भारताच्या अवकाश संस्थेने - इस्रोने नुकतेच इंग्लडचे दोन उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात धाडले. नुसते धाडले नाहीत तर अत्यंत अचूकरित्या नियोजित कक्षेत पोहचवले. इस्रोचे प्रमुख डॉ के सिवन यांनी ' अत्यंत अचुक, अगदी ठरवल्याप्रमाणे ' असं या मोहिमेचे वर्णन केलं. तर हे उपग्रह इंग्लंडच्या ज्या कंपनीने बनवले त्या ' सर्रे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी ' ने इस्रोचे तर तोंडभरून कौतुक केले.
हे लिहायचं कारण की वर्तमान इतिहासातील हिशोब चुकते करत आहे. आपल्याला आठवत असेल प्रचंड विविधता असलेल्या अविकसित भारताला स्वातंत्र्य देऊनच नये अशी भुमिका विस्टन चर्चिल यांनी मांडली होती. संसदेतील एका भाषणात चर्चिल म्हणाले होते की भारताला स्वातंत्र्य मिळालं तर काही वर्षात या देशांत अराजकता माजेल अशी खोचक, द्वेषात्मक टीप्पणी चर्चिल यांनी केली होती.
मात्र गेल्या काही वर्षांत मोठीच उलथापालथ झाली. अविकसित भारत विकसनशील देश म्हणून गणला गेला. आता तर विकसित अर्थव्यवस्था ( ? ) म्हणून भारत वाटचाल करत आहे. व्यापार - उद्योगधंदे, माहिती तंत्रज्ञान, विविध उत्पादने अशा अनेक गोष्टीत भारताने ब्रिटिशांना sorry आता इंग्लंडला केव्हाच मागे टाकले आहे. त्यापैकीच एक म्हणजे अवकाश तंत्रज्ञान. सदैव अमेरिकेच्या आस-याखाली असलेल्या इंग्लंडला अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात मजल मारताच आली नाही. अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या मोठं नाव असलेल्या युरोपियन स्पेस एजन्सीचा सदस्य असुनही यामध्ये इंग्लंड महत्त्वाची भुमिका बजावू शकला नाही हे विशेष. युरोपियन स्पेस एजन्सी ही प्रामुख्याने फ्रान्स, जर्मनी आणि इटली हेच तीन देश चालवत आहेत.
दूरदृष्टी असलेल्या डॉ विक्रम साराभाई यांनी इस्रोची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी रचलेल्या पायावर तितक्याच जोमाने विविध इस्रोच्या प्रमुखांनी इस्रोच्या घोडेदौडीमध्ये खंड पडू दिला नाही. चुकांमधून शिकत स्वबळावर इस्रोने यशस्वीरीत्या वाटचाल करत जगांत स्वतंत्रपणे नाव कमावले आहे.
आज जगांत सर्वात स्वस्तात उपग्रह पाठवणारा देश म्हणून भारत, भारताची इस्रो संस्था ओळखली जाते. ( आता इस्रोपुढे स्पेस एक्स या अमेरिकेतील खाजगी संस्थेने आव्हान उभे केले आहे हा भाग वेगळा ). इस्रोने इंग्लंडचे दोन्ही उपग्रह हे ऐकूण 220 कोटी रुपयांमध्ये अवकाशात धाडले. अमेरिका ( नासा ) , रशिया, चीन, जपान, युरोपियन स्पेस एजन्सी या संस्थेकडून हेच उपग्रह अवकाशात धाडण्यासाठी किमान तिप्पट पैसे मोजावे लागले असते. त्यामुळेच इंग्लंडच्या सर्रे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी या उपग्रह बनवणा-या कंपनीने इस्रोचा आणि त्यामध्ये इस्रोचा सर्वात भरवशाचा प्रक्षेपक PSLV चा पर्याय निवडला.
हे दोन्ही उपग्रह इंग्लंडला सामरिक वापरासाठी, नगर विकास कामासाठी, नैसर्गिक स्रोत -ठिकाणांचा अभ्यास करण्यासाठी, आपत्कालीन घटनेत लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. तेव्हा एवढी महत्त्वाची कामगिरी असलेले उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी भारतालाच निवडले हे विशेष.
विशेष म्हणजे ही मोहीम पूर्णपणे व्यवसायिक होती, म्हणजेच फक्त इंग्लंड या ग्राहकांचे उपग्रह पाठवण्यासाठीच आखण्यात आली होती. याआधीही भारताने इंग्लंडचे तीन उपग्रह अवकाशात पाठवले होते.
तेव्हा भारताकडे काहीशा उद्दामपणे बघणा-या हेटळणी करणाऱ्या चर्चिलचे यांचे भाषण आठवत रहाते, दिडशे वर्ष फोडत - झोडत राज्य करणारे ब्रिटीश आठवतात.
तेव्हा सध्या वर्तमान हा भूतकाळाचा एकप्रकारे सूड उगवत एक वर्तुळ पूर्ण करत आहे असं वाटत राहतं.
बरोबर ना....?
Good one Amit!
ReplyDeleteGreat..
ReplyDelete