठल्याही देशाला काहीही करण्याची मुभा असते. त्यामुळं जिथं जैविक संपत्ती अमुल्य असेल, तेल सापडण्याची शक्यता असेल, खनिजे मिळण्याचा अंदाज आहे असा समुद्राचा भाग आपल्या अंकित ठेवण्याचा प्रयत्न लष्करी नव्हे तर वरचढ सागरी सामर्थ्य असलेला देश करत असतो.  एवढंच कशाला एखाद्या देशाला शह देण्यासाठी, कुरघोडी करण्यासाठी  समुद्रावर वर्चस्व ठेवावं लागतं.  म्हणुनच आजही समुद्रावर, निळ्या अथांग सागरावर  वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न प्रबळ नौदल असलेला देश पुन्हा पुन्हा करतांना दिसतो.

ब्लु वॉटर नेव्हीची ताकद कोणाकडे आहे ?

जगातील आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असलेले देश जगात सर्व ठिकाणी आपली पाळेमुळे घट्ट रोवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यापैकी सक्षम नौदल हे त्यांचं मुख्य हत्यार. सध्या सुपर पॉवर असलेल्या अमेरिकेचे नौदल ख-या अर्थानं ब्लू वॉटर नेव्ही ची ताकद बाळगणारे आहे. त्यापाठोपाठ रशिया, फ्रान्स, इंग्लड ह्यांचा नंबर आहे. तर काही प्रमाणात ही ताकद असलेले देश म्हणजे भारत, ब्राझिल, स्पेन. या देशांच्या नौदलाकडे काय ताकद आहे ते आधी पाहू...

अमेरिका -  सर्वच बाबतीत म्हणजे आर्थिक, लष्करी, विज्ञान, अंतराळ संशोधन, माहिती-तंत्रज्ञान या गोष्टींमध्ये अमेरिका सर्वांच्या कित्येक पाऊल पुढे आहे. नौदलाचा विचार केला तर भिमकाय, अफाट असं अमरिकेचे नौदल आहे.

अणू ऊर्जेवर चालणा-या विमानवाहू युद्धनौका - 10
                                                         विनाशिका - 52
                                                               फ्रिगेट - 52
                                                  अणु पाणबुड्या - 61
                               Amphibious warfare vessels - 30

तर तब्बल 3, 700 एवढी लढाऊ विमानं, टेहळणी करणारी विमानं, बॉम्बफेक विमानं, मालवाहू विमानं, हेलिकॉप्टर आहेत. तसंच जगात पाच विविध ठिकाणी योकोसुका( जपान ), सीगोनेला आणि नेपल्स( इटली ), मनामा( बहरिन-पर्शियन आखात ) , गुआनटानामो बे ( क्युबा ) , दिओ गार्सिया ( अरबी महासागर ) अमेरिकेच्या नौदलाचे मुख्य तळ आहेत.

इंग्लंड - जगावर राज्य करणा-या इंग्लडंची ताकद आता कमी असली तरी अमेरिकेसारखा खंदा मित्र असल्यानं इंग्लड प्रबळ नौदल होण्याकडे वाटचाल करत आहे.  
                        विमानवाहू युद्ननौका -   3
                                 अणू पाणबुड्या - 12 
                                       विनाशिका -  7
                                                फ्रिगेट - 17   

फ्रान्स- अमेरिका आणि इंग्लडच्या धोरणांपासून काहीसा अलिप्त असलेला फ्रान्स जगाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवून आहे. 
                         विमानवाहू युद्धनौका -   1
                          हेलिकॉप्टर युद्धनौका -  1
                     Amphibious assault ships   - 1
                                         विनाशिका -   13
                                               फ्रिगेट -  11
                                  अणू पाणबुड्या - 10
रशिया -  सोव्हिएट रशिया कोसळल्यानंतर रशिया जगाच्या राजकारणात काहीसा मागे पडला आहे. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेपेक्षा लष्करीदृष्ट्या प्रबळ असलेला रशियाला पूर्वीएवढा ताकदवान नसला तरी अमेरिकेशी टक्कर देणारं सामर्थ्य रशियाकडे आहे.  
 विमानवाहू युद्धनौका - 1
     मोठ्या युद्धनौका  - 5
              विनाशिका - 14
                    फ्रिगेट -   6
      अणू पाणबुड्या - 30

तर ब्राझिल, चीन  या देश विमानवाहू युद्धनौका बांधत आहे,  स्पेनकडे विमानवाहू युद्धनौका आहे. मात्र फक्त चीनकडे अणु पाणबुड्या आहेत. भारताकडे एक विमावाहू युद्धनौका असुन दोन बांधल्या जात आहेत. तर अणु पाणबुड्यांचा ताफा नौदलात समावेश व्हायला 2012 पासून सुरुवात होणार आहे. या देशांकडे( ब्राझिल, भारत, चीन, स्पेन )कडे ब्लू वॉटर नेव्हीची क्षमता येत्या दहा वर्षात प्राप्त होणार आहे.

यामध्ये विमानवाहू युद्धनौका आणि अणू पाणबुड्या सर्वात महत्त्वाच्या .
विमानवाहू युद्धनौकांमुळे किना-यापासून दूर रहात कित्येत हजार किलोमीटर परिघाच्या समुद्रावर वर्चस्व गाजवता येते. म्हणजेच या भागातून जाणा-या जहाजांच्या वाहतूकीवरही नियंत्रण ठेवता येते.

अणू पाणबुड्या त्यांच्या विशिष्ट क्षमतेमुळे पाण्याखाली कित्येक महिने राहू शकतात तसंच रडारवही पटकन दिसून येत नाहीत. यामुळं जगाच्या कुठल्याही भागातून किंवा शत्रु प्रदेशाच्या काही शे किलोमीटर जवळ जात लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या सहाय्यानं हल्ला चढवू शकतात.

ब्लू वॉटर क्षमता का महत्त्वाची ?

यासाठी काही उदाहरणे पाहूया.....

1.....1962 साली Cuben Crisis मध्ये सोविएत रशियाने अमेरिकेपासून काही शे किलोमीटर अंतरावर असलेल्या क्युबामध्ये लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र ठेवण्याचं धाडस केलं. हजारो किलोमीटर दूर असुनही रशियाला हे शक्य झालं ते त्याच्या ब्लू वॉटर नेव्हीच्या क्षमतेमुळे.

2.....1982 च्या फॉकलंड बेटांच्या लढाईत पाच हजार किलोमीटर दूरवरुन चढाई करत इंग्लडनं अर्जेंटिनाला गुडघे टेकायला भाग पडले ते ह्याच क्षमतेवरुन. 

3.....1990 च्या आखाती  युद्धात अमेरिकेची कारवाई यशस्वी झाली ते प्रबळ अशा नौदलामुळेच.

४....कोरियाचे युद्ध असु दे किंवा व्हिएतनाम, या कित्येक किलोमीटरवरच्या  दूर देशांमध्ये प्रचंड लष्करी सामर्थ्य पणाला लावणं अमेरिकेला शक्य ते ब्लू वॉटर नेव्ही या क्षमतेमुळेच.
अमेरिका, रशिया, फ्रान्स, इंग्लंड या देशांकडे प्रबळ नौदल असल्यानं जगातील कुठल्याही कोप-यातून जगातील कुठल्याही देशावर हल्ला करण्याची क्षमता या देशांकडे आहे. चीनकडेही अशी क्षमता येत्या पाच वर्षात प्राप्त होणार आहे.

अशा प्रबळ नौदलामुळे जगातील विविध भागात तळ उभारणे शक्य झाले असुन राजकीय वर्चस्व संबंधित राष्ट्राला शक्य झालंय.  त्यामुळे त्या भागातील नैसर्गिक संपत्तीवरही हक्क सांगता आला आहे.

भारताला याचे काय महत्व  ? 
सर्वप्रथम  भारताचे दक्षिण आशियातील स्थान लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.  भारताच्या तिन्ही बाजूंना समुद्र असुन सौदी अरेबिया जवळंचे पर्शियन आखात, एडनचं आखात आणि मलेशियाजवळंचे मलाक्का आखात अशी तीन आखांताच्यामध्ये भारत आहे. भारत, चीन, जपान मलेशियासह अनेक देशांना आखाती देशांमधुन तेलपुरवठा तसंच जगाशी व्यापार याच मार्गे होतो. दुस-या शब्दात जगातील 60 टक्क्यांपेक्षा तेलाची वाहतूक, जगातील 70 टक्कांपेक्षा जास्त व्यापारी जहाजांची वाहतूक याच मार्गाने होते.

चीन, आफ्रिका खंडातील बहुतेक सर्व देशांमध्ये जोरदार गंतुवणुक करत आहे. यापैकी काही देशातील तर लाखो हेक्टर शेती विकत घेत तिथे पिकं घ्यायला सुरुवात केलीये, खाणकामांचे परवानेही मिळवले आहेत.  केनिय़ा, इथोपिया, दक्षिण आफ्रिका,मोझांबिक, टांझानिया या पूर्व किनारपट्टवरील देशांमध्ये विशेष लक्ष देत आहे.

पाकिस्तानमधील  ग्वादार बंदर, हंबानटोटा हे श्रीलंकेचं बंदर चीन बांधत आहे. तर तीबेटमधुन बर्मा देशातील किना-यापर्यंत महामार्ग बांधण्याची हालचाल करत आहे. अशा रितीने चीन भारताच्या भोवती सर्व बाजूंनी आपला फास आवळत चालला आहे.

उद्या चीनने पर्शियन आखातामधील भारताचा तेलपुरवटा रोखुन धरला तर भारताची चांगली गोची होऊ शकते. कारण ऐनवेळी पाकिस्तानमधल्या ग्वादार बंदरातुन, आफ्रिकेतील पूर्व देशांच्या दिशेने चीनला रसदपुरवटा होउ शकतो. मलाक्काच्या आखातामधूनही चीन बर्मा देशाच्या सहाय्यानं आपली दादागिरी दाखवू शकतो.

म्हणुनच भारताकडे प्रबळ नौदल असणे गरजेचे आहे, यामुळे किनारपट्टीपासून दूरवर भारतीय नौदल  चीनला चांगला धडा शिकवु शकतो. वेळ प्रसंगी चीनकडे जाणारा व्यापारही रोखु शकतो. हे फक्त शक्य आहे ते ब्लू वॉटर नेव्ही या क्षमतेमुळे.

 सध्या भारताकडे आयएनएस विराट ही  एकमेव विमानवाहू युद्धनौका असून ती 2012 मध्ये सेवेतून बाद होत आहे.  मात्र एकही अणू पाणबुडी कार्यरत नाही.  2012 च्या अखेरीस रशियाकडुन घेतलेली आयएनएस विक्रमादित्य दाखल होत आहे.  भारत स्वबळावर स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका बांधत असुन ती 2014 ला दाखल होईल.  तर आणखी एक विमानवाही युद्धनौका 2017ला दाखल होणार आहे. सध्या अरिहंत वर्गातील अणू पाणबूडी बांधण्याचं काम वेगात सुरु असुन 2020 पर्यंत अशा सहा पाणबुड्या दाखल होतील अशी अपेक्षा आहे. म्हणजेच ख-या अर्थानं भारताला ब्लु वॉटर नेव्हीची क्षमता 2020 मध्येच प्राप्त होणार आहे.

गेले काही महिने एडनच्या आखातात समुद्री चाच्यापासून व्यापारी जहाजांचे संरक्षण होण्यासाठी भारतीय नौदलाने काही युद्धनौका तैनात केल्या आहेत. या युद्धनौकांनी फक्त भारतीय जहाजांचेच नव्हे तर अनेक इतर देशांच्या जहाजांचं संरक्षण करत सर्वांची वाहवा मिळवली आहे.   भारताची ही कामगिरी ब्लू वॉटर नेव्हीची क्षमता मिळवण्याकडे  एक पाऊल आहे. मात्र चीनची वाढती ताकद बघता आणि संभाव्य धोका लक्षात घेता ही क्षमता लवकरता लवकर भारतीय नौदलानं मिळवणं आवश्यक आहे.

5 comments:

 1. Uttam...
  Informative

  ReplyDelete
 2. ek number mahiti............sudaiwane mi export chya field madhe aahe.tyamule thodifaar mahiti mala yabaddal aahe........chala majya blog wahcakana technical mahiti denara blog aahe.......mazya blog la hi link taku shakate ka?????

  ReplyDelete
 3. awesome man, nicely structured & really very informative...

  ReplyDelete
 4. अभ्यासपूर्ण लेखन.... 1971 च्या आपल्य़ा विजयात नौदलचा वाटा महत्वाचा होता. भारताला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. या किना-यावर वर्चस्व मिळवायचे असेल तर ब्लू वॉटर नेव्हीची क्षमता लवकरात लवकर प्राप्त करणे आवश्यक आहे.
  पाकिस्तान चीन सारख्या देशांबरोबर भविष्यात आपला संघर्ष होऊ शकतो. सांभाव्य युद्धाची व्याप्ती ही व्यापक असेल. भारतीय सीमांचे परकीय आक्रमनापासून संरक्षण करायचे असेल तर ब्लू वॉटर नेव्हीला पर्याय नाही.

  ReplyDelete
 5. leka eavdh changle lihitos mahit nahi. trecker mhanje lay bhari. dongrawasi, aadiwasi, bhumiputra tumhi. goni dandekaranche wanshaj.
  nitin chavan

  ReplyDelete

'मंगल मिशन' चित्रपट, एक Disaster.....

चित्रपटात लिबर्टी घेत आहोत असं एकदा सुरुवातीला स्पष्ट केल्यावर काहीही करता येतं, काहीही दाखवायला चित्रपट निर्माते मोकळे. हे एका अर्थ...