Saturday, August 8, 2020

बैरुतच्या स्फोटाच्या निमित्ताने.......

स्फोट या विषयावर ब्लॉग लिहिण्याचं निमित्त दोन कारणांनी आहे. एक बैरुत इथे झालेला, जगाने पाहिलेला शक्तीशाली स्फोट आणि 6 ऑगस्ट - 9 ऑगस्टला अनुक्रमे हिरोशिमा आणि नागसाकी इथे अणुबॉम्बच्या स्फोटाला 75 वर्षे झाल्याचं निमित्त. 

संरक्षण, अवकाश विज्ञान, अणु ऊर्जा हे माझे आवडते विषय. याबाबत वाचन करत असतांना या क्षेत्रातील विविध स्फोटांबद्दल माहिती वाचायला मिळाली. कारण या विषयांत स्फोट हा एक अनिर्वाय भाग आहे. म्हणूनच स्फोटाबद्दलची अशीच काही उत्कंठावर्धक माहिती लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.

तीव्रता आणि संहारकता यामुळे स्फोटाची ताकद समजून येते. स्फोटकामधील रसायन, स्फोट कुठे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये झाला आहे यावरही त्याचे परिणाम अवलंबून असतात. 

सगळ्यात आधी बैरुतच्या स्फोटाबद्दल. सुमारे 2700 टन पेक्षा जास्त साठा असलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याचं आता समोर आलं आहे. या स्फोटाचा आवाज 200 किमीपेक्षा जास्त अंतरापर्यंत जाणवला, एवढंच नव्हे तर या स्फोटामुळे ३.३. एवढी भुकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर नोंदली गेली. या स्फोटची क्षमता ही 2.9 kt ( Kilotonne ) एवढी समजली जात आहे. 

स्फोटाची तीव्रता ही TNT या स्फोटकाच्या ज्वलनाच्या क्षमतेमध्ये मोजली जातात. जसं आरडीएक्स हे एक शक्तीशाली स्फोटक ( संयुक्त रसायन ) समजलं जातं तसं TNT - trinitrotoluene  हे एक अत्यंत शक्तीशाली स्फोटक आहे. एक ग्रॅम TNT च्या ज्वलनाने जेवढी ऊर्जा फेकली जाते त्यानुसार स्फोटाचे मुल्यांकन केले जाते. तेव्हा  2.9 kt क्षमते एवढा स्फोट झाला म्हणजे 2900 टन वजनाच्या TNT च्या ज्वलनामुळे निर्माण झालेली ऊर्जा ही बैरुतमधल्या स्फोटामुळे बाहेर फेकली गेली. ही उर्जा ध्वनी लहरी, उष्णता ( आगीचा लोळ ) अशा स्वरुपात बाहेर पडली. उष्णता ही स्फोटाच्या जागेपुरती मर्यादीत राहीली असली तरी ध्वनी लहरींमुळे मोठं नुकसान झालं. 



तर हिरोशिमा इथे झालेल्य अणु स्फोटाची तीव्रता ही सुमारे 15 kt एवढी होती तर नागासाकी इथल्या अणु बॉम्बची क्षमता ही सुमारे 21 kt होती. या दोन्ही अणु स्फोटामुळे निर्माण झालेली उष्णता आणि ध्वनी लहरींच्या लाटांमुळे तात्काळ अनेक इमारती, बांधकामे नष्ट झाली, हजारो जण तात्काळ मृत्युमुखी पडले. या स्फोटामुळे या परिसरांत पसरलेल्या किरणोत्सारामुळे कालांतराने अनेक जण मृत्युमुखी पडले, अपंग झाले, कॅन्सरसारखे आजार अनेकांना झाले. 

स्फोट हे मानवनिर्मित असतात, अपघातामुळे झालेले असतात तर निसर्गनिर्मितही असतात. तेव्हा प्रमुख स्फोटांचा ओझरता हा आढावा....

