Tuesday, February 4, 2020

अलविदा स्पिटझर....


जगभरात विविध विषयांवर चर्चा,आरोप प्रत्यारोप होत असतांना एक दखल घेण्याजोगी गोष्ट घडली. खरं तर या घटनेचा सर्वसामान्यांशी तसा काहीही संबंध नाही. म्हणून तर त्या घटनेची फक्त त्या विषयापुरतीच दखल घेतली गेली. 

नासाने स्पिटझर नावाच्या अवकाश दुर्बिणीला नुकताच निरोप दिला, सन्मानाने निवृत्त केलं. 

खरं तर डोळ्यांनी दिसणाऱ्या प्रकाशाच्या माध्यमापेक्षा विविध तरंगलांबीमध्येही प्रकाश हा अस्तित्वात असतो जो विविध भिंगातून बघावा लागतो. पृथ्वीवरुन आकाशाचे निरिक्षण करतांना अनेक अडचणी आणि मर्यादा असतात. अवकाशात दुर्बिण पाठवत अथांग असं अवकाश का न्याहाळू नये अशी संकल्पना २० व्या शतकांत पुढे आली. अशी संकल्पना मांडणारी व्यक्ती म्हणून सैध्दांतिक भौतिक वैज्ञानिक लायमन स्पीटझर याचं नाव घेतलं जातं. दोन ताऱ्यांच्यामध्ये असलेला अवकाश ( interstellar medium ), ताऱ्यांची निर्मिती अशा विविध विषयांवर स्पिटझर यांचा गाढा अभ्यास होता. एवढंच काय दुसऱ्या महायुद्धातील अणुबाॉम्ब निर्मिती प्रकल्पाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. प्रसिद्ध हबल दुर्बिणीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात स्पिटझर यांचा मोलाचा वाटा होता.

म्हणूनच नासाने इन्फ्रारेड अवकाश दुर्बिणीला ( Infrared space telescope ) स्पिटझर यांचे नाव देत यशोचित सन्मान केला. ( अवकाशातील अवरक्त किरणे टिपणारी, अवरक्त प्रकाशाद्वारे छायाचित्रे काढणारी अवकाश दुर्बिण ). 

सुमारे 950 किलो वजनाची स्पिटझर अवकाश दुर्बिण ही २५ ऑगस्ट २००३ ला पृथ्वीपासून सुमारे ५६८ किमी उंचीवर प्रक्षेपित करण्यात आली. मात्र त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेशी समांतर मात्र पृथ्वीपासून दुर सुमारे १५ कोटी किलोमीटर अंतरावर स्पिटझरला स्थिर करण्यात आले. म्हणजेच पृथ्वीच्या कक्षेतच मात्र पृथ्वीपासून दूर राहत कुठल्य़ाही अडथळ्याविना स्पिटझरने अवकाशाचे निरिक्षण करायला सुरुवात केली. मोहिमेचे नियोजन फक्त अडीच वर्षांचे होते. मात्र वेळोवेळी स्पिटझरला मुदतवाढ देण्यात आली. ३० जानेवारी २०२० ला निवृत्त होईपर्यंत ढिगभर माहिती स्पिटझर अवकाश दुर्बिणीने अवकाश संशोधक, अभ्यासक, संस्था आणि शास्त्रज्ञांना उपलब्ध करु दिली आहे. या दुर्बिणीने अवकाशाची असंख्य अवरक्त प्रकारातील छायाचित्रे काढत अवकाशाकडे बघण्याचा, अवकाशाला समजून घेण्याचा एक नवा दृष्टीकोनच दिला. 

या दुर्बिणीमुळे काही अवकाशातील प्रमुख शोध आणि माहिती जगापुढे आणली गेली. त्याची यादी पुढे देत आहे. 

1.. सर्वात दुरवरच्या म्हणजेच तब्बल ३२ अब्ज प्रकाशवर्षे दुर असलेल्या GN-Z11 आकाशगंगेचा शोध लावला.  

२.. ताऱ्याची निर्मिती होतांना त्याची जी पहिली अवस्था असते - गर्भावस्था असते - protostar असंही म्हणतात, त्याचे पहिले छायाचित्र काढले गेले. 

३.. शनी ग्रहाची सर्वात मोठी आणि बाहेरची कडी शोधली. 

४.. बाहेरच्या सुर्यमालेतील लघुग्रहांच्या टकरीची छायाचित्रे काढली. यावरुन आपली सुर्यमाला तयार होतांना ग्रहांची निर्मिती कशी झाली असावी याबद्दल अभ्यास करण्यास मदत झाली. 

५..आपल्या सुर्यमालेप्रमाणे बाहेरील सुर्यमालेत असलेल्या पृथवीसदृश्य ग्रहांच्या वातावरणात पाण्याचे मुलद्रव्य आहेत याचा शोध लावला.

६...सर्वात दुरवरचा म्हणजे १३ हजार प्रकाशवर्ष अंतरावरील पृथ्वीसदृश्य ग्रहाचा शोध लावला. 

७..पृथ्वी जवळून फिरणाऱ्या सर्वात जवळच्या लघुग्रहाचा शोध लावला. 

८..आपल्या आकाशगंगेचा नकाशा तयार करण्याचे महत्वपुर्ण काम केलं. 

९..आपल्यापासून ४० प्रकाशवर्षे दुर असलेल्या TRAPPIST -1 या सुर्याच्या भोवती फिरणारे तब्बल ७ पृथ्वीसदृश्य ग्रह शोधले. 

१०..स्पिटझरने घेतलेल्या असंख्य छायाचित्रांमुळे अथांग अशा अवकाशाचा विस्तार नेमका कसा आणि कोणत्या दिशेने होत आहे याचा अंदाज लावता येणे शक्य झाले. 

११.. तयार होणाऱ्या दोन कृष्णविवरांचा शोध लावला.

यावरुन स्पिटझर अवकाश दुर्बिणीने केलेल्या कामगिरीचा आवाका लक्षात येईल.    

अलविदा स्पिटझर........





No comments:

Post a Comment

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...