महाराष्ट्रात पर्यटनाला आवश्यक असे काय नाही आहे. घनदाट जंगल आहे, विविध प्रकराच्या जंगलांचे प्रकार आहेत, व्याघ्र प्रकल्प आहेत, सुंदर असा समुद्र किनारा आहे, वाळवंट -ओसाड असा भाग आहेत, थंड हवेची ठिकाणे आहेत, नद्या आहेत, सुंदर अशी धऱणे, तलाव, पाणथळी आणि त्यापरिसरांत वसलेली पक्षी संपदा आहे, इतिहास सांगणारे किल्ले, मंदिरे, राजवाडे, बांधकामे आणि लेणी -शिल्पे आहेत. थो़ड़क्यात बर्फ - बर्फाच्छिदित भाग सोडला तर पर्यटनाला आवश्यक असलेली सर्व मानवनिर्मित, नैसर्गिक ठिकाणे - गोष्टी महाराष्ट्रात आहेत, असं निसर्ग सौदर्य देशातल्या बहुदा कोणत्याच राज्याकडे नसावे. अर्थात हे असल्यामुळे महाराष्ट्र राज्य पर्यंटनाच्या बाबतीत हे भारतात अग्रेसर आहे असं मात्र अजिबात नाहीये. हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या काही मोजक्या पर्यंटन स्थळांचा विकास झाला आहे तर बहुतेक सर्व पर्यटन स्थळांकडे दुर्लक्ष झाले आहे किंवा त्याचा पुरेसा विकास झालेला नाही.
यामध्ये आणखी एका अतिदुर्लक्षित पर्यटन स्थळाचे नाव
घ्यावे लागेल ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील, अशऩीच्या आघातामुळे तयार झालेले आणि जगात अस्तित्वात असलेल्या चारपैकी एक असे निसर्ग निर्मित " लोणार विवर ".
हेच विवर जर मध्यप्रदेश, कर्नाटक किंवा केरळ ,राजस्थानमध्ये असते तर त्या विवराचे आणि परिसराचे सोने केले असते असे दुर्देवाने म्हणावे लागेल, इतके दुर्लक्ष आपण या विवराकडे केले आहे.
बुलढाणा जिल्हयात दक्षिण बाजुला साधारण लोणार गावाला खेटून हे विवर आहे. खऱं तर विवराला खेटून आता छोटेखानी शहर वसले आहे असं म्हंटले पाहिजे. औरंगाबादपासून सुमारे 160 किमी, अकोलापासून 130 आणि बुलढाणापासून 100 किमी अंतरावर हे विवर आहे. साधारण 50 हजार वर्षापुर्वी ( किंवा त्याच्याही आधी ) साधारण 170 ते 200 फुट व्यास असलेली, तब्बल 2 कोटी टन वजनाची अशनी 20 किमी प्रति सेकंद या वेगाने आदळून हे विवर तयार झाल्याचा अंदाज आहे.
ब्रिटीश अधिकारी जे ई अलेक्झांडर या इंग्रजी - लष्करी अधिका-याने 1823 मध्ये हजारो वर्षापुर्वी तयार झालेल्या या विवराचा शोध लावला. प्रत्यक्ष लोणार विवराचा परिघ हा सुमारे आठ किलोमीटर आहे तर सर्व बाजुंनी 60 ते 70 अंश उतार असलेल्या विवरामध्ये 100 मीटर उतल्यावर साधारण चार किलोमीटरचा परिघ असलेले आणि समुद्राच्या पाण्यापेक्षा काही पट खारे असलेले खा-या पाण्याचे सरोवर आहे. या विवराची खोली सुमारे 150 मीटर आहे तर प्रत्यक्ष सरोवराची खोली काही मीटर म्हणजे 5-6 मीटर आहे.
या विवरामध्ये सरोवरच्या परिसरांत चांगले वन- जंगल असून या सान्निध्यात 12 पुरातन म्हणजे किमान हजार वर्षापुर्वी बांधलेली 12 अप्रतिम शिल्पाकृती मंदिरे भले मोडकळीला आलेली का असेना पण ऊन वारा खात अजूनही तग धरून आहेत.
अग्निजन्य खड़कातील या विवरामध्ये विविध प्रकारच्या क्षारची अगदी रेलचेल आहे. या भागातील क्षार, या भागात असणारे जीवाणु, झाडे, प्राणी संपत्ती हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरू शकेल एवढी संपन्नता या विवरामध्ये आहे.
तेव्हा लोणारच्या बाबतीत महाराष्ट्राने कर्मदरिद्रीपणा दाखवला
आहे असं म्हंटले तर ते चुकीचे ठरणार नाही. म्हणूनच जागतिक पर्यटन स्थळ
होईल अशी क्षमता असतांनाही लोणार विवर दुर्लक्षित राहिले आहे असेच म्हणावे
लागेल.
लोणार विवर, यामधील सरोवर आणि विवरामध्ये सरोवराच्या काठावर
असलेली मंदिरे या व्यतिरिक्त लोणार गावांमध्ये काही ठिकाणे ही न चुकता भेट
द्यायला पाहिजेत अशी आहेत.
लोणार विवराकड़े येणारा पाण्याचा एकमेव धावता स्त्रोत म्हणजे "
धार " नावाचे ठिकाण जे गावाच्या वेशिवर लोणार विवराच्या एका बाजूला आहे.
