इस्त्रो मंगळाकडे कृत्रिम उपग्रह ( मंगळयान ) पाठवण्याच्या तयारीत असून
या निमित्ताने स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात आणखी एक सोनेरी पान लिहिले जाणार आहे.
म्हणजे अगदी १९७१ चा पाकिस्तानचा पराभव, स्वबळावर सुपर कॉम्प्युटर बनवणे, अणुचाचणी
घेणे वैगेरे अशा मोजक्या घटनांशी तुलना करता येईल अशी ही इस्त्रोची मोहिम आहे. या मोहिमेचे नक्की काय महत्व आहे ते अगदी थोडक्यात बघुया.
1.....चंद्रापेक्षा लांब, दुस-या भाषेत सांगायचे म्हणजे एखाद्या ग्रहावर कृत्रिम उपग्रह पाठवण्याचा
अनुभव भारताला मिळेल. हे करतांना विविध उपकरणांची तयारी, त्याचा अनुभव आपल्याला मिळणार आहे.
2..... या अनुभवाचा उपयोग सुर्याचा अभ्यास
करण्यासाठी " आदित्य " हा उपग्रह पाठवतांना होणार आहे.
3.....मोहिमेमुळे भारताचे जगात नाव होईलच आणि
आपल्या तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढेल.
4.....मोहिम यशस्वी पार पडली तर जपान आणि चीनवर आपण
कुरघोडी करण्यात यशस्वी होऊ.
5..... भारतात मंगळ किंवा त्यानंतर इतर ग्रहांचा
अभ्यास करण्यासाठी वेगळी शाखा तयार होईल. लोकांचा सहभाग वाढेल.
6.....चांद्रयान- 2 मोहिमेसाठी भारतीय अंतराळ
शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास वाढेल.
7.....जगातील इतर देशांच्या अवकाश संस्थांशी इस्त्रोचे
सहकार्य वाढेल.
8......सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारचा (
मठ्ठ राज्यकर्त्यांचा ) इस्त्रोकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. आणखी कितीतरी पैसा
भविष्यातील मोहिमांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल.
( मंगळ मोहिमेवरचा ब्लॉग वाचण्यासाठी क्लिक करा.....
तेव्हा या सोनेरी पानाबद्दल मात्र फारशी कोणालाच माहितीच नाही असे चित्र दिसत आहे. म्हणजेच या ऐतिहासिक
क्षणाशी सर्वसामान्यांचे काहीही देणंघेणं नसल्याचं दिसून येत आहे. त्यानिमित्ताने
काही ओळी, इस्त्रोच्या विरोधात खरडावाश्या वाटतात.
अज्ञानाचे ‘ मंगळयान ‘
१...’
मंगळयान ‘ नक्की कसे आहे ? कोणती शास्त्रीय
उपकरणे यांवर आहेत
? याची एकही प्रतिकृती इस्त्रोने विज्ञानाशी संबंधित शास्त्रीय संस्थेला,
विज्ञानाशी संबंधित स्वयंसेवी संस्थेला दिलेली नाही.
२...किमान विद्यार्थ्यांमध्ये मंगळमोहिमेबद्दलची, विज्ञानाबद्दलची
उत्सुकता वाढवण्यासाठी मोहिमेनिमित्ताने पावले
उचलता आली असती.
३...इस्त्रोच्या संकेतस्थळावर कधी नव्हे ते ( म्हणजे चांद्रयान मोहिमे
दरम्यानसुद्धा नाही ) मंगळयाना संदर्भातील फोटो उपलब्ध करुन एक प्रकारे इस्त्रोने ‘ उपकार ‘ केले आहेत. पण
किमान मंगळावर यान कसे पाठवले जाणार या संदर्भातील एक एनिमेशन उपलब्ध करुन दिले
असते तर ही मोहिम समजण्यात सहजता आली असती.
४...सध्या सचिन तेंडुलकर २००वी कसोटी खेळून निवृत्त होणार याची चर्चा
अगदी लोकल ट्रेनच्या गुप्रमध्येही जोरात सुरु आहे. मात्र मंगळयानापेक्षा
पत्रिकेतील मंगळच फक्त लोकांना अजुन तरी माहित
आहे.
५...अनेक प्रसारमाध्यमे मग ती वर्तमानपत्र आणि न्यूज
चॅनेल्स ( नेहमीप्रमाणे ) अवकाश मोहिमेबद्दल अनभिज्ञ आहेत. बहूदा ५ नोव्हेंबर ला
लाईव्ह दाखवण्यापुरता सोपस्कार पार पडला जाईल.
