Saturday, May 1, 2021

इंडोनेशियाच्या पाणबुडी अपघाताच्या निमित्ताने.........


सध्याच्या कोरोना संकट काळांत आजूबाजूला, जगात सगळीकडे मृत्युचे थैमान सुरु आहे, मन सुन्न झालं आहे. 

असं असतांना एका अपघातामधील मृत्यु मनाला आणखी चटका लावून गेले. अपघात होता इंडोनेशिया नौदलाच्या पाणबुडीचा अपघात. यामध्ये KRA Nanggala नावाच्या सुमारे १३०० टन वजनाच्या पाणबुडीला पाणतीर डागण्याचा ( torpedo firing ) सराव करतांना जलसमाधी मिळाली. ही पाणबुडी सुमारे १५०० मीटर खोल समुद्रात बु़डाली. वीज पुरवठ्यात तांत्रित बिघाड झाल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात पाणबुडीतील सर्वच्या सर्व ५३ नौसैनिक - अधिकारी यांचा मृत्यु झाला. 

जगातील संरक्षण क्षेत्रात विशेषतः पाणबुडी विभागांत अशा अपघातांकडे जरा जास्तच संवेदनशीलपणे बघितले जाते, मग ती पाणबुडी दोस्त राष्ट्राची असो, शुत्रपक्षाची किंवा तटस्थ संबंध असलेल्या देशाच्या नौदलाची. जेव्हा अशा पाणबुडीच्या अपघातांमध्ये नेमके कारण तेव्हा समोर येते त्याचा अभ्यास, त्याची दखल, त्याची नोंद हे पाणबुडी बाळगणारे देश घेतात. पाणबुडीमध्ये काम करणे हे नेहमीच एक आव्हानात्मक राहीले आहे. त्यामुळे पाणबुडी आणि त्यामध्ये काम करणाऱ्या, अत्यंत प्रशिक्षित मनुष्यबळाला संबंधित नौदल प्राणपणाने जपत असते. त्यामुळे इंडोनेशियाच्या पाणबुडीच्या अपघाताची दखल ही जगभरातील नौदलाने विशेषतः पाणबुडी बाळगणाऱ्या नौदलांनी घेतली आहे. 

पाणबुडी आणि प्रशिक्षित मुनष्यबळ - मुळात पाणबुडी ही युद्धसामग्रीमधील एक अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीची रचना असलेलं शस्त्र आहे. डिझेल इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर चालणारी पाणबुडी असो किंवा अणु ऊर्जेवर चालणारी पाणबुडी...यांची बांधणी मुळातच एक आव्हानात्मक काम राहिलं आहे. त्यामुळे सर्वच देशांना पाणबुडी बांधणे शक्य होत नाही. दुसरं महायुद्ध किंवा त्यानंतरचा शीत युद्धाचा काळाच्या तुलनेच सध्याच्या पाणबुड्या या दीर्घकाळ, शांतपणे, स्वतंःच्या अस्तित्वाचा ठावठिकाणा न लागू देता समुद्रात, समुद्राच्या पृष्ठभागाखाली मुक्तपणे संचार करु शकतात. विविध प्रकारच्या शस्त्रांमुळे -- पाणतिर ( Torpedo ), पाण्याखालून जमिनीवर - समुद्राच्या पृष्ठभागावरील युद्दनौकेवर मारा करता येतील अशी विविध पल्ल्यांची क्षेपणास्त्रे यांमुळे पाणबुडी हे नौदलाचे सर्वात घातक शस्त्र ठरते. त्यातच जर अणु ऊर्जेवर चालणारी पाणबुडी असेल तर पाणबुडीची संचार-मारक क्षमता शतपटीने वाढलेली असते. विविध प्रकारची सोनार यंत्रणा यामुळे पाण्याखालून संचार करतांना आजुबाजुला काय आहे, समुद्राच्या पृष्ठभागावर कोण आहे याचा अचुक थांगपत्ता पाणपुडीला लागत असतो. अशा अत्यंत क्लिष्ट तंत्रज्ञान असलेल्या पाणबुड्या चालवणे हे सुद्धा तेवढेच आव्हानात्मक असते. इथे कोणतीही चूक ही जीवघेणीच ठरू शकते. स्वतः केलेली चूक ही अख्खी पाणबुडीला बुडवू शकते. 

