Friday, November 28, 2014

आता लोकल ट्रेनला पर्याय शोधा....


मुंबईत काम करणा-या नागरीकांचं आयुष्य दोन गोष्टींवर अवलंबुन असतं..एक म्हणजे वेळ आणि दुसरी म्हणजे लोकल ट्रेन. लोकल ट्रेन ही आयुष्याचा अविभाज्य अंग झालेली आहे. मुंबई शहर , उपनगर आणि परिसरातून दररोज ७८ लाख प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. हा साधासुधा प्रवास नसतो तर तो त्रासदायक, जीवघेण्या गर्दीचा, चीडचीड वाढवणारा, वेळखाऊ, असुरक्षित आणि बरंच काही...असा ठरला आहे.  ३० वर्षांपूर्वी ७ डब्यांची लोकल ट्रेन होती. ती ९ डब्यांची झाली, नंतर १२ डबे, आता १५ डबे घेत लोकल ट्रेन धावत आहे आणि १८ डब्यांच्या लोकलचीही शक्यता बोलली जात आहे.  मात्र दिवसेंदिवस हा प्रवास आणखी धोकादायक होत जात आहे.

लोकल प्रवास करतांना दरवर्षी ३००० पेक्षा जास्त प्रवासी मृत्युमुखी पडतात आणि तेवढेच जखमी होतात. एवढा हा प्रवास भयंकर झाला आहे.  गर्दीच्या वेळी प्रवाशांनी ढासून भरलेली लोकल, बाहेर नाईलाजाने लटकणारे प्रवासी असं सध्याचं विदारक चित्र आहे.

आधी लोकल कल्याण, विरार, वाशी पर्यंत धावायची. आता डहाणू, कर्जत - खोपोली. कसारा, पनवेल पर्यंत धावते. आता या प्रत्येक ठिकाणाहून जादा रेल्वे ट्रँक टाकत जलद लोकलची मागणी होऊ लागली आहे. काही वर्षानंतर उरण लोकल धावतांना बघायला मिळेल. आता तर अलिबाग - पेण पर्य़ंत लोकल ट्रेनची मागणी होत आहे. थोडक्यात आपण लोकलप्रवास टाळण्याऐवजी तो अधिकाधिक कसा करता येईल याकडे लक्ष देत आहोत. थोडक्यात लोकल ट्रेनवर आपण आणखी अवलंबून रहायचा प्रयत्न करत आहोत.

म्हणनूच काही मुद्दे  मांडावासे वाटत आहेत....

1...मुंबईत लोकल ट्रेनचे नेटवर्क हे पश्चिम - मध्य रेल्वेमध्ये विभागलेले आहे. मध्य रेल्वेमध्ये हार्बर - ठाणे वाशी असा भाग येतो. तर दिवा - वसई असाही भाग येतो. हा पसारा 350 किमीपेक्षा जास्त आहे. या सर्वांचा मिळून एक विभाग - झोन तयार करा, या विभागाच्या प्रमुखाला सर्वाधिकार द्या. म्हणजे दरवेळी प्रकल्पांच्या किमंतीमध्ये न अडकता, रेल्वे मंत्रालयाकडे फार खेपा न मारता निर्णय घेता येतील. त्यामुळे लोकल प्रवाशांचे भले होईल.

2...सर्व लोकल गाड्या 15 डबे करण्याचा प्रकल्प, चर्चगेट -विरार उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्प, पनवेल सीएसटी जलद रेल्वे मार्ग प्रकल्प लवकर मार्गी लावावेत. या प्रकल्पांची कामे आत्ता हाती घेतली तर ती पूर्ण होण्याकरता किमान 10 ते 15 वर्ष सहज लागणार आहेत. त्यामुळे लोकलवरील भविष्यातील वाढती गर्दी सामावून घेतली जाणार आहे.

3...मुंबई उपनगरात महामार्ग आणि रुंद रस्तांवर BRTS म्हणजेच जलद बस सेवा सुरु करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांवरील प्रवास जलद होईल आणि बसचे महत्व लक्षात घेता वाहनांची गर्दी कमी होईल.

4...मुंबई शहर आणि उपनगर वगळले तर अनेक ठिकाणी लोकलशिवाय पर्याय नाही. तेव्हा हाच पर्याय निर्माण करण्याची गरज आहे. उदा.. ठाणेच्या पुढे कल्याण - कसारा - कर्जत मार्गावरील प्रवाशांना किमान ठाणेपर्यंत पोहचण्यासाठी रस्ते वाहतूकीचा पर्याय उपलब्ध असणे आवश्यक आहे. पनवेल हे मुंबईला महामार्गाने चांगले जोडले असल्याने जलद बस सेवेचा पर्याय उपलब्ध करुन दिला पाहिजे. दहिसर ते थेट विरारपर्यंत लोकलशिवाय दुसरा पर्याय नाही. तेव्हा यावर गंभीर विचार व्हायला हवा.

5...मोनो रेल्वेपेक्षा मेट्रोचे चांगले जाळे निर्माण झाले पाहिजे. फक्त मुंबईतच नव्हे तर मुंबईत येण्यासाठी मेट्रोचा पर्याय उपलब्ध करुन दिला पाहिजे. उदा... वडाळा - घाटकोपर - ठाणे -  घोडबंदर रोड हा मेट्रोचा भुयारी मार्ग भविष्यात एक चांगला पर्याय ठरणार आहे. खास करुन घोडबंदर मार्गावर रहाणा-या नागरीकांना लोकल पकडण्याची गरजच पडणार नाही. मेट्रो मार्ग नवी मुंबईला जोडल्यास लोकल ट्रेनचा प्रश्नच येणार नाही.

6...लोकलची गर्दी कमी करण्याचा ताताडीचा उपाय म्हणजे सध्याच्या सरकारी - निमसरकारी कार्यालयांच्या कामाच्या वेळा बदलणे. कारण खाजगी कार्यालयांवर बंधन टाकणे काहीसे अवघड आहे. सर्व सरकारी कार्यालये ही 10 -11 वाजता सुरु होतात. हीच वेळ एक तास आधी म्हणजेच 9ची करावी म्हणजे तेवढी लोकलने प्रवास करणारी गर्दी एक - दिड तास घरातून लवकर निघेल. म्हणजेच सकाळीची गर्दी काही प्रमाणात विभागली जाईल. हीच कार्यालये संध्याकाळी 4 वाजता सुटली तरीही गर्दी विभागण्यास मदतच होणार आहे.

7...जलवाहतूक हे आजही दिवास्वप्न राहीलं आहे. जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाल्यास किमान नवी मुंबईतील नागरीकांना काही प्रमाणात का होईना फायदा होईल.

8...आता विरारच्या पुढेही डहाणूपर्यंत लोकल ट्रेन झाल्याने या भागांत वस्ती वाढत चालली आहे. नवी मुंबई  गर्दी पार होण्याच्या मार्गावर पोहचत आहे. बदलापूर आणि टिटवाळाच्या पुढेही वस्ती वेगाने वाढत आहे. तेव्हा साहजिकच लोकलची गर्दी वाढत रहाणार. आणि पुन्हा एकदा लोकलच्या फे-या वाढवा, पाच मिनीटाने लोकल अशा मागण्या काही वर्षांनी होणार. आत्ताच कल्याण -सीएसटी , विरार - चर्चगेट या मार्गावरील लोकल सेवा वाढ होण्याच्या पलीकडे पोहचली आहे. त्यामुळे आता Saturation झाले आहे,  आता लोकलची संख्या वाढवणे शक्य नाही असे रेल्वे अधिका-यांनी सांगण्याची गरज आहे.

9...शेवटी अत्यंत महत्त्वाचे....नोकरी आणि घर हे दोन गोष्टींसाठी आपला मुंबईमध्ये दररोज लोकलने प्रवास सुरु असतो. जर रहाण्याच्या ठिकाणाजवळच नोकरी असेल तर लोकलमुळे वाया जाणारे रोजचे 3-4 तास सहज वाचतील.  त्यामुळे कामामधील परफॉर्मन्स वाढेल, तेव्हा सरकारी कार्यालयांचे आणि त्याचबरोबर नवीन व्यापारी क्षेत्र  - Business Hub यांचे विकेंद्रीकरण झाल्यास लोकल प्रवासातील वेळ वाचेल.

तेव्हा हा लोकल प्रवास कमी झाल्यास आणि त्यासाठी उपायोजना झाल्यास क्रयशक्ती वाढत नागरीकांचे भले होणार आहे, सर्वांचेच भले होणार आहे. 

1 comment:

  1. फारच छान आणि अनुभवाचे बोल आहेत. असे केल्यास नक्कीच गर्दी कमी होईल आणि अपघाताची संख्या सुद्धा. या बाबतीत आपला लेख आणि सूचना रेल्वे मंत्री आणि महाव्यवस्थापक यांस ईमेल द्वारे पाठवितो.

    ReplyDelete

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...