हे धार ठिकाण अप्रतिम मंदिर आणि शिल्पांनी बांधून टाकले गेले आहे.
आवर्जून पहावे असे लोणार गावांतील दैत्यसूदन मंदिर. चालुक्य
काळात 12 व्या शतकांत हे मंदिर बांधले गेले असावे असा अंदाज आहे. मंदिरात
प्रखर अशा नजरेची विष्णुची मूर्ति असून संपूर्ण मंदिर हे शिल्पांनी सजलेले
आहे. विशेष म्हणजे मैथुन शिल्पेही या ठिकाणी पहायला मिळतात. या मंदिराचे
वर्णन , अभ्यास हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल इतके हे मंदिर अप्रतिम आहे.
मोठा मारोती. गावाच्या बाहेर साधारण 9 फुट लांबीच्या
झोपलेल्या म्हणजे आडवा असलेल्या हनुमान मंदिराचे ठिकाण आहे. खरं तर या
ठिकाणाला धार्मिक स्थळाचे स्वरूप प्राप्त झाले असले तरी हनुमान मूर्तिचा
दगड किंवा तो परिसर विशेष चुंबकीय क्षेत्र दाखवतो. लोणार विवराच्या
आघाताच्या वेळी चुंबकीय गुणधर्म असलेल्या अशनीचा काही भाग हा सध्या हे
मंदिर असलेल्या ठिकाणी जाऊन पडला असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
हिंदू, जैन, मोगल, मराठा आणि इंग्रज अशा विविध शासकांचे राज्य
या लोणारमध्ये गेल्या हजार शतकांपासून होते. त्यामुळे त्या त्या
राज्यकर्त्यांच्या खुणा या शिल्पे, मंदिरे आणि बांधकामांच्या स्वरुपात
लोणार कमी अधिक प्रमाणात अस्तित्वात आहेत.
मग एवढ़या सगळ्या गोष्टि असतांना लोणारमध्ये पर्यटक खो-याने
येत असतील आणि त्यांच्यासाठी सोयीसुविधा असतील असे आपल्याला वाटत असेल तर
ते साफ चुकीचे आहे.
लोणार विवराच्या बाबतीत पर्यटकांच्या दृष्टिने काय कमतरता आहेत...
1... सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोणार विवर हे महाराष्ट्राच्या
पर्यटन नकाशावर आहे का असा प्रश्न पडतो, त्याची प्रसिद्धि झाली आहे का अशी
शंका घ्यायला जागा आहे, कारण याची माहितीच नाही अशी परिस्थिति आहे. किंवा
अशनी अघातामुळे तयार झालेले विवर यापलीकडे याची तोंड ओळख देखील कोणाला
नाही.
2...लोणारकड़े येणारे रस्ते कमी अधिक प्रमाण म्हणजे साधारण असा दर्जा राखून आहेत.
3...लोणार गावांत विवराबद्दल माहिती कुठे मिळेल, गाईड कुठे मिळेल याची चौकशी करावी लागते.
4...विवराबद्दल शास्त्रोक्त आणि परिसरातील इतिहासाबद्दल
माहिती देणारी पुस्तिका मिळत नाही. MTDC त्यांच्या हॉटेलमध्ये रंगीत अशी
थ्री फोल्ड मिळते. त्यामध्ये तर लोणार विवर आणि परिसराबद्दल अत्यंत त्रोटक
अशी माहिती आहे.
5... प्रत्यक्ष लोणार विवर बाहेरून बघण्यासाठी,लोणार view साठी
6...लोणार विवरामध्ये उतरण्यासाठी एकमेव वाट - मार्ग आहे. तो
दगडांनी बांधलेला होता पण आता नसल्यातच जमा आहे. तेव्हा balance चे कौशल्य
आजमावत खाली उतरावे लागते.
7...प्रत्यक्ष विवराच्या ठिकाणी जातांना माहिती देणा-या फलकांचा अभाव आहे.
8....विवरामध्ये वाटेचा शेवटचा टप्पा तर भूस्खलन झाल्याने गायब आहे. म्हणजे मातीच्या ढिगा-यावरुनच आपण खाली उतरतो.
9...विवरामधील सरोवराच्या काठावर मोडकळीस आलेल्या पण अप्रतिम शिल्पाकृति असलेल्या 12 मंदिराची माहिती कुठेही नाही.
10...लोणार गावांतील मंदिर - शिल्पाकृति बघण्यासाठी माहिती फलक आणि दिशादर्शक फलकांचा अभाव आहे.
11....लोणार गावांमध्ये किंवा किमान लोणार विवराच्या बाजूला
असलेल्या लोकवस्तीमध्ये हागणदारी मुक्त, स्वच्छ अभियान वगैरे राबवण्याची
नितांत आवश्यकता आहे.
12.... अगदी महत्त्वाचे म्हणजे लोणार विवराबद्दल गावातील
लोकांना आस्था आहे का असा प्रश्न हा सर्व परिसर फिरल्यावर पडतो. जर आस्था
असती तर हा परिसर शासनाच्या मदतीशिवाय कधीच सुशोभित आणि पर्यटकांसाठी
आवश्यक सोयी सुविधांसह केव्हाच विकसित झाला असता.
Good...
ReplyDelete