1..अणुस्फोट - अण्वस्त्र स्पर्धा ही 1945 पासून जगांत सुरु झाली. काही देश स्वतःकडे शक्तीशाली अण्वस्त्र - अणु बॉम्ब बाळगायला लागले, त्याच्या चाचण्या करु लागले, थोडक्यात अणु स्फोट घडवू लागले. आत्तापर्यंत जगांत 8 देशांनी 2000 पेक्षा जास्त अणु बॉम्बच्या चाचण्या केल्या आहेत. यापैकी अमेरिकेने तब्बल एक हजार पेक्षा जास्त तर रशियाने 700 पेक्षा जास्त, फ्रान्सने 200 पेक्षा जास्त, इंग्लंड आणि चीनने 40 पेक्षा जास्त अणु बॉम्बच्या चाचण्या केल्या आहेत. भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया यांनीही अणु बॉम्बच्या चाचण्या केल्या आहेत. तर इस्त्राईल आणि दक्षिण आफ्रिका हे दोन असे आहेत की ज्यांनी अणु बॉम्बच्या चाचण्या केल्या नाहीत पण त्यांच्याकडे अणु बॉम्ब आहेत.

अणु बॉम्बच्या चाचण्या या हवेत, पाण्यात, जमिनीखाली घेतल्या गेल्या. हे सर्व अणु स्फोट वेगवेगळ्या प्रकाराचे, वेगवेगळे किरणोत्सारी मुलद्रव्य वापरुन केले होते. यामध्ये तीन स्फोट हे अत्यंत शक्तीशाली होते ज्याची नोंद घेतलीच पाहिजे. 

अमेरिकेने १ मार्च १९५४ ला castle bravo नावाने एक अणु बॉम्ब फोडला. या चाचणीची क्षमता होती 15 MT ( Mega Tonne ). म्हणजेच हिरोशिमावर पडलेल्या अणु बॉम्ब पेक्षा castle bravo हा बॉम्ब तब्बल एक हजार पटीने शक्तीशाली होता. हा स्फोटामुळे निर्माण झालेला प्रकाश हा तब्बल 400 किमी अंतरावरुन बघता आला. तर या स्फोटामुळे तयार झालेला ढग ज्याला mushroom cloud ( अळंबीच्या आकारचा ढग ) म्हणतात, त्याने 40 किमी पर्यंत उंची गाठली होती. 

अमेरिकेच्या अणु बॉम्बच्या चाचण्यांना सोव्हिएत रशियाही उत्तर देत होता.  
रशियाने ३० ऑक्टोबर १९६१ ला Tsar bomb या अणु बॉम्बची चाचणी घेतली. ही आत्तापर्यंत सर्वात शक्तीशाली अणु बॉम्बची चाचणी समजली जाते. या अणु बॉम्बची क्षमता होती तब्बल 50 MT. म्हणजेच हिरोशिमाच्या तब्ब्ल 3 हजार 300 पट जास्त. या शक्तीशाली अणु स्फोटामुळे तयार झालेला प्रकाश हा एक हजार किलोमीटर अंतरावरुन सहज बघता आला. 270 किमी अंतरावरुन या स्फोटाचे निरिक्षण करणाऱ्या लोकांच्या डोळ्यापुढे गॉगल असतांनाही काही सेकंद अंधारी आली होती म्हणे. या स्फोटाच्या ध्वनी लहरी या 700 किमीपर्यंत जाणवल्या. एवढंच नाही या स्फोटामुळे तयार झालेल्या ढगाने तब्बल 62 किमी एवढी उंची गाठली होती. हा ढगच विविध ठिकाणी 40 ते 95 किमी एवढा रुंद होता. या अणु स्फोटाच्या हादऱ्यामुळे 5 रिश्टर स्केल एवढ्या भुकंपाची नोंद झाली. 

तर 24 डिसेंबर 1962 ला रशियाने Test 219 या सांकेतिक नावाने 24.2 MT क्षमतेच्या अणु बॉम्बची चाचणी घेतली.

थोडक्यात काय अणु बॉम्ब हे एक भयानक अस्त्र आहे. अणु बॉम्बवरचे संशोधन, त्याच्या चाचण्या, या चाचण्या घेण्यासाठी घेतलेले श्रम, चाचण्यांनतर आलेले अनुभव, अणु बॉम्ब तयार करणे, त्याची निगा राखणे, सेवेतून बाद करणे, अणु बॉम्ब टाकण्यासाठी वेगवेगळी माध्यमे, या सर्वांवर झालेला - होत असलेला खर्च अफाट आहे....... अणु बॉम्ब हा एक स्वतंत्र, कुतुहल चाळवणारा, मन सुन्न करणारा, चिड आणणारा विषय आहे. 