६...नासा स्वतःच्या अवकाश मोहिमेच्या प्रसिद्धीची चांगलीच काळजी घेते. मग
ते वर्तमानपत्रे, चॅनेल्स यांच्याशी संपर्क ठेवणे असू दे किंवा स्वतःचे
संकेतस्थळावर असलेली माहिती. इस्त्रो प्रसिद्धीच्या बाबतीत शेकडो कोस दूर आहे.
इस्त्रोने काय करायला हवं होतं....
१...
‘
मंगळयान ’ या नावाला सरळधोपट
नाव देण्यापेक्षा एखादे चांगले नाव ठेवणं गरजेचं होतं. यासाठी एक स्पर्धा घेतली
असती आणि त्यातून नाव निवडले असते तर मंगळ मोहिमेची माहिती सर्वांपर्यंत पोहचली
असती.
२...शालेय स्तरावर एखादी प्रश्नमंजुषा वगैरे आयोजित करत शालेय
विद्यार्थ्यांमध्ये वातावरण तयार करता आले असते. विजेत्यांना किंवा काही
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मंगळमोहिमेच्या प्रक्षेपणाच्या ठिकाणी उपस्थित
रहाण्याची संधी दिली असती तर चांगलीच प्रसिद्धी मिळाली असती.
३...मंगळयानाची प्रतिकृती विविध विज्ञानाशी संबंधित संस्थाना देणे अत्यंत
आवश्यक होते. यामुळेच इस्त्रोच्या मोहिमेची माहिती सर्वत्र पोहचली असती.
४...मंगळमोहिमेवर एखादा माहितीपट, चांगली ( रंगीत फोटोंची ) माहिती
पुस्तिका तयार करुन सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध करुन दिली
असती तर मंगळमोहिमेची ख-या अर्थाने सर्वसामान्यांमध्ये चर्चा झाली असती.
५... शेवटी एखादी माहिती ही प्रसारमाध्यमांद्वारेच सर्वसामान्यांपर्यंत
पोहचते. तेव्हा प्रसारमाध्यमांना इस्त्रोने मंगळमोहिमच्या तयारीचा दौरा वेळोवेळी आयोजित
केला असता तर मोहिमेच्या तयारीचा आंखोदेखा हाल जनतेपर्यंत पोहचला असता.
६...मंगळमोहिमेवर जाहीर सादरीकरण आयोजित करत, चर्चासत्रे आयोजित करत
मंगळयान मोहिमेबद्दल चांगली जनजागृती करता आली असती.
७....सर्वात शेवटचे म्हणजे देशातील काही मोजकी वर्तमानपत्रे, न्यूज
चॅनल्स वगळता बाकी सर्वजण अवकाश मोहिम वगैरे या वैज्ञानिक घडामोडींबद्दल चांगलेच निरक्षर
आहेत. त्यामुळेच घटना घडण्याच्या दिवसाच्या पुढे-मागे बातम्या येण्यापलिकडे काहीही
होत नाही. तेव्हा उत्सुक असलेल्या पत्रकारांना मोहिमेबद्दल साक्षर करण्यासाठी
पावले उचलली असती तर अधिक अचूक माहिती समोर आली असती.
म्हणनूच या इस्त्रोच्या ऐतिहासिक घटनेबद्दल सर्वत्र
आनंदीआनंद असल्याचं
बघून वाईट वाटतं. एखाद्या मोहिमेनंतर पत्रकार परिषद घेणा-या इस्त्रोला
प्रसिद्धीसाठी पावलं का उचलता येत नाही हे बघून आश्चर्य वाटते.
स्वतःच्या फायद्याकरता सरकारी विभागांना, सरकारी संस्थांना हवेतेसे
वापरणारं केंद्र सरकार एवढ्या ऐतिहासिक मोहिमेची प्रसिद्धी करतांना एवढा कंजुषपणा
का करते असा ?? का मागे राहते हे बघून धक्का बसतो.
प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणा-या विविध राजकीय पक्षांनी निदान या
मोहिमेबद्दल, मोहिमेच्या श्रेयाबद्दल राजकारण करायला हवं असं मनापासून वाटते.
त्यामुळे किमान या मंगळ मोहिमेला प्रसिद्धी तरी मिळेल.
मंगळावर पोहचू पहाणा-या इस्त्रोला जर लोकांच्या मनापर्यंत पोहचत नसेल तर
मिळणारे यश हे मर्यादीतच असेल. तेव्हा या यशाचा उपयोग तरी काय असा प्रश्न पुन्हा
पुन्हा पडतो.
No comments:
Post a Comment