Saturday, May 5, 2012

अग्नी-५ , आता पुढे काय ?



19 एप्रिल २०१२ ला ओडिसा जवळील  व्हीलर बेटांवरुन आठ वाजून दोन मिनिटांनी अग्नि -५ या पहिल्या आंतरखंडीय मारा करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राने अवकाशात झेप घेतली. ५० टन वजनाचे अग्नि क्षेपणास्त्र  50 मीटर एवढा आगीचा झोत मागे सोडत गर्जना करत अरबी समुद्रातील नियोजीत लक्ष्याच्या ठिकाणी निघाले. 22 मिनीटात ते लक्ष्याच्या ठिकाणी अचूक पोहचले. या क्षेपणास्त्राची चाचणी म्हणजे Text Book Launch असे वर्णन डीओरडीओच्या शास्त्रज्ञांनी केली, म्हणजेच जशी चाचणीची आखणी केली होती अगदी तसेच घडले.

अग्नी -5 च्या चाचणीने काय साध्य झाले ?

1..... अग्नी -5 हे क्षेपणास्त्र 5000 किमी ते 5800 किमी एवढ्या अंतरापर्यंत मारा करु शकते. 
        यामुळे संपूर्ण चीन,  जवळपास सर्व रशिया ( उत्तरे-पूर्वेकडचा भाग नाही ) , इस्त्राईलच्या पुढचा सिरिया,
        अर्धा युरोप, आफ्रिकेचा केनिया, इकडे जपान , ऑस्ट्रेलिया पासून काही अंतरावरचा भाग एवढा 
        विस्तिर्ण भाग आवाक्यात आला. त्यामुळे  फक्त चीन नाही तर वेळ पडल्यास एवढ्या भागांतील देशांवर 
        वचक ठेवण्याची क्षमता यामुळे प्राप्त झाली. 

२..... अग्नी -५ हे क्षेपणास्त्र ५००० किमीचे अंतर गाठतांना साधारण मधल्या पल्ल्याच्या वेळी सुमारे 600 
        किमी एवढी उंची गाठते. अग्नी -५ च्या यशस्वी चाचणीमुळे Reentry Technology मध्ये आपल्याला यश
        आले. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जात पुन्हा वातावरणात प्रवेश करतांना क्षेपणास्त्राचा वेग प्रचंड असतो.
        यातच वातावरणाशी घर्षण झाल्याने क्षेपणास्त्र हवेतच जळुन नष्ट होण्याचा धोका असतो. मात्र आपण  
        ही अवघड चाचणी यशस्वी केली. क्षेपणास्त्राचा शेवटचा टप्पा 300 किमीच्या उंचीवर संपला. 
        स्फोटकं असलेला क्षेपणास्त्राचा भाग वातावरणातील उष्णतेचा कुठलाही परिणाम न होता नियोजित
        ठिकाणी कोसळला. वातावरणात प्रवेश करुन परत येतांना टिकून रहाणा-या विशिष्ट धातूंच्या निर्मिती 
        कसोटीला उतरली. या  धातूचा फायदा भविष्यातील मानवी मोहिमांकरता होणार आहे.

३..... गरज पडल्यास या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने आपण एक टन वजनापर्यंतचा छोटा 
        उपग्रह अवकाशात सोडू शकतो.

४...... अग्नी -५ क्षेपणास्त्र प्रवासादरम्यान ६०० किमी पर्यंतची उंची गाठते. या उंचीवर किंवा या कक्षेत 
         साधारण टेहळणी उपग्रह , पृथ्वीची छायाचित्र काढणारे उपग्रह, पृथ्वीच्या वातावरणाचा
         अभ्यास करणारे उपग्रह असतात. तेव्हा अग्नी -५ च्या चाचणीने या उंचीवरील एखादा उपग्रह
         नष्ट करण्याची क्षमता भारताला प्राप्त झाली आहे.

५.....अग्नी- ५ मुळे एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झालीये. कारण एक टन 
        वजनाची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमात अग्नी -५ ची आहे. म्हणजेच शेवटच्या टप्प्यात  ५० ते अगदी 
        २५०  किलोटन क्षमतेचे  एक ते चार अणु बॉम्ब ठेवू शकतो. हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर
        टाकलेल्या अणु बॉम्बची क्षमता प्रत्येकी १५ ते २० किलोटनच्या आसपास होती. यावरुन अग्नी- ५ ची 
        विध्वंसक  क्षमता किती आहे याचा अंदाज येऊ शकतो. मुख्य म्हणजे असा मारा हे  Multiple 
         Independently Targetable Reentry च्या तंत्रामुळे शक्य होतो. हे तंत्रज्ञान अग्नी -५ मध्ये वापरता 
        येऊ शकते. त्यामुळे गरज पडल्यास एकाच वेळी विविध शहरांवर मारा करता येऊ शकतो.

या गोष्टींमुळे अग्नी -५ ची यशस्वी चाचणी हा देशाच्या संरक्षण व्यवस्थेत एक मैलाचा दगड मानली गेली आहे. पुढील २- ते ३ वर्षात आणखी दोन -तीन चाचण्या अग्नी -५ च्या घ्याव्या लागतील.  म्हणजेच सर्व काही सुरळित झाले तर २०१५ पर्यंत अग्नी -५ चा भारताच्या संरक्षण दलामध्य़े समावेश व्हायला हरकत नाही. 