अणु बॉम्ब या विषयांवर पुर्णविराम देतांना एक माहिती.....असं समजलं जातं की दुसऱ्या महायुद्धात जेवढी एकुण एक स्फोटकं वापरली गेली ( अणु बॉम्ब सकट ) त्यांची एकुण क्षमता होती 5 MT. सध्या तर एका क्षेपणास्त्रात एकाच वेळी ( लहान आकाराचे ) 4-5 अणु बॉम्ब टाकण्याची क्षमता असते. ( multiple independent reentry vehicles - MIRV ) ज्याची क्षमता ही 5 MT पेक्षा जास्त आहे. काही अणु ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या अशा आहेत की ज्यामध्ये २४ एक क्षेपणास्त्र सामावु शकतात. तेव्हा एका अण्वस्त्रधारी पाणबुडीमध्ये जग नष्ट करण्याची क्षमता आहे. असो...

२..अपघाताने, युद्धामध्ये, खाणकामानिमित्ताने, दारुगोळा साठवण्याच्या निमित्ताने, इतर रसायने साठवण्याच्या निमित्ताने ( अणु स्फोटा व्यतिरिक्त ) मोठे विस्फोट झाल्याच्या घटना अनेक आहेत. यापैकी काही प्रमुख घटना पुढीलप्रमाणे...

Wanggongchang चा स्फोट - 30 मे 1626 ला बिजिंग शहारागत असलेल्या लष्करी दारुगोळ्याच्या साठ्याला आग लागून हा स्फोट झाला. हा स्फोट एवढा शक्तीशाली होता की तत्कालिन नोंदीनुसार 20 हजार पेक्षा जास्त नागरिक या स्फोटात मृत्युमुखी पडले. अभ्यासकांच्या मतानुसार हा स्फोटाची तीव्रता 10 kT एवढी होती, म्हणजेच हिरोशिमा इथल्या अणु बॉम्बपेक्षा जरा कमी. यामुळे झालेल्या उलथापालथीमध्ये तत्कालिन चीनवर राज्य करणारी मिंग घराण्याची सत्ता संपुष्टात आली हे विशेष. 

पहिल्या महायुद्धात इंग्लंड आणि जर्मनी यांच्यामध्ये झालेल्याा नाविक युद्धात ( Battle of Jutland ) जर्मनीच्या युद्धनौकेने केलेल्या हल्ल्यात इंग्लंडच्या एका युद्धनौकेवरील दारुगोळ्याचा स्फोट झाला, यामुळे आणखी दोन युद्धनौकांनामध्ये स्फोट झाले. यामध्ये एका तासात तब्बल 3000 पेक्षा जास्त नौसैनिक मारले गेले. 

पहिल्या महायुद्धात बेल्जियममध्ये Messsines या खाण परिसरांत इंग्लड आणि जर्मन फौजा आमनेसामने तळ ठोकून लढत होत्या. 7 जुन 1917 ला या खाणीमध्ये 19 स्फोट घडवून आणत इंग्लडने जर्मनीचे कंबरडे मोडले होते. या स्फोटात जर्मनीचे तब्बल 10 हजार पेक्षा जास्त सैनिक मृत्युमुखी पडले होते. 

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या अंमलाखाली असलेल्या सर्बियातील Smederevo शहरातील किल्ल्यात स्फोटकांचा साठा केला जात असे. 5 जुन 1941 ला या ठिकाणी  झालेल्या स्फोटामुळे अर्धे शहर उध्वस्त झाले होते आणि 2000 पेक्षा जास्त सैनिक - नागरीक मृत्युमुखी पडले होते. 

कॅनडात 6 डिसेंबर 1917 ला झालेल्या स्फोटाची तीव्रता ही 2.9 kT -  बैरुत स्फोटाएवढी होती. Halifax नावाच्या बंदरात फ्रान्स देशाच्या मालवाहू जहाजाची नॉर्वे देशाच्या प्रवासी बोटीशी टक्कर झाली. मालवाहू जहाजात असलेल्या ज्वलनशिल रसायनांचा स्फोट झाला. यामुळे झालेल्या स्फोटात 1900 पेक्षा जास्त लोकं मृत्युमुखी पडले होते तर 9000 पेक्षा जास्त जखमी झाले होते. 

