Saturday, November 1, 2014

मंगळयान नंतर आता काय...?




अपेक्षेप्रमाणे इस्त्रोने मंगळ मोहिम यशस्वी केली. अगदी नियोजीत कार्यक्रम पार पाडावा त्याप्रमाणे मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत फिरू लागले आहे आणि माहितीचा पुरवठादेखील सुरु झाला आहे. पहिल्याच मंगळ मोहिमेत मिळालेले यश, अत्यंत कमी खर्चात आटोपलेली मोहिम यामुळे सर्वच म्हणजे जागतीक स्तरावर इस्त्रोचे कौतुक झाले. यशाची नेहमी दुस-याशी तुलना केली जाते. त्यामुळे इस्त्रोचे यश हे ठसठशीत उठून दिसते. अर्थात एखादे यश आणि त्या संस्थेची वाटचाल लक्षात घेतली तर यश काहीसे फिके वाटेल. असंच काहीसे इस्त्रोच्या बाबतीत म्हणता येईल. कारण इतर देशांच्या अवकाश संस्थांची तुलना करता इस्त्रोला अजुन बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. म्हणनूच मंगळ यशाच्या पार्श्वभुमिवर इस्त्रोपुढील आव्हाने लक्षात घेणे महत्त्वाचे वाटते.


उपग्रह प्रक्षेपणाबाबत स्वयंपूर्णता...


2013 च्या डिसेंबरमध्ये GSLV या प्रक्षेपकामध्ये क्रायजेनिक इंजिन यशस्वीपणे वापरले गेल्याने आपण २.५ टन पर्यंत वजनाचे उपग्रह भुस्थिर कक्षेत सोडू शकतो असा आत्मविश्वास आपल्याला आला आहे. अर्थात ज्याप्रमाणे PSLV प्रक्षेपकाने लागोपाठ २७ मोहिमा यशस्वी केल्या आणि 70 उपग्रहांपेक्षा  जास्त,  2 टनापेक्षा कमी वजनाचे उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या सोडले तसे यश GSLV आणि स्वदेशी क्रायजेनिक इंजिनाच्याबाबतीत मिळणे आवश्यक आहे. कारण आजही जड उपग्रह म्हणजे 2 टनापेक्षा जास्त वजनाचे उपग्रह आपण विदेशातील प्रक्षेपकाच्या सहाय्याने सोडतो. थोडक्यात सर्व प्रकारचे उपग्रह स्वबळावर सोडण्याची क्षमता प्राप्त करणे इस्त्रोला आवश्यक आहे.

लवकरच म्हणजे डिसेंबरमध्ये आपण GSLV MK-3 हा प्रक्षेपकाची आपण चाचणी घेणार आहोत. यामध्ये 4 टन वजनाएवढी वस्तू नेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हा प्रयत्न यशस्वी झाला तर आपण स्वयंपुर्ण झालोच म्हणन समजा.

उपग्रह सोडण्याबाबत आपण स्वयंपूर्ण झालो तर परदेशातून उपग्रह सोडण्याच खर्च तर वाचेल पण त्याचबरोबर देशासाठी आवश्यक दळणवळण, लष्करी, दूरसंचार उपग्रह आपण आपल्याला गरज वाटेल तेव्हा पाढवू शकू.



अवकाशात मानवी मोहिम...

स्वबळावर अवकाशात मनुष्याला पाठवणे हे आत्तापर्यंत रशिया, अमिरेका आणि त्यानतर चीनला शक्य झाले आहे. भविष्यातील अवकाश स्थानक, अवकाश स्थानकात वसाहत, चंद्रावर वसाहत वगैरे गोष्टींसाठी या तंत्रावर हुकुमत मिळवणे आवश्यक आहे. अमेरिका अर्थात सर्वात पुढे असून चंद्रावर वसाहत करण्याच्या कागदावरच्या कामाला सुरुवातही झाली आहे.

या तंत्राबाबात अर्थात आपल्याला खूप मजल मारायची आहे. आपण मंगळयान मोहिम यशस्वी करत दूरवर उपग्रह पाठवण्याची आपली क्षमता सिद्ध केली,  त्याचप्रमाणे अवकाश वसाहत किंवा अवकाश स्थानक नाही तर यासाठी आवश्यक असणारी अवकाश मानवी मोहिम या तंत्रात हुकुमत मिळवणे गरजेचे आहे. म्हणनूच चीनशी स्पर्धा न करता किमान समानवी अवकाश मोहिमे आखत यशस्वी कऱणे इस्त्रोसाठी - भारतासाठी महत्त्वाचे आहे.


पृथ्वीबाहेरील मोहिमा...

मगळ मोहिम य़शस्वी झाल्यावर आता चांद्रयान -2 मोहिम कधी याची चर्चा सुरु झाली आहे. या मोहिमेत आपण चंद्रावर एक रोबोट - गाडी उतरवणार असून काही प्रयोग करणार आहोत. त्याचबरोबर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी  " आदित्य " नावाचा उपग्रह पाठवण्याची योजना कागदावर आहे. या निमित्ताने नासाप्रमाणे पृथ्वीचे वातावरण असो, इतर ग्रहांचा अभ्यास असो...एक वेगळी शाखा इस्त्रोमध्ये खूली होणार आहे. अशा शाखांमध्ये संशोधानाला खूप मोठा वाव आहे. अशा ठिकाणी काम करण्यासाठी तरुण , हौशी लोकं उत्सुक आहेत. तेव्हा याबाबतीत इस्त्रो दूरदृष्टी ठेवत काय पाऊल उचलेत हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.


प्रसिद्धीचे काय ??...

सध्याचे युग जाहिरातीचे असून ते इस्त्रोलाही लागू पडते. 65 कोटी किलोमीटर अतंर कापत मंगळापर्यंत पोहचणारी इस्त्रो भारतीयांच्या मनापर्यंत मात्र पुरेशी पोहचू शकलेली नाही. कारण जशी चर्चा क्रिकेटच्या सामन्याची होते, सचिन रिटायर होण्याबाबात होते, मोदी पंतप्रधान होणार की नाही याची होते तशी चर्चा इस्त्रोच्या मोहिमांबाबत होत नाही. निदान त्याची माहितीसुद्धा सर्वसामान्यांपर्यंत धड पोहचत नाही. तेव्हा यशाचे मजले चढणा-या इस्त्रोने प्रसिद्धीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणजे सर्वसामान्यांचा दृष्टीकोन बदलेल, तरुण मोठ्या प्रमाणात इस्त्रोकडे आकर्षित होतील आणि त्याचा फायदा अर्थातच इस्त्रोला होईल.


भारत सरकारच्या मालकीच्या अनेक संस्था आहेत त्यापैकी इस्त्रो ही सर्वात यशस्वी संस्था ठरली आहे. कारण थेट पंतप्रधानांचा हस्तक्षेप, सरकारी नोकरशाहीचे नियंत्रण नाही, संस्थेचा प्रमुख हा संस्थेतीलच शास्त्रज्ञ असणे यामुळे इस्त्रो ठेचकाळत का होईना टप्प्याटप्प्याने यशाच्या पाय-या चढत इथपर्यंत आली आहे.


मंगळयानच्या यशामुळे अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र अजुन बराच पल्ला गाठायचा आहे. नवीन केंद्र सरकार इस्त्रोला आणखी आर्थिक बळ देवो....पुढच्या वाटचालीसाठी इस्त्रोला शुभेच्छा....




1 comment:

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...