मात्र चाचणी यशस्वी झाली तरी भारतासमोरील आव्हाने अजुनही कायम 


१......भारताचा एक नंबरचा शत्रू म्हणुन ओळखल्या जाणा-या चीनकडे DF-41 हे १५,००० किमी पर्यंत मारा
        करणारे अति दिर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. यामुळे चीन जगाच्या कुठल्याही भागात यामुळे मारा करु 
        शकतो. पण त्याचबरोबर पाण्याखालून मारा करणारे JL-2 हे तब्बल ८,००० किमी पर्यंत मारा करणारे
        क्षेपणास्त्र आहे. आपण आत्ता कोठे ५,००० पर्यंत चाचणीच्या स्वरुपात मजल मारली आहे. त्यामुळे
        आपल्यासाठी दिल्ली अजुन दूर आहे असंच म्हंटलं पाहिजे.

२..... अणु पाणबुडीचा अभाव - भारत आणि चीनचे युद्धाची ठिणगी यापुढे समुद्रातल्या घडामोडींवरुन पडेल
        अशी म्हणण्य़ासारखी परिस्थिती पुढील काही वर्षात उद्भवू शकते. या लढाईत अणु पाणबुडी महत्त्वाची
        भुमिका बजावणार आहे. आपल्याकडे आयएनएस चक्र -२ ही १० वर्ष भाडेतत्त्वार वापरली जाणारी अणु
        पाणबुडी दाखल झालीये. चीनकडे विविध आकाराच्या १० पाणबुड्या आहेत. येत्या पाच वर्षात आणखी
        ६ पाणबुड्या चीन नौदलात दाखल करुन घेणार आहे. भारत आयएनएस अरिहंत या पहिल्या स्वदेशी
        अणुपाणबुडीची चाचणी घेत आहे. या चाचणींवर पुढील अणु पाणबुड्यांच्या बांधणी कार्यक्रम अवलंबून 
        रहाणार आहे.

३..... विमानवाहू युद्धनौका - भारताकडे एक आयएनएस विराट विमानवाहू युद्धनौका आहे, आयएनएस  
        विक्रमादित्य २०१२ च्या अखेरीस दाखल होत आहे. तर स्वदेशी बनावटीची युद्धनौका दाखल व्हायला 
        किमान २०१५ उजाडणार आहे,मात्र याबद्दल सुद्धा साशंकता आहे.उलट चीन एक विमाननावाहू युद्धनौका ,
       जी रशियाकडून विकत घेतली होती ती २०१३-१४ ला दाखल करणार आहे. तर चीन स्वदेशी बनावटीची 
        विमानवाहू युद्धनौका २०१५ पर्यंत दाखल करणार आहे. विशेष म्हणजे चीनच्या विमानवाहू युद्धनौका
        या भारतापेक्षा जास्त मोठ्या असणार आहेत. म्हणजेच विमाने, हेलिकॉप्टर वाहून नेण्याची क्षमता 
        चीनकडे जास्त असेल. मात्र चीनचा युद्धनौका बांधण्याचा वेग लक्षात घेतला तर २०२० पर्यंत भारत या 
        विमानवाहू युद्धनौकांच्या क्षमतेमध्ये आणि संख्येमध्ये मागे रहाणार आहे हे निश्चित.

४.....पुढील युद्धे ही उपग्रहांच्या क्षमतेवर, उपग्रह वापरण्याच्या कौशल्यावर लढली जाणार आहेत. तेव्हा 
       अवकाशातील उपग्रह नष्ट केला तर युद्धाचे पारडे सहज फिरवले जाऊ शकते. उपग्रह नष्ट करण्याची
       म्हणजेच उपग्रह विरोधी प्रणाली ही महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिका, रशिया आणि चीन या फक्त तीन
       देशांकडे ही यंत्रणा आहे. भारताच्या अग्नी -५ कडे ही क्षमता असली तरी त्याची चाचणी अजुन घेतली
       गेलेली नाही. तेव्हा या क्षमतेची चाचणी आवश्यक असून ही प्रणाली कार्यरतही होणे गरजेचे आहे.
       
तेव्हा अग्नी -५ ची चाचणी झाली म्हणजे आपण ( चीनपेक्षा ) अतिशय ताकदवान झालो असे काहीही नाही. संरक्षण दल मजबूत करण्यासाठी भारताला अजुन बरचा पल्ला गाठायचा आहे. कारण एकीकडे पाकिस्तानकडे लक्ष ठेवायचे आहे तर दूसरीकडे ( अमेरिकेशी टक्कर द्यायला निघालेल्या ) चीनसमोर दंड थोपटून भारताला उभे रहावे लागणार आहे. ( भारत - चीन ह्यांच्या संरक्षण दलाच्या सामर्थ्याची तुलना करणारा माझा ब्लॉग वाचावा ). चीनएवढी क्षमता नाही तर स्वतःचे संरक्षण करत चीनला टक्कर देण्याएवढे सामर्थ्य वाढवणे भारतासाठी येत्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताकडे विकसित होणारी क्षेपणास्त्र भेदी प्रणाली हीच एकमेव जमेची बाजु आहे. कारण ही यंत्रणा कार्यरत झाल्यावर शत्रू पक्षाचे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र हवेत नष्ट करणे भारताला शक्य होणार आहे. ( छुपे उद्योग करणा-या ) चीनकडे अजुन तरी ही क्षमता नाही आहे किंवा त्याने तसे दाखवण्याचा प्रयत्नही केलेला नाही. थोडक्यात अग्नी- ५ ची चाचणी हा प्रोत्साहन वाढवणारा एक टप्पा आहे. अग्नी - 5 ची नुसती चाचणी झाली असतांना भारताच्या ( छुप्या ) महत्त्वकांक्षी " सूर्या  " या प्रकल्पाबद्दल चर्चाही सुरु झाली आहे. सुर्या क्षेपणास्त्रचा पल्ला हा ८,००० ते १०,००० च्या घरात असेल अशी चर्चा आहे. असे असले तरी भारताला अजुन बराच पल्ला गाठायचा आहे............        

No comments:

Post a Comment

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...