मुंबई व्हीक्टोरीया डॉकमधील स्फोट. ( नौदल गोदीमधील स्फोट ) - 14 एप्रिल 1944 ला इंग्लंड नौदलाच्या SS Fort Stikine या मालवाहू जहाजात असलेल्या 1400 टन दारुगोळ्याचा स्फोट झाला. या स्फोटात एक हजार पेक्षा नौसेनिक, कामगार, सर्वसामान्य नागरीक ठार झाले, कित्येक हजार जखमी झाले. कित्येक हजार घरांचे नुकसान झाले. मुंबई बंदर हे जवळपास नव्याने उभारावं लागलं. या स्फोटाचा आवाज म्हणे 80 किमी दुरपर्यंत ऐकायला गेला होता. 

सोव्हिएत रशियाची अमेरिकेशी चांद्रस्पर्धा 1960 च्या दशकांत सुरु होती. 3 जुलै 1969 ला म्हणजे अपोलो 11 मोहिम सुरु होण्याच्या काही दिवस आधी रशिया N 1 या अत्यंत शक्तीशाली रॉकेटद्वारे चंद्राकडे अपोलो सारखे यान पाठवण्याच्या प्रयत्नात होती. रात्री 11.18 मिनीटांनी N 1 रॉकेटने उड्डाण करताच त्याचा स्फोट झाला. 2300 टन वजन असलेले इंधन या रॉकेटमध्ये होते. हा स्फोट इतका शक्तीशाली होता की 35 किमी दूर अंतरापर्यंत याचा प्रकाश सहज बघता आला. यामुळे प्रक्षेपण स्थळ पुर्णपणे नष्ट झालं. 

गेल्या 70 एक वर्षात आधुनिक तंत्रज्ञानामुळे जलवाहतुकीकरता समुद्रात, नदीत तसंच खाण कामाकरता, विविध प्रकल्पांकरता कितीतरी मोठे असे नियंत्रीत स्फोट जगभरात आत्तापर्यंत करण्यात आले आहेत. अर्थात हे सर्व स्फोट नियंत्रित असल्यानं त्याने मनुष्यहानी किंवा आर्थिक नुकसान झाले नाही. 

3.. नैसर्गिक स्फोट - 

ज्वालामुखीचे स्फोट हे पृथ्वीवर झालेले सर्वाधिक क्षमेतेचे स्फोट म्हणायला हवेत. अख्खे खंड - प्रदेश - भुभाग तयार होण्यास किंवा नष्ट होण्यास ज्वालामुखीचे स्फोट कारणीभूत ठरले आहेत. अणु बॉम्ब क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त पट क्षमता - ताकद ही या ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये होती. 

भूकंपामध्येही अणु बॉम्बच्या स्फोटाच्या कितीतरी पट ताकद आहे, विध्वंसक क्षमता आहे. भुकंपामुळे नवीन प्रदेश तयार होण्यास, नष्ट होण्यास हातभार लागला आहे. भुकंपामुळे प्रस्तर रचना वरखाली होत असल्याने ज्वालामुखी, त्सुनामी तयार झाले आहेत. 

भुकंप, ज्वालामुखी या नैसर्गिक घटना गेली लाखो - कोट्यावधी वर्षे सातत्याने पृथ्वीवर सुरु आहेत. 

अशनी आघात - अशनी आघातामुळे सुद्धा प्रचंड, संहारक स्फोट पृथ्वीवर झाले आहेत. सहा कोटी वर्षापूर्वी अशनी आघातमुळेच डायनॉसोरचे साम्राज्य संपुष्टात आले आहे. पृथ्वी 4.5 अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली असावी असा अंदाज आहे. आत्तापर्यंत पृथ्वीने कितीतरी विविध क्षमतेचे अशनीचे आघात झेलले आहेत. अनेकांची संहारक क्षमता भयंकर होती. आपल्याा सर्वांच्या परिचयाचे लोणार सरोवर अशाच एका अशनी आघातामधून सुमारे 47 हजार ते 5 लाख 70 हजार वर्षा दरम्यान तयार झाले असावे असा अंदाज आहेत. या आघातामुळे निर्माण झालेल्या स्फोटाची क्षमता ही काही kT होती असा अंदाज आहे. जून 1908 ला रशियातील Tunguska इथे उल्कापात झाला. म्हणजे 100 मीटर परिघ असलेली महाकाय उल्का Tunguska च्या आकाशात जमिनीपासून 5 ते 10 किमी उंचीवर नष्ट झाली. पण यामुळे निर्माण झालेल्या उष्णता आणि ध्वनी लहरीमुळे 2150 चौरस किमी आकाराचे जंगल नष्ट झाले. या स्फोटाची तीव्रता ही 20 MT असल्याची मानली जाते. हा स्फोट 200 किमी अंतरापर्यंत स्पष्ट ऐकायला गेला. एवढंच नव्हे तर या परिसरांत 5 रिश्टर स्केल भुकंपाची नोंद झाली. 