तेव्हा अशा पाणबुड्यांमध्ये काम करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ अत्यंत आवश्यक असते. ते तयार करणे हे एक मोठं जिकरीचे काम असते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणबुडीमध्ये काम करणे हे संपुर्णपणे ऐच्छिक असते. पाणबुडीमध्ये काम करण्यासाठी सक्ती केली जात नाही. तर नौदलात विविध पदावर नियुक्त झालेली कोणतीही व्यक्ती - अधिकारी  - नौसैनिक पाणबुडीसाठी काम करण्यासाठी इच्छा व्यक्त करु शकते. पाणबुडीत काम करणे हे आव्हानात्मक असते कारण एका बंदिस्त आणि अत्यंत मर्यादीत जागेत दिर्घकाळ काम करावे लागते. काम करतांना डोकं शांत ठेवणे, आपल्या वागणुकीचा - स्वभावाचा त्रास - अडचण कोणाला होऊ न देणे, संकटाच्या वेळी इतरांना सहकार्य करणे, स्वतःला नेमून दिलेल्या कामा व्यतिरिक्त गरज पडल्यास विविध विभागात काम करण्याची हातोटी असणे असे अनेक पैलू हे काटेकोरपणे तपासले जातात. त्यानंतर पाणबुडीमध्ये काम करण्याची जबावदारी सोपवली जाते. 

पाणबुडीत काम करतांना विशेषतः अणु पाणबुडीसारख्या तुलनेत मोठ्या पाणबुडीत काम करतांना काही दिवस - आठवडे बाहेरचे जग बघता येत नाही, अगदी साधा सुर्यप्रकाश अंगावर घेता येत नाही.  तेव्हा सर्व परिस्थितीमध्ये तावून सुलाखून निघालेल्या नौसैनिक - अधिकाऱ्यांनाच पाणबुडीत काम करण्याचा मान मिळतो. 

थोडक्यात विविध कौशल्य असलेल्या, मानसिकदृष्ट्या अतिशय सक्षम, कणखर अशा नौदलातील मोजक्याच लोकांनाच पाणबुडीमध्ये स्वार होण्याचे भाग्य लाभते. पाणबुडीत काम करणारे नौसैनिक यांना नौदलात एक वेगळाच मान असतो. म्हणूनच पाणबुडी आणि त्यामधील नौसौनिक हे एक संरक्षण दलाचा एक महत्त्वाचा विभाग म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच इंडोनेशियाच्या पाणबुडीला झालेला अपघात हा नौदलाच्या पाणबुडी जगतात काहीसा गंभीर विषय ठरला आहे. 

यानिमित्ताने पाणबुडीच्या काही मोठ्या अपघातांची माहिती देत आहे. यावरुन पाणबुडीचे जग आणि तिथे काम करणारे नौसैनिक याबद्दलची कल्पना तुम्हाला येईल....

USS Thresher, सुमारे ३७०० टन वजनाची अणु ऊर्जेवर चालणारी पाणबुडी १० एप्रिल १९६३ ला अमिरिकेच्या पुर्व किनाऱ्यापासून सुमारे ३५० किमी अंतरावर २६०० मीटर ( ८,४०० फुट ) खोल समुद्रात बुडाली. या पाणबु़डीतील १२९ नौसैनिक मारले गेले. 

K- 141 Kursk या ऑस्कर २ वर्गातील रशियाच्या पाणुबडीला युद्धसराव करत असतांना १२ ऑगस्ट २००० ला जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेत ११८ जणांचा मृत्यु झाला. या पाणबुडीबाबत दोन अप्रतिम माहितीपट आहेत. त्याचीही लिंक देत आहे....जरूर बघा. https://www.youtube.com/watch?v=syf3VxfGw8E https://www.youtube.com/watch?v=uQJ6IMREvz8&t=190s 

USS Scorpion या अमेरिकेच्या अणु ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीला २२ मे १९६८ ला अपघात झाला, ज्यामध्ये पाणबु़डीला जलसमाधी मिळाली आणि ९९ जणांचा मृत्यु झाला. 

INS Dakar डिझेल इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर चालणाऱ्या इस्त्राईलच्या पाणबुडीला २५ जानेवारी १९६८ ला अपघात होत बुडाली, ज्यामध्ये ६० पेक्षा जास्त नौसैनिकांचा मृत्यु झाला. 

फ्रान्स नौदलाची पाणबुडी Minerve ला २७ जानेवारी १९६८ ला अपघातात ७७०० फुट खोल समुद्रात बुडाली ज्यामध्ये ५२ जणांचा मृत्यु झाला. 

सोव्हित रशियाच्या K-129 या अणु पाणबुडीला मार्च १९६८ ला अपघात झाला, पाणबुडी समुद्राच्या तळाशी गेली, ज्यात १०० नौसैनिकांचा मृत्यु झाला. 

तर १४ ऑगस्ट २०१३ ला भारतीय नौदलाची आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडी मुंबईच्या नौदल तळावर झालेल्या अपघातात तळावरच बुडाली ज्यात १८ नौसैैनिकांचा मृत्यु झाला.

1 comment:

  1. उत्तम माहीतीपुर्ण लेख...

    ReplyDelete

चेर्नोबिल अणुभट्टी अपघाताची 35 वर्षे

एखाद्या अपघातामुळे जगामध्ये उलथापालथ होते का ? मानवी चुकीचे सर्वोच्च - टोकाचे उदाहरण कोणते असू शकते ? एखाद्या अपघातामुळे मुळ सिद्धांतावर आ...