Monday, November 5, 2018

भारताकडे आता ' त्रिशूळ '



स्वदेशी बनावटीची अणू पाणबुडी INS Aihant ने पहिली सामरिक गस्ती मोहीम यशस्वी केली. याच अर्थ हा की देशाची - भारताची त्रिस्तरीय  अणू हल्लासाठीची सज्जता ( Nuclear Triad ) पूर्ण  झाली आहे.

आपल्या देशाचे no first use हे धोरण आहे. म्हणजेच पहिला अणू बॉम्बचा हल्ला न करण्याचे आपण पोखरण अणू चाचणी नंतर जाहीर केले आहे. असं असतांना समजा शत्रू पक्षाने अणू बॉम्बचा हल्ला केलाच तर त्याला आपण प्रत्युत्तर अणू बॉम्बचा हल्ला करत आपण देऊ शकतो. यासाठी विविध पल्ल्याच्या अणवस्त्रवाहू अग्नी क्षेपणास्त्रामार्फत आपली सज्जता याआधीच झाली आहे.

लढाऊ विमानांच्या मार्फत आपण अणू बॉम्ब हा शत्रूपक्षाच्या भागांत घुसत टाकू शकतो. आपल्याकडे मिराज - 2000 या लढाऊ विमानातील एका ताफ्यावर अशी जवाबदारी सोपवण्यात आली आहे. अत्याधुनिक सुखोई - 30 MKI या लांब पल्ल्याच्या लढाऊ विमानाकडे अशी क्षमता आहे.

समजा शत्रू पक्षाच्या हल्ल्यात या दोन्ही गोष्टी नष्ट झाल्या तर मग प्रतिहल्ला कसे करणार ??

यासाठी आपण पाण्याखालून पाणबुडीतून अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता प्राप्त करण्याचा प्रयत्न करत होतो. अणू पाणबुड्या या दीर्घ काळ आपलं अस्तित्व न दाखवता पाण्याखाली राहू शकतात. त्यामुळे अणू पाणबुडीकडे एक सामरिक शस्त्र म्हणून बघितलं जातं.

स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिहंत ही दोन वर्षांपूर्वी भारतीय नौदलात दाखल झाली होती. नुकतीच या अणू पाणबुडीने सामरिक गस्त यशस्वी पूर्ण केली. म्हणजेच दीर्घ काळ पाण्याखाली राहत, गस्ती मोहीम पार पडत अण्वस्त्र हल्ला करण्याचा सराव पाणबुडीने यशस्वी पूर्ण केला. तसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी twitter वरून जाहीर केले. भारताचे Nuclear Triad पूर्ण झाल्याचे अधिकृत जाहीर करण्यात आले.

सध्या अरिहंत पाणबुडी K -15 ( कलाम यांच्या नावाचे अद्याक्षर K ) हे क्षेपणास्त्र पाण्याखालून डागू शकते, ज्याची ७५० ते १००० किमी अंतरा पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. तर  K - 4 हे आणखी क्षेपणास्त्र अरिहंतवर स्वार होण्याच्या प्रतिक्षेत आहे, ज्याची मारक क्षमता तब्बल ३,५०० किमी एवढी मोठी आहे.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अरिहंतबाबतची घोषणा ही महत्त्वाची घडामोड आहे. 

जमीन, हवा आणि पाण्यातून अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता असलेले जगात फक्त काही देश आहेत. अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, इंग्लंड या देशांकडे अशी त्रिस्तरीय अण्वस्त्र प्रतिकाराची रचना आहे. आता या देशांमध्ये भारताने स्थान मिळवले आहे.

अर्थात या देशांकडे मोठ्या संख्यने विविध अणू पाणबुड्या आहेत. भारताकडे अरिहंत आणि 10 वर्षाच्या भाड्याने रशियाकडून घेतलेली आयएनएस चक्र आहे. भारत अरिहंत वर्गातील आणखी दोन पाणबुड्या  बांधत आहोत. अरिहंत वर्गातील पाणबुड्या या सुमारे 6000 टन वजनाच्या आहेत. आपण अधिक मोठी मारक क्षमता असलेली, मोठी क्षेपणास्त्र सामावून घेणाऱ्या पाणबुड्या बांधायला सुरुवात केली आहे. थोडक्यात भारताकडे आणखी पाणबुड्या असणे आवश्यक आहे, भारत त्या दिशेने वाटचाल करत आहे.

भारताने अण्वस्त्र सज्जतेची त्रिस्तरीय रचनेची पहिली पायरी अरिहंत पाणबुडीच्याच्या रूपाने चढली आहे.

थोडक्यात काय तर आपल्या देशावर अणू बॉम्बचा हल्ला झाला तर जमिनीवरून क्षेपणास्त्र डागत, हवेतून लढाऊ विमानाद्वारे आणि त्यानंतरही आता समुद्राखालून अणू पाणबुडी द्वारे क्षेपणास्त्रद्वारे अण्वस्त्र हल्ला करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. 

अर्थात असा हल्ला करण्याची ही वेळ येऊच नये अशी आपण प्रार्थना करुया.


No comments:

Post a Comment

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...