16 मार्च 2012 ला सादर झालेल्या अर्थसंकल्पात माझ्या मते जगाचे लक्ष वेधुन घेणारी गोष्ट कोणती असेल तर प्रणव मुखर्जी ह्यांनी इस्त्रोसाठी 6715 कोटी रुपयांची केलेली आर्थिक तरतूद. गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल २२८३ कोटी रुपये म्हणजे जवळपास ५० टक्के रक्कम वाढवून दिली गेलेली आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये मंगळ मोहिमेसाठी १२५ कोटी रुपये दिलेत. अर्थसंकल्पातील माहितीनुसार भारत २०१३ च्या नोव्हेंबरमध्ये मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी २५ किलो वजनाचा एक उपग्रह पाठवणार आहे.
खरं ही बातमी विज्ञान प्रेमींसाठी एक सुखद धक्काच आहे. कारण चांद्रयान-१ च्या यशस्वी मोहिनेनंतर २०१३-१४ वर्षासाठी चांद्रयान -२ मोहिमेची आखणी भारत म्हणजेच इस्त्रो-भारतीय अंतराळ संशोधन संस्था करत होती. यामध्ये चंद्राभोवती फिरणारा एक उपग्रह पाठवला जाईल. मग त्यामधुन एक रोवर म्हणजे छोटेखानी गाडी चंद्रावर फिरणार. दगड-मातीचे नमुने गोळा करणार आणि परत पृथ्वीवर आणणार. या मोहिमेबद्दल सर्वांना उत्सुकता असतांना इस्त्रोने मंगळ मोहिम गुपचूप अर्थसंकल्पातून जाहीर करुन सर्वांना सुखद धक्का दिला आहे. कारण 2014-15 नंतर मंगळ मोहिम करण्याचा विचार सुरु होता.
तेव्हा मंगळ मोहिमेचे एवढे महत्व काय, आपल्याला चंद्र फारसा माहित नसतांना आपण मंगळाकडे का वळत आहोत, नक्की कोणावर आपण कुरघोडी करणार आहोत, या मोहिमेचा आपल्याला भविष्यात काय फायदा होऊ शकतो या गोष्टी जाणून घेऊयात.
पृथ्वीसदृष्ट परिस्थीती मंगळावर
मंगळ आणि पृथ्वीचे वातावरण ह्यांच्यात थोडं का होईना साम्य आहे. मंगळावर वातावरण तेही विविध स्तरांचं असलेले अस्तित्वात आहे. मंगळाच्या वातावरणात ९५ टक्के कॉर्बन डायऑक्साईड, २.७ टक्के नायट्रोजन, ०.१३ टक्के ऑक्सिजन आहे. सर्वात मुख्य म्हणजे मंगळाच्या ध्रुवांवर गोठलेल्या अवस्थेत तसंच स्फटिकांच्या रुपात पाणी अस्तित्वात असल्याचं शास्त्रज्ञांचं ठाम मत आहे. या गोष्टी भविष्यात मानवी वस्ती मंगळ ग्रहावर करण्यास मोठ्या प्रमाणात अनुकुल आहेत. कारण आज ना उद्या पृथ्वीवरील वातावरण प्रदुषित झालेले असेल, अफाट लोकसंख्या झालेली असेल त्यामुळे पृथ्वीबाहेर वस्तीसाठी जागा शोधणे मानवासाठी अपरिहार्य असेल.
मंगळावरच्या मोहिमा
शीतयुद्धाला सुरुवात झाल्यावर सोव्हिएत रशिया आणि अमेरिका ह्यांचा सर्वच क्षेत्रात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा आटापीटा सुरु होता. रशियाने १९६० ला दोन कृत्रिम उपग्रह मंगळाकडे पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र अवकाशात झेप घेण्यापूर्वीच त्यांच्या रॉकेटचा स्फोट झाला. १९६२ च्या सुमारास एक उपग्रह मंगळाच्या जवळून गेला आणि अगदी थोडी माहिती पाठवली. मात्र ख-या अर्थाने मंगळाभोवती फिरणारा कृत्रिम उपग्रह पाठवला तो अमेरिकेने. १३ नोव्हेंबर १९७१ ला मरिनर-९ हा कृत्रिम उपग्रह मंगळाभोवती घिरट्या घालू लागला. तर बरोबर १४ दिवसांनी रशियाचा मार्स-२ हा उपग्रह मंगळाभोवती फिरु लागला.
तर २००१२ पर्यंत अमेरिकेच्या वायकिंग १ आणि २ , मार्स पाथफाईंडर, मार्स ओडिसी, स्पिरिट, ऑप्युचर्निटी, फोनिक्स अशा विविध मोहिमा यशस्वी केल्या. यामध्ये काही उपग्रहांनी मंगळाची छायाचित्रे घेतली, काही मोहिमांमध्ये मंगळावर छोटी चालणारी गाडी उतरवली गेली, मातीचे नमुने घेतले, असंख्य प्रयोग केले आणि प्रचंड माहिती मिळवण्यात अमेरिकेला म्हणजेच नासाला यश आले. मंगळावरच्या मातीचे प्रकार, मातीमध्ये आढळणारी खनिजे, वातवरणातील विविध वायुंचे अस्तित्व, वातावरणात होणारे बदल, ऊन-वारा याचे प्रमाण, धुळीचे वादळ अशी असंख्य माहिती मिळवली गेली. त्यामानाने रशियाची फक्त एकच मोहिम यशस्वी झाली. तर युरोपियन स्पेस एजन्सीला एका बहुउद्देशीय उपग्रह मोहिमेत 2007 ला मंगळाची छायचित्रे काढण्यात यश आले. जपानने मंगळाभोवती एक कृत्रिम उपग्रह पाठवला होता. मात्र मंगळाजवळ पोहचल्यावर काही तांत्रिक बिघाडाने ही मोहिम फसली. चीन, 2011 ला रशियाच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने एक कृत्रिम उपग्रह मंगळाकडे पाठवणार होता. मात्र रशियाचा प्रक्षेपक उड्डाण करताच कोसळल्याने चीनची मंगळ मोहिम पृथीवरच संपली.
भारताच्या मंगळ मोहिमेने काय साध्य होणार आहे ?
भारत जो उपग्रह मंगळाकडे पाठवणार आहे, तो उपग्रह नक्की कसा असेल, चांद्रयान प्रमाणे कोणत्या देशांची कोणती उपकरणे उपग्रहावर असतील, अशा अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. मात्र चांद्रयान- 1 प्रमाणे विविध देशांची उपकरणे असणार हे नक्की आणि मंगळावर भारताचे अस्तित्व उमटेल अशीच मोहिम असणार हे सुद्धा नक्की समजले जात आहे. मंगळ ग्रहाची छायाचित्रे घेण्याबरोबर, वातावरणाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न होईल असे उपलब्ध झालेल्या माहितीवरुन दिसत आहे.मंगळ मोहिमेमुळे पुढील काही गोष्टी साध्य होणार आहेत.
1.....चंद्रापेक्षा लांब, दुस-या भाषेत सांगायचे म्हणजे एखाद्या ग्रहावर कृत्रिम उपग्रह पाठवण्याचा अनुभव
भारताला मिळेल. हे करतांना विविध उपकरणांची तयारी, त्याचा अनुभव आपल्याला मिळणार आहे.
2..... या अनुभवाचा उपयोग सुर्याचा अभ्यास करण्यासाठी " आदित्य " हा उपग्रह पाठवतांना होणार आहे.
3.....मोहिमेमुळे भारताचे जगात नाव होईलच आणि आपल्या तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढेल.
4.....मोहिम यशस्वी पार पडली तर जपान आणि चीनवर आपण कुरघोडी करण्यात यशस्वी होऊ.
5..... भारतात मंगळ किंवा त्यानंतर इतर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी वेगळी शाखा तयार होईल. लोकांचा
सहभाग वाढेल.
6.....चांद्रयान- 2 मोहिमेसाठी भारतीय अंतराळ शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास वाढेल.
7......सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारचा ( मठ्ठ राज्यकर्त्यांचा ) इस्त्रोकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल.
आणखी कितीतरी पैसा भविष्यातील मोहिमांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल.
भारताला मंगळ लागू दे
अमेरिकेची म्हणजे नासाची 2020 ला चंद्रावर मानवी मोहिम, 2025 ला एखाद्या लघुग्रहावर आणि 2030 ला मंगळावर मानवी मोहिम आखण्याची तयारी सुरु आहे. अमेरिकेचा या क्षेत्रातील जोर बघता 4-5 वर्ष जास्त पकडली तरी ते सहज साध्य होईल. रशिया ही क्षमता बाळगुन आहे पण त्यांच्याकडे प्रश्न आहे पैशाचा. युरोपियन स्पेस एजन्सी, जपान आणि चीन ह्यांना या बाबतीत मोठा पल्ला गाठायचा आहे. मात्र या देशांनी त्या दिशेने प्रयत्नही सुरु केले आहेत.
तेव्हा या शर्यतीत भारत मागे रहायला नको. भारताच्या अंतराळ संशोधन शास्त्रज्ञांनी ही गोष्ट आधीच ओळखली आहे. म्हणून 2030 वर मंगळावर नासाचा अंतराळवीर उतरत असतांना भारत नुसत्या बघाच्या भुमिकेत नसेल. भारताकडे तोपर्यंत मंगळाबद्दल चांगली माहिती जमा झालेली असेल, या उद्देशाने आत्तापासून तयारी शास्त्रज्ञांनी सुरु केलीये.
पत्रिकांवर विश्वास ठेवण्या-यांच्या दृष्टीने पत्रिकेत मंगळ असणे ही गंभीर गोष्ट असते. ग्रहांची शांती करायला लागते, अनेक पथ्य, जप वगैरे करावे लागतात. मात्र भारताच्या पत्रिकेला हा मंगळ ग्रह मात्र जरुर लागू दे. तेव्हा ही मंगळ मोहिम यशस्वी होऊ दे अशी शुभेच्छा शास्त्रज्ञांना देऊया.
No comments:
Post a Comment