Thursday, March 24, 2016

व्याघ्र प्रकल्प....एक फार्स ???



व्याघ्र प्रकल्प एक फार्स......म्हणजे व्याघ्र प्रकल्प नकोत का असा त्याचा अर्थ नव्हे.  तर एखादे वन किंवा अभायरण्य अट्टहासाने व्याघ्र प्रकल्प म्हणुन जाहिर करायचे आणि जंगल नव्हे तर वाघ बघायला येणा-या पर्यटकांचा लोंढा वाढवायचा आणि सर्व व्यवस्थेने मिळुन बक्कळ पैसा कमवायचा याला विरोध आहे. म्हणुनच काही मुद्दे मांडावयासे वाटतात.


व्याघ्र प्रकल्प का आवश्यक आहेत, किंवा व्याघ्र प्रकल्पांमुळे काय साध्य होते....

सर्वात महत्वाचे म्हणजे व्याघ्र प्रकल्प जाहिर झाल्यावर वन विभागाचे नियम अधिक कडक होतात आणि त्या वनाचेच नाही तर त्या वनाबाहेरील भागालाही संरक्षण मिळते.

केंद्राकडुन बक्कळ पैसा येतो. व्याघ्र प्रकल्पामुळे संरक्षित वनक्षेत्र वाढते, या भागांतील गावांचे पुर्नवसन, व्याघ्र प्रकल्पामधील विकास कामे लवकर पूर्ण होतात.

वनाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी मग वनअधिकारी, वनसंरक्षक, आवश्यक शस्त्र - वाहने यांची संख्या वाढते.

आणि अर्थात जंगलामधील वाघांबरोबर इतर वन्यप्राण्यांनाही संरक्षण मिळते.


व्याघ्र प्रकल्पासाठी आवश्यक घटक कोणता तर अर्थात वाघ
आणि वाघांची संख्या. राज्यात ताडोबा - अंधारी, पेंच, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव - नागझिरा, बोर असे एकूण सहा  व्याघ्र प्रकल्प आहेत आणि यामध्ये एकूण वाघांची संख्या 190 च्या घरात आहे.  यापैकी ताडोबाचे क्षेत्रफळ 1757 चौरस किमी, महाराष्ट्रातील पेंच 741 चौरस किमी , मेळघाट 2768, सह्याद्री 1165, नवेगाव - नागझिरा 656 तर बोर या नव्यानेच स्थापन झालेल्या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ हे 138 चौरस किमी आहे. यापैकी नवेगांव राष्ट्रीय उद्यान हे 133 चौरस किमी आणि नागझिरा वन्यक्षेत्र हे 152 चौरस किमी आणि आजुबाजुचा भाग मिळून नवेगांव - नागझिरा व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे.

यापैकी पेंच, ताडोबा, सह्याद्री, मेळघाट व्याघ्र प्रकल्प सोडले तर नागझिरा, बोर हे दोन व्याघ्र प्रकल्प ओढूनताणुन केलेले वाटतात किंवा तसा निर्णय घेतलेला वाटतो. राज्यातही यापुढेही काही वन किंवा राष्ट्रीय उद्यानाचा भाग एकत्र करत व्याघ्र प्रकल्प करण्याचा विचार सुरू आहे. हा प्रयत्न काही गैर नाही. पण एखाद्या भागात काही वाघ आढळले तर थेट व्याघ्र प्रकल्प जाहिर करायचा याला काय म्हणायचे.

व्याघ्र प्रकल्पाचा फायदा कोणाला ?

अशा प्रकल्पांचा महत्वाचा फायदा हा ह़ॉटेल व्यावसायिकांना होतो. व्याघ्र प्रकल्प किंवा जवळच्या शहरांत हा व्यवसाय वाढतो. विशेषतः सुट्टीच्या काळात, सिझनच्या काळात हॉटेलचे भाव चढे ठेवले जातात.

पर्यटकांना ने-आण करणारा  वाहतूक गाड्यांचा व्यवसाय जोमाने वाढतो. अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात.

हे सगळे करतांना पर्यटक खिसा सहज खाली करतो. कारण त्याला जंगल नाही, जंगलातील इतर प्राणी नाही तर वाघ बघायचा असतो. त्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार असतो.

साधारण 20 चौरस किमी एवढे एका वाघाचे क्षेत्रफळ असले तरी त्याचा संचार हा त्यापेेक्षा कितीतरी जास्त भागामध्ये असता.  मात्र ज्या व्याघ्र प्रकल्पांचे कमी क्षेत्रफळ आहे असे नागझिरा - बोर हे ते किती वाघांना सामावून घेऊ शकणार हा प्रश्न आहे. छोट्या क्षेत्रफळामुळे त्या भागांत वाघ दिसणे ही निव्वळ अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण अशा छोट्या व्याघ्र प्रकल्पातून पर्यटकांना फिरण्यासाठी वाटा अत्यंत मर्यादित असतात. अशा ठिकाणी वाघ दिसणे हा एक योगायोग म्हणावा लागेल. त्यामुळे नागझिरा, बोर आणि हो पेंचमध्येही, अशा व्याघ्र प्रकल्पात वाघ बघण्यासाठी गेलेल्यांच्या हाती अनेकदा निराशा येते. मात्र या निमित्ताने वाघ बघण्याच्या नादात ( जंगलातील इतर वन्य प्राणी नाही ) पर्यटकाकडुन भरपूर पैसे खर्च झालेले असतात.

तेव्हा असे माझे मत झाले आहे की छोट्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये या व्याघ्र प्रकल्प या गोंडस नावाच्या खाली सुरू असलेली पर्यटकांची लुबाडणूक थांबवली पाहिजे. व्याघ्र प्रकल्प कशाला साध्या राष्ट्रीय उद्यानात, अभयारण्यात, वनामध्ये जंगल सफारी होऊ शकत नाही का, पर्यटकांना चांगली रहाण्याची सोय उपलब्ध होऊ शकत नाही का, जंगल बघण्याचा आनंद मिळु शकत नाही का.. असे प्रश्न मला पडतात. अर्थात यामध्ये पर्यटकांची मानसिकता बदण्याची गरज आहे. पर्यटकांना वाघ बघायला हवा असतो, मात्र व्याघ्र पर्यटन करताना जंगल सौंदर्याकडे दुर्लक्ष कऱणारी पर्यटकांची मानसिकता तेवढीच घातक आहे.

एवढंच नाही तर व्याघ्र प्रकल्पात खास करुन सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या, गाड्यांची संख्या अचानक वाढलेली असते, प्रमाणाबाहेर गेलेली असती, त्यामुळे जंगलाची शांतता भंग होते, वन्य प्राण्यांना त्रास होतो तो वेगळाच. पर्यटकांच्या संख्येबाबत, गाड्यांबाबत कसलेही तारतम्य बाळगले जात नाहीत. हा सगळा खटाटोप सुरु असतो तो फक्त वाघ बघण्यासाठी, जंगल नाही.

म्हणूनच आपल्या राज्यात पेंच, नागझिरा, बोर हे व्याघ्र प्रकल्प अट्टाहासाखाली सुरु झाले आहेत असे वाटते. त्यापेका साध्या वनांत, अभयारण्यात जंगल सफारी विकसित करणे आणि पर्यटकांची वाघ नाही तर जंगल बघण्याची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. अशा वेळी अनपेक्षितपणे वाघ दिसला तर त्याचा आनंद कदाचित जास्त असेल. 

No comments:

Post a Comment

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...