असे अनेक नैसर्गिक स्फोट आपण पृथ्वीवरचे अनुभवले, बघितले, भूतकाळाचा अभ्यास केल्यावर माहित झाले आहेत. यामुळे जीवसृष्टी नष्ट होण्यास, नव्याने जीव तयार होण्यास मदत झाली आहे. 

पण या पेक्षा शक्तीशाली स्फोट या अनंत विश्वात सातत्याने सुरु असतात. आपल्या सुर्यावरच महाकाय स्फोट हे सातत्याने सुरु असतात. अगदी दोन-चार पृथ्वी सहज मावेल एवढ्या आकाराचे स्फोट सुर्यावर सातत्याने सुरु आहेत. याचे परिणाम आपल्या पृथ्वीच्या वातावरण कमी जास्त प्रमाणात होत असतात.

जुलै 1994 मध्ये शुमेकर लेवी नावाचा धुमकेतू तुकड्यांच्या स्वरुपात गुरु ग्रहावर धडकला. यामुळे गुरु ग्रहावर मोठाले स्फोट झाले, अर्थात हे स्फोट हे महाकाय गुरु ग्रहाने सहज पचवले असले तरी या स्फोटाची क्षमता ही तब्बल 60 लाख MT एवढी समजली गेली.  

विश्वात ताऱ्यांची निर्मिती, आंतर बदलाने तारे नष्ट होणे, ताऱ्यांचे स्फोट, ताऱ्यांची टक्कर, कृष्ण विवर एकमेकांच्या प्रभावाखाली येणे यांमुळे महाकाय ऊर्जा प्रक्षेपित केली जात असते, फेकली जात असते. 

साधारण एक हजार वर्षापूर्वी म्हणजे साधारण 1054 या वर्षी एका ताऱ्याच्या 
स्फोटाची नोंद जगभरातील खगोल अभ्यासकांनी करुन ठेवली आहे. या ताऱ्याचा स्फोट एवढा मोठा होता त्याचा प्रकाश पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा काहीसा कमी होता पण हा  प्रखर प्रकाश सुमारे 2 वर्षे दिसत होता. हा तारा आता SN1054 या नावाने ओळखला जातो आणि त्याचे राहिलेला अवशेष हे आता Crab Nebula या नावाने प्रसिद्ध आहेत. आकाशात खगोलप्रेमींनी सर्वात जास्त अभ्यासलेली गोष्ट म्हणूनही Crab Nebula प्रसिद्ध आहे. सांगायचा हेतू हा की Crab Nebula हा पृथ्वीपासून तब्बल 6,500 प्रकाशवर्ष दुर आहे. थोडक्यात स्फोटामुळे तयार झालेला प्रकाश हा 6500 वर्षांनंतर 1054 ला पृथ्वीपर्यंत पोहचला आणि हा प्रकाश दिसला तोही स्पष्टपणे. म्हणजे बघा किती शक्तीशाली स्फोट होता तो. 

अनेक स्फोट हे फक्त दुर्बिणीतून बघितल्यावर जाणवतात, कळतात, झाल्याचं समजून आलं आहे. 

तेव्हा हजारो आकाशगंगा, अब्जावधी शब्द कमी पडेल एवढे तारे - धुमकेतू, कृष्णविविर असलेलं हे अनंत असं विश्व अशा महाप्रचंड स्फोटांनी खचाखच भरलेलं आहे. बैरुत, हिरोशिमा, नागासाकिचा स्फोट हे त्यापुढे काहीच नाही.

3 comments:

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...