Monday, June 14, 2021

पुढील काही वर्षांत सर्वसामान्यांना अवकाश सफर सहज शक्य....


#कुतूहल
#curiosity 
#BlueOrigin 
#NewShepard 

विमान प्रवासाचं नाविण्य हे केव्हाच संपलं आहे. तुम्ही आम्ही किमान एकदा तरी विमान प्रवास हा केला असेलच यात शंका नाही. असंच काहीसं पुढील काही वर्षांत अवकाश सफरीबद्दल होणार आहे. पुढील काही वर्षे म्हणजे किती तर अगदी ५०-६० वर्षात ???  किंवा त्याआधीही अवकाश सफर शक्य आहे.

हे शक्य होणार आहे कारण अवकाश क्षेत्र हे देशापुरतं मर्यादीत राहिलं नसून आता खाजगी कपंन्यांनी अवकाश मोहिमांमध्ये पाऊल टाकलं आहे. 

हे सर्व लिहिण्याचं निमित्त झालं आहे ते अवकाश प्रवासासाठी असलेल्या अवकाश कुपीतील एका सीटच्या झालेल्या लिलावाचे. 

 'ब्लू ओरीजीन' या अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने अवकाश प्रवासासाठी तयार केलेल्या अवकाश कुपीतील एका जागेचा - सीटचा लीलाव करत ती जागा २८ मिलीयन डॉलर्सला ( म्हणजेच २०५ कोटी रुपयांना ) विकली. ब्लु ओरिजीन कंपनीची स्थापना केली ती ध्येयवेड्या जेफ बेझोस या अब्जाधीशाने. हेच ते ज्यांनी 'अमेझॉन' कंपनी स्थापन करत किरकोळ विक्रेता, ई कॉमर्स क्षेत्रात क्रांती घडवून आणली. या जेफ बेझोसने नासातील तंत्रज्ञ - शास्त्रज्ञ तसंच विविध अभियंता यांना हाताशी धरून 'ब्लु ओरिजन' कंपनी स्थापन केली. उत्तम व्यवस्थापनाद्वारे ही कंपनीने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील आव्हान झेलण्यास सज्ज झाली आहे. 

या ब्लु ओरिजिन कंपनीने गेल्या काही वर्षात चाचण्या करत ' New Shepard ' हे रॉकेट अवकाश मोहिमांसाठी सज्ज केलं आहे. हे रॉकेट अवकाश कुपीला पृथ्वीच्या वातावरणाबाहेर नेऊन पोहचवेल. आता वातावरणाबाहेर म्हणजे किती उंचीवर तर जमिनीपासून १०० किलोमीटरच्या वर म्हणजे साधारण ३ लाख ३० हजार फुट उंचीवर. साधारण या उंचीवर वातावरणातील विविध थर - स्तर संपलेले असतात आणि निर्वात पोकळीला सुरुवात झालेली असते. या १०० किलोमीटरच्या उंचीला Karman line म्हणतात. जगात सर्वसाधारणपणे मान्य करण्यात आलं आहे की Karman line च्या वर किंवा या उंचीपासून अवकाश सुरु होते.

तेव्हा ब्लु ओरिजिनचे  New Shepard हे रॉकेट अवकाश कुपीला या उंचीच्या वर अवकाश कुपीला सोडेल. अवकाश कुपी काही मिनीटे १०० किमीच्या वर प्रवास करेल. याच काळांत अवकाश कुपीतील प्रवाशांना  गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेचा स्वप्नवत असा अनुभव घेता येईल. या उंचीवरुन पृथ्वीची वक्रता, निळा रंग, समुद्र......एकुणच पृथ्वीचे विलोभनीय दृश्य अनुभवता येईल. त्यानंतर गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे या अवकाश कुपीचा जमिनीच्या दिशेने प्रवास सुरु होईल. तीन पॅराशुटच्या सहाय्याने मग ही अवकाश कुपी जमिनीवर सुखरुप उतरेल....असं या सर्व अवकाश प्रवासाचे - वारीचे - सफरीचे नियोजन असणार आहे. हा सर्व प्रवास म्हणजे उड्डाणपासून ते जमिनीवर येईपर्यंतचा फक्त १० ते १२ मिनीटांचा असेल. तसंच उड्डाण झालेल्या ठिकाणासून ते जमिनीवर उतरण्याचं अंतर हे सुद्धा फक्त काही किलोमीटरचे असणार आहे. 

हे उड्डाण suborbital प्रकारातील असणार आहे. म्हणजे अवकाश कुपी हे संपुर्ण पृथ्वीला प्रदक्षणा घालणार नाही, तर पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाऊन लगेच वातावरणात प्रवेश करेल, जमिनीवर पोहचेल. 

तर असं 'ब्लु ओरिजन' कंपनीचे समानव पहिलं उड्डाण येत्या २० जुलैला होणार आहे. या अवकाश कुपीमधून एकुण चार जण अवकाश प्रवास करणार आहेत. एक स्वतः जेफ बेझोस, त्यांचे बंधू मार्क तर तिसऱ्या जागेचा - सीटचा लिलाव करण्यात आला. या लिलावात १५९ देशातील ७,६०० पेक्षा जास्त लोकांनी ( ऑनलाईन ) सहभाग नोंदवला हे विशेष. ही जागा सुमारे २०५ कोटी रुपयांना विकण्यात आली असून लिलावातील त्या विजेत्याचे नाव अजुन जाहिर करण्यात आलेले नाही . तर चौथ्या जागेवर कोण असेल हे सुद्धा लवकरच 'ब्लु ओरिजन' तर्फे जाहिर केलं जाणार आहे. 

यापुढच्या काळांत अशा मोहिमा राबवल्या जाणार असून आणखी शक्तीशाली रॉकेट बनवण्याचा 'ब्लु ओरिजन' मानस आहे. एवढंच नव्हे तर नासाच्या २०२४ पासुनच्या समानवी चांद्र मोहिमेत चंद्रावर कार्गो - सामान पोहचण्याचे कंत्राट हे याच  'ब्लु ओरिजन' ला मिळाले आहे हे विशेष. 

तर अमेरिकेत एलॉन मस्क यांची 'स्पेस एक्स', जेफ बेझोस यांची 'ब्लु ओरिजन', रिचर्ड ब्रॅंनसोन यांची Virgin Galactic यासारख्या खाजगी कंपन्या या अवकाश मोहिमा करत आहेत, भविष्यात करणार आहेत. भले यांना सुरुवातीला नासाने मदत केली असली तरी या कंपन्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. अमेरिकेत काय जगात काय विविध खाजगी कंपन्या या कृत्रिम उपग्रह, रॉकेटचे भाग बनवण्यावर आधीपासून काम करत होत्या, आहेत. आता यापैकी काही कंपन्यानी अवकाश समानवी मोहिमा करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे, टाकायला सुरुवात केली आहे.

एकतर अवकाश मोहिमा या अत्यंत खार्चिक असतात. तेव्हा अवकाश सफरीच्या माध्यमातून बक्कळ पैसाही अशा कंपन्यांना मिळवता येणार आहे. म्हणूनच अशा खाजगी कंपन्यांच्या प्रवेशामुळे, त्यांच्यातील स्पर्धेमुळे अवकाश प्रवास ही काही वर्षांनी सहजसाध्य गोष्ट झालेली असेल यात शंका नाही. त्यामुळेच भविष्यात गर्भश्रीमंत नाही तर उच्च मध्यमवर्ग त्यानंतर अगदी सर्वसामान्यही थोडी पैशाची साठवणूक करुन अवकाश वारी सहज करु शकेल. 

तेव्हा 'ब्लु ओरिजिन' ने केलेला अवकाश कुपीतील जागेचा - सीटचा लिलाव हे भविष्यातील अवकाश सफरीच्या मार्गातले एक छोटे पाऊल ठरलं आहे. 

अवकाश पर्यटनाची ही सुरुवात आहे. 

बघूया, सर्वसामान्यांना या सफरीसाठी किती काळ वाट पहावी लागते ते....

No comments:

Post a Comment

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...