भटकंती - ट्रेक हे माझे व्यसन आहे. संरक्षण दल आणि अवकाश तंत्रज्ञान हे माझे अत्यंत आवडते विषय आहेत. फोटोग्राफी हे माझे पॅशन आहे. ट्रेक, किल्ले, निसर्ग याबरोबर संरक्षण क्षेत्रातील घडामोडी, विविध देशांची संरक्षण व्यवस्था तसंच संरक्षण क्षेत्रातील शर्यतीने जगात झालेले बदल, निर्माण झालेले तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती या विषयांवर लिहायला आवडते.
Thursday, August 4, 2022
इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला
#ISRO
#SSLV
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Launch Vehicle (SSLV) असं या नव्या प्रक्षेपकाचे नाव असून कमी वजनाचे उपग्रह, ५०० किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. हा नवा प्रक्षेपक एका उड्डाणात एकुण ५०० किलो वजनाचे उपग्रह ५०० किलोमीटर उंचीपर्यंत प्रक्षेपित करु शकणार आहे. यामुळे मिनी, मायक्रो आणि नॅनो उपग्रह प्रक्षेपित करणे शक्य होणार आहे.
SSLV प्रक्षेपक का महत्त्वाचा?
इस्त्रोकडे जगातील विविध देश छोटे उपग्रह प्रक्षेपणासाठी सध्या रांगा लावून बसले आहेत. हे छोटे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी आकाराने मोठा, २९० टन वजनाचा polar satellite launch vehicle (PSLV) प्रक्षेपक सज्ज करावा लागतो. इस्त्रोचा हा भरवशाचा प्रक्षेपक ५०० किलोमीटर उंचीपर्यंत २००० पेक्षा जास्त किलोग्रॅम वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करु शकतो. मात्र हा प्रक्षेपक सज्ज कऱण्यासाठी ६०० कर्मचाऱ्यांना काही महिने आधी तयारी करावी लागते. मात्र इस्त्रोचा अवघ्या १०० टन वजनाचा SSLV हा नवा प्रक्षेपक फक्त सहा जणांची टीम अवघ्या सात दिवसांत उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज करु शकते. यामुळे SSLV प्रक्षेपणाच्या माध्यमातून इस्त्रोची मनुष्यबळ आणि पैशांची मोठी बचत होणार आहे.
SSLV पहिले प्रक्षेपण केव्हा?
SSLV प्रक्षेपकाची उंची ३४ मीटर असून व्यास दोन मीटर एवढा आहे. येत्या सात ऑगस्टला SSLVचे पहिले प्रक्षेपण सकाळी नऊ वाजून १८ मिनीटांनी श्रीहरीकोटा इथून होणार आहे. SSLV चे पहिले उड्डाण असल्याने हे प्रायोगिक उड्डाण असणार आहे, या मोहिमेला इस्त्रोने SSLV-D1 असं नाव दिलं आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून १३५ किलोग्रॅम वजनाचा EOS 02 नावाचा मायक्रो सॅटेलाईट ( microsatellite) ३५० किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित केला जाणार आहे. या उपग्रहाचा कार्यकाल हा १० महिने निश्चित करण्यात आला असून जमिनीची छायाचित्रे काढण्याचे काम करणार आहे. तर ग्रामीण भागातील ७५० विद्यार्थ्यांनींनी बनवलेला आठ किलोग्रॅम वजनाचा AzaadiSAT नावाचा उपग्रहही प्रक्षेपित केला जाणार आहे.
या नव्या प्रक्षेपकाचे प्रक्षेपण अनुभवण्यासाठी इस्त्रोने प्रेक्षक गॅलरी खुली केली असून इच्छुक नागरीकांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या नव्या प्रक्षेपकाच्या माध्यमातून उपग्रह प्रक्षेपणाचा एक नवा आणि सोपा पर्याय इस्त्रोसाठी उपलब्ध होणार आहे.
Saturday, January 1, 2022
भारत लवकरच 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्र निर्यात करणार...
#BrahMos
#cruisemissile
#indianarmedforces
#Philippines
#indonesia
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताची आणखी एक ओळख म्हणजे शस्त्रास्त्रांची आयात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वसंरक्षणासाठी भारताने सुरुवातीपासून बहुतांश शस्त्रास्त्रे ही आयात करण्यावर भर दिला आहे. लढाऊ विमाने, मालवाहु विमाने, हेलिकॉप्टर, तोफा, रणगाडे, युद्धनौका अशी प्रमुख शस्त्रास्त्रे आपण मोठ्या प्रमाणावर आयात केली. विशेषतः शीत युद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आयात करण्यावर भारताने भर दिला. मात्र गेल्या काही वर्षात आपण संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत हळुहळु स्वावलंबी होत असून काही प्रमाणात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर स्वबळावर बनवत आहोत. आता तर क्षेपणास्त्रे, युद्धनौका बनवण्याच्या बाबतीत स्वावलंबी झालो आहोत.
यामधील ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र आता लवकरच निर्यात करण्याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. याबाबत फिलिपिन्स देशाशी चर्चा अंतिम टप्प्यात असून कोणत्याही क्षणी, कधीही या कराराबाबत घोषणा होऊ शकते. फिलिपिन्स देशाशी गेल्या काही वर्षात मैत्रीचे संबंध प्रस्तापित झाले असून व्यापार क्षेत्रात सहकार्याची भूमिका आधीपासून घेतली जात आहे, आता त्यात संरक्षण क्षेत्राची भर पडली आहे. विशेषतः चीनच्या दक्षिण समुद्रात चीनचा वाढता हस्तक्षेप लक्षात घेता फिलिपिन्सने भारताशी संरक्षण क्षेत्राबाबत संबंधआणखी बळकट करण्यावर भर दिला आहे. याआधीच भारताच्या युद्धनौका फिलिपिन्स देशाला नियमित भेट देत असून यानिमित्ताने भारत चीनला शह देण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्यास चीनला शह देण्याची एक मोठी संधी फिलिपिन्सला मिळणार आहे.
‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र का प्रभावशाली आहे ?
जगात विविध प्रकारची क्रूझ क्षेपणास्त्र कार्यरत आहेत. यामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे इतरांपेक्षा वेगळे ठरते. ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र आहे, ध्वनीच्या तीनपट वेगाने हे प्रवास करु शकते, तर २९० किलोमीटरपर्यंत अचुक मारा करु शकते. यामुळे हे क्षेपणास्त्र रडारवर शोधणे आणि त्याला भेदणे हे अत्यंत अवघड आहे. भारताच्या लष्कर, नौदल, वायुदलामध्ये विविध ठिकाणी हे क्षेपणास्त्र याआधीच कार्यरत आहे. आता तर ब्रह्मोस क्षेपणास्त्राची नवी आवृत्ती विकसित केली जात आहे. ध्वनीच्या चारपट एवढ्या प्रचंड वेगाने आणि ४०० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अधिक अंतरावर मारा करण्याची क्षमता नव्या ब्रह्मोसमध्ये असेल. भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
ब्रह्मोसच्या निमित्ताने भारत पहिल्यांदाच एखादे मोठे शस्त्र निर्यात करणार आहे. फक्त फिलिपिन्स नाही तर इंडोनेशिया देशाने सुद्धा ब्रह्मोस क्षेपणास्त्र घेण्याबाबत उत्सुकता दाखवली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला
#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...

-
" बेकार " म्हणजे काय ? या ठिकाणी बेकार शब्दाची व्याख्या काय ?... नोकरी नसलेला - नाही... , सुशिक्षित पण नोकरी नाही - तसंही...
-
चर्चेतील हालेवारा गांव सध्या गडचिरोलीतील हालेवारा गाव चर्चेत आहे ते तिथं नक्षलवाद्यांनी केलेल्या 12 लोकांच्या अपहराणांमुळे. आठवडाभरात...
-
" साल्हेर किल्ला " माझा सर्वात आवडता किल्ला. विविध वैशिष्ट्ये मग ती भौगोलिक असो किंवा ऐतिहासिक असो, महाराष्ट्रीतील सर्वात